चालण्यास पाय (काठी) - लिहितांना टांक।
बोलविण्या हाक जैशी लागे ॥
पहाण्यास नेत्र ऐकण्यास कान।
तुझें तैसें ध्यान जीविता या ॥
तुझी मुर्ती पुढें जरी ही असेल।
दुजी ना उरली मनीं इच्छा ॥१३२॥
पाण्यात बुडाले अग्नीत जळाले।
वाऱ्यात पळाले आत्मतत्व ॥
तार्यांत लकाके डोंगरांत ठाके।
लतेसंगे वाके आत्मतत्व ॥
हास्यांत तें फुले पिकांत तें डुलें।
प्रेमांत तें खुले - आत्मतत्व ॥१३३॥
ब्रह्मज्ञान नसे बुद्धिची जरूरी।
भावना ती खरी - असे जरी ॥
सुवासात नसे सौंदर्याची चाड।
सत्याची न वाढ वाङमयानें ॥
अन्तर्गत तत्व फुले स्वयेची तें।
तुला कृत्रिमते नसे थारा ॥१३४॥
हाच प्रश्न शेवटला।
ओठीं येउनी थांबला ॥
बोलवेना कांही केल्या।
वृत्ति अंतरीं थबकल्या ॥
श्वास चाले ना स्वतंत्र।
पात नेत्राचे हालेना ॥
मृत्यूच्या या संगीतात।
ऐक माझें मनोगत ॥१३५॥
तुला विसरेन सहज मीच आई।
परी तुजला कांही लाज व्हावी ॥
पोटींचे लेकरू तया काय ज्ञान।
थोर आणि सान नव्हे एक ॥
तुझ्या सुद्धा चित्ती येता ती अकरूणा।
पुसे काण सांग माझी दैना ॥
माझे अश्रू कोण सारखे पुशील।
आणि कुरवाळील पुन्हां पुन्हां ॥१३६॥
मनांत पेटला एक ज्वाला मुखी।
तरीही मी सुखी कैसा राहू ॥
गेली वर्षे युगे शांत तो न होई।
लाव्ह्यामुळें डोई - सदा भाजे ॥
म्हणा यांस अश्रू परि हा अग्निरस ।
येई फसा फस नेत्रांतूनी ॥१३७॥
कधीं कधीं गेल्या जन्मीं तैसे असेन बोललो।
स्वैर ही चाललो अवज्ञेने ॥ परी सांग चित्ती - नव्हते कां हे प्रेम। तेव्हांही निस्सीम जसे आज ॥ जरी पुन्हां कांही शंका माझिया प्रेमाची। मला भेटण्याची अनिच्छा का? ॥ शब्द खोटा किंवा अर्थ भलता मनीं। ते स्पष्ट वचनीं सांग आता ॥१३८॥
खुणावितो तारा मला बोलावितो वारा।
सांगतसे गुज - रात्र कांही तरी आज ॥
निर्झर संगीत गुप्त होतसे आत्म्यांत।
नि:शब्दाचे स्वर - चित्ती करीती संसार ॥१३९॥
वाचेने लपविले सर्व माझे अर्थ ।
कटाक्षांनी व्यर्थ - घाण केली ॥
हास्य एक आले कपोली नकळत।
भाव त्याने लुप्त - अंतरीचा ॥
मनांतील भाव बाहेर उडाले । (ओढीले)
इंद्रियांनी नेले तुझ्या पाशी ॥
परी जें अंतरी वसे त्याची मूर्ति।
इंद्रियांचे हाती न लागेल ॥१४०॥
तुझी प्रेममूर्ती न्हाणीली कटाक्षें।
हास्यानें आणिली दिव्य शोभा ॥
शब्दांनी अर्चिली अर्थांनी पोशीली।
काव्याने नटविली मनाजोगी ॥
आता तरी देई, प्रत्युत्तर मज।
आणखी तें सहज - प्रति - प्रेम ॥१४१॥
दर्शने भाषणे बोलणे - तयांची ती आस।
माझिया चित्ताव नुरे आता ॥
मर्त्य लोकींचें हें नव्हें प्रेम देवी।
वृत्ति ती मानवी - नुरे मज ॥१४२॥ (माझि)
मदोन्मत्त झाला हेतु हा मनींचा।
मनोविकृतींचा - यज्ञ झाला ॥
बळावली एक वृत्ति अंतरांत।
षड्रिपूंचा अंत तिने केला ॥
मनाची पेटली चिता ही भयाण।
करी आत्मदान - प्रीती, त्यांत ॥
जगी नांही आतां प्रीतीची बंधने।
कशाला जीवाने - येथ रहावे ॥१४३॥
मनाच्या मळयांत रुजे एक बीज।
एक चमके बीज - अंतरात ॥
फुलें एक पुष्प एक तारा हांसे।
म्हणूनी उल्हासे चित्त माझे ॥
नका पुसूं मजला आणखी काहीही।
सांगणार नाही कधीही मीं ॥१४४॥
शेवटीं हेंच ना बोलली लाडकी।
मला एका एकी गांठुनीयां ॥
जगाच्या भोंवती पडदा काळोखाचा।
ऐकता ती वाचा - ओळंबला ॥
कितीका जन्माच्या आशा लतेवरी।
अशनिपात करी - देवता ती करी ॥१४५॥ (फेकिली ती सुरी - अनंततेनें।)
तुझ्या संदेशाचा अर्थ लावीयेला।
मनाला वाटला इष्ट जो तो ॥
तझा काय दोष? माझ्या सांतत्वाची ।
जाणीव न कैची व्हावी मला ? ॥
स्वस्थ ऐस जा-तूं-आपुल्या ठिकाणी।
पुन्हां माझी वाणी बोलेल न ॥
एकदाही केली कशाला विनंती।
ऐसे येते चित्ती पुन्हां पुन्हां ॥१४६॥
२९-११-५८