प्रस्तावना

नामदेव हे नाम देह होते. त्यांचा देह हे साक्षात् व साकारलेले नाम होते.

पुस्तकाचे नाव: श्री नामदेवरायाची सार्थ-गाथा (भाग ४ था)

लेखक: बाल ब्रह्मचारी प्रल्हादबुवा सुबंध

प्रस्तावना: प्रात: स्मरणीय, नाम-योगी श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद यांचा कृपाशीर्वाद व पुरस्कार

श्री नामदेव हे महाराष्ट्राच्या नाम-विद्येचे आद्य-प्रणेते आहेत.

नाम व नामी या द्विपुटीचे, आंतर अद्वैत, श्रीनामदेवांनी स्वानुभवाने व स्व:तच्या चतुर्विध वाणीने सिद्ध व प्रसिद्ध केले आहे. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चतुर्वेदीवर श्रीनामदेवांची नामज्वाला, अखंडतेने प्रस्फुरत होती.

कर्म-किंकर होऊन चौर्‍याऐंशी लक्ष योनी हिंडणार्‍या जीवाला नाम-योग समजला की तत्क्षणीच त्याला महा-जागर येतो, महामोक्ष लाभतो; स्वयं सच्चिदानंदरूप असणारे स्व-स्वरूप त्याच्या अनुभवास येते.

कर्म-नियतीचे बंध, एका झटक्यात, तोडण्याचे सामर्थ्य एका नाम-साक्षात्कारांत आहे. नाम एकदाच घ्यावयाचे असते, दोनदा नव्हे. मात्र ते घेता येण्यासाठी अनेक जन्मांची संसिद्धी लागते.

‘नाम’ हाच देव; आणि त्या देवाचे प्रत्यक्ष दर्शन, त्याचा साक्षात्कार, श्री नामदेवांच्या शरीरधारणेने, महाराष्ट्राला व भारताला झाला. श्री नामदेवांचा अवतार म्हणजे नामयोगाचा अवतार होय.

नाम व नामी यांचे अद्वैत अनेक तर्‍हेने प्रकट होत असते. अनेक तर्‍हेने अनुभवावयाचे असते.

नामाकडून नामीकडे असा प्रवास सहज सिद्ध आहे. ‘नाम’वंत व भागवंत यांचे मधले अंतर खरोखर काल्पनिकच आहे. नाम-वंत क्षणार्धात भगवंत होतो. ‘नाम’ एकदाच व क्षणमात्र घेता आले की ती व्यक्ति ‘देव’रूप होते, देवत्व पावते. ‘नाम’ कोट्यवधी वेळा घ्यावयाचे नसते. नाम खरोखरच एकदाच घ्यावयाचे असते. अगदी एकदाच, दोनदा नव्हे, व पुनश्च कधीही नव्हे नाम एकदा घेतले, घेता आले की दुसरे काहीच घेता, देता येत नाही. कारण, नंतर ‘नाम’ आपणास घेते; आपण ‘नामाला’ घेत नाही, आपण शिल्लकच उरत नाही.

नाम म्हणजेच नामी असल्यामुळे नाम घेणे म्हणजे ‘नामी’ घेणे, देव घेणे, देवत्व पावणे, असे नव्हे काय? देवत्व पावणे ही क्रिया, हा अनुभव एकदाच यावयाचा असतो. हजारो वेळा देवत्व कसे पावता येईल?

एकदा नामी म्हणजे देव मिळाल्यावर त्याला पुन: कसे मिळविता येईल? एकदा देव मिळाल्यावर तो देव हरवावा लागेल व तरच त्या देवाला पुन: मिळविता येईल. दोन वेळा ‘नाम’ घेणे दोन वेळा नामी मिळविणे शक्यच नाही.

न्यायदर्शनाप्रमाणे प्राक अ-भाव असेल तरच भाव शक्य होतो.

देव मिळण्यापूर्वी, न मिळालेला, असला पाहिजे, मिळालेली वस्तू पुन: मिळविता येणार नाही. ती हरवली तर मात्र पुन: मिळविणे शक्य होते. एकदा देव मिळाल्यावर तो हरवता येत नाही.

एकदा देव मिळाल्यावर, फक्त स्वत:ला हरवता येते. स्वत:ला शिल्लक राहता येत नाही. जे काही राहते ते देवच असे नसले तर देवाकडे अल्पत्व येईल व भक्ताकडे बृहत + त्व जाईल. देव हा अंश व भक्त ‘पूर्ण’ असा व्यत्यास होईल.

देव मिळविणे म्हणजे एकादी ‘वस्तू’ मिळविणे नव्हे. स्वत:ची देवात मिळवणी करणे म्हणजे देव मिळविणे.

माझ्यात देव मिळवावययाचा नाही. मी देवात मिळवून व मिळून जावयाचे.

नाम-योगाची प्रक्रिया अशी विलक्षण आहे! नाम-योग म्हणजे ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोग यांचा व यावत् शक्य सर्व योगांचा, समन्वय योग आहे. कारण, सर्व योगांची मूलतत्त्वे नामयोगात अंतर्भूत व अनुस्यूत असून शिवाय त्या सर्व योगांचा तो लघुतम विभाग आहे.

नामयोग ही बीज-विद्या आहे. शाखा शास्त्र नव्हे. नामयोग साधला किंवा नामाचा एकदाच योग आला की विश्वभास मावळाच नवलचंडाशूचा उदयच तो!

एकदा, अगदी एकदाच नाम घेतल्यावर, ‘नाम’ आपणास घेऊन, ग्रासून टाकते. आपण ‘नाम’ घेण्यास शिल्लकच उरत नाही. असा माझा प्रत्यक्ष अनुभव आहे, साहित्य शास्त्रातला अलंकार नव्हे - शाब्दिक कोटि नव्हे व अर्थ चमत्कृति नव्हे.

श्रीसंत तुलसीदास यांनी एका मातेला हाच उपदेश केला होता. तिचे बालक मृत झाले होते. तुळसीदास म्हणाले, “एकदाच रामनाम घे म्हणजे ते मूल जिवंत होईल.”

बिचारीने रामनामाचा लक्ष-घोष केला. मूल जिवंत झाले नाही. तुलसीदासांनी एकदाच रामनाम घेतले व त्या बाईचे मृत मूल एकदम हसू खेळू लागले!

श्री नामदेवांनी निर्व्याज्य, निरागस  व ‘अखंडार्थ-वृत्तीने’ दुधाबरोबर, स्वत:चा सर्वस्वाचा ‘नैवेद्य’ दाखवून एकदाच पांडुरंगाचे नाव घेतले याचा अर्थ -पांडुरंगाने हा नैवेद्य स्वीकारला व नामदेव अंतर्धान पावून त्यांचे ठायी पांडुरंग जिवंत झाला.

नाम्याचा श्वास सरला, त्यानंतर देवाचा सुरू झाला. नाम-नामी एक झाले. नाम म्हणजेच देव हा सिद्धांत महाराष्ट्रात मानव देहाने वावरू लागला. ज्ञानाची, ज्ञानराजाची साथ करीत करीत सहवास घेत घेत, उत्तर-भारतात हा सदेह सिद्धान्त, संचार करून परत पांडुरंगाचे पायी आला. नामदेव हे नाम देह होते. त्यांचा देह हे साक्षात् व साकारलेले नाम होते.

नामदेवाची देववाणी म्हणजे प्रत्यक्ष श्रुति-बाला आहे. साक्षात् बाल सरस्वती आहे. नामदेवाच्या देववाणीला, बाल-सरस्वतीला, सरल-सुंदर शब्दसाज भक्तराज बाल प्रल्हादाने चढविला आहे. ही कलाकृति इतक्या हळुवारपणे, दुसरे कोण करू शकेल?

प्रकर्षाने ‘ल्हाद’ म्हणजे आनंद देणारे, हे प्रल्हादबालक महाराष्ट्र-संतांच्या शब्द शारदेचे एक लाडके लेणे आहे.

प्रल्हादबुवा हे आंतर-बाह्य शुद्ध आणि म्हणून वाचेच रसाळ आहेत. त्यांनी केलेले नामदेवांच्या अभंगाचे सहज सुंदर शब्दांतर व रूपांतर इतके यथार्थ व भावार्थ दीपक आहे की मूळ अभंगाची अवीट गोडी त्यात अ-विरतपणे झिरपून राहिली आहे.

श्री नामदेवावरील त्यांचे हे चार खंडांत प्रसिद्ध झालेले सायण भाष्य महाराष्ट्र संतवाङ्मयात अमर होईल अशी माझी निष्ठा आहे.

बाल ब्रह्मचारी प्रल्हादबुवा सुबंध यांचे जीवन हे एक हरिदासकुळाचे भाग्य-भूषण आहे. त्यांना म्हणजे त्यांच्या लेखनरूप वाग्वंशाला ‘आकल्प आयुष्य’ श्रीनामदेवांनीच प्रार्थिले आहे.

आकल्प आयुष्य व्हावे तथा कुळा।

माझिया सकळा हरिच्या दासा।।

श्री प्रल्हादबुवांचे अंत:करणपूर्वक अभिनंदन करून हे मंगलचरण संपवितो.

- धुं.गो. विनोद

ॐ ॐ ॐ

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search