-३-
‘ज्ञानान्मोक्ष:’ ही घोषणा करणार्या आद्य श्री शंकराचार्यांचे मार्गदर्शन स्वीकारून, श्री ज्ञानेश्वरांनी आध्यात्मिक अनु्भवदेखील - किंबहुना, आध्यात्मिक अनु्भवात विशेषत: - आवश्यक व उपयुक्त असणार्या बौद्धिक, दार्शनिक, दृष्टीकोनाची प्रतिष्ठापना केली. श्री ज्ञानेश्वरी हा वैदिक आध्यात्म्रशास्त्राचे विवेचन करणारा एक दर्शनग्रंथ आहे. भावतरल भक्तीच्या सामसंगीताला ऋग्वेदीय ‘प्रज्ञाना’चे भास्वर अधिष्ठान, वादक बुध्दिवादाची ज्ञाननिर्विशिष्ट ‘बैसका’ श्री ज्ञानेश्वरीने निर्माण केली.
श्री ज्ञानेश्वरी-हे आत्मविद्येचे एक व्याकरणशास्त्र आहे. शुध्द कसे विवेकावे व शुध्द कसे व्यवहारावे हे श्री ज्ञानेश्वरी शिकल्याने समजते. श्री ज्ञानेश्वरी म्हणजे ब्रह्मास्रविद्येच्या डोळस अध्ययनाची एक मार्गदर्शिका आहे.
श्री ज्ञानेश्वरीत सु-सूक्ष्म आंतर अनु्भू्तींची ‘वृ्त्तविचिकित्सा’ आहे, मानवतेच्या अढळ, अंतिम आकांक्षांचे तौलनिक, तारतम्यप्रधान व्यवस्थापन आहे.
महानुभावी पंथांतले काहीसे तर्कशैथिल्य, कित्येक आंधळे आचारधर्म यांचे महाराष्ट्राच्या जीवनावर आभाळ येऊ लागले होते. शिवाय इतस्तत: पसरलेली यावनी संस्कृति या अनिष्ट छायामेघांना साहाय्यकच ठरत होती. अशा वेळी, श्री ज्ञानेश्वरींनी वैदिक प्रज्ञानदृष्टीची पुनश्च प्राणप्रतिष्ठा केली. मोक्षविद्येचे दर्शन, शासनग्रंथ सादर केला व महाराष्ट्राच्या जीवनाला, अध्यात्माला व संस्कृ्तीला ‘ज्ञाना’च्या महनीय ऐश्वर्याचा रत्नालंकार चढविला.