पुस्तकाचे नाव: श्री नामदेवरायाची सार्थ-गाथा (भाग ५ वा)
लेखक: बाल ब्रह्मचारी प्रल्हादबुवा सुबंध
प्रस्तावना: प्रात: स्मरणीय, नाम-योगी श्री जगद्गुरू न्यायरत्न डॉ.धुं.गो. विनोद यांचा कृपाशीर्वाद व पुरस्कार
श्री संत नामदेव हे ‘नाम-स्वरूप’ झाले होते. ते स्वत:च नाम झाले होते. नाम होणे म्हणजेच देव होणे.
नाम हे द्यावयाचे नसते व घ्यावयाचेही नसते. नाम हे ‘व्हावयाचे’ असते. स्वत: नामरूप जो होऊ शकतो, त्याचाच नामयोग सफल होतो.
विशेषणे, क्रियापदे, कर्ता व कर्म या सर्वाचा त्याग करावयास हवा. जे सर्वनाम म्हणजे सर्वांचे नाम असेल आणि जे विशेष-नाम म्हणजे ‘इतके’ विशेष-नाम, इतके वैशिष्ट्यपूर्ण नाम, की तत्सदृश दुसरे कोणतेही नाम असूनच शकत नाही; असे ‘नाम’ व्हावयाचे प्रत्यक्ष अनुभवायचे ज्याला साधले, त्यालाच विश्वाचे ‘व्याकरण’ समजले.
श्रीनामदेवांनी हे सर्वनाम, हे विशेषनाम अनुभवले होते, साक्षात्कारिले होते. ब्रह्म हे देखील नामतत्त्वाचे एक ‘सामान्य’ नाम आहे. ‘नामदेव’ हा शब्दच हे सांगतो की नाम हाच देव होय. देवत्वाचे ‘कर्म’ धारण करणारे नाम असा या कर्मधारय समासाचा अर्थ आहे.
देवाला नाम नसावे; कारण तशा अर्थाने तो देव सान्त मर्यादित व शब्दाने वाच्य होऊन राहील. पण नामाला देव असू शकेल, कारण नाम हे अनेक देव-देवतांचा स्थायी-भाव आहे. उदाहरणार्थ राम-नाम, विष्णु-नाम, हरि-नाम या सर्व शब्दांत नाम स्थायी आहे; विशेष्य आहे, व देव अस्थायी आहे. नाम हे विशेष्य असून देव हे विशेषण आहे. प्रथम ‘नाम’ नंतर देव.
संत नामदेव यांच्या नावाची शब्दमूर्ती अशा दृष्टीने अंतिम सत्याची ज्ञापक आहे. नाम हाच देव, हे नामदेव शब्दांतले आंतर रहस्य लक्षात घेतले पाहिजेच; पण ‘देव’ हे पद नामाचे विशेषण आहे ही कल्पना, तितकीच अर्थपूर्ण व महत्त्वाची आहे`!
आद्य व्याकरणकार पाणिनी हे व्याकरणाला स्वतंत्र दर्शन म्हणजे मोक्षाची साधना मानतात.
त्यांच्या पाणिनीय सूत्रावर भाष्य लिहिणारे पतंजली, यांचीही तशीच श्रद्धा होती. कुठल्याही, एका शब्दाच्या संपूर्ण ज्ञानाने मनुष्य मुक्त होऊ शकतो; सर्व कामना सफल करणारी ‘कामधुक्’ शक्ती होऊ शकतो. एक: शब्द: सम्यक् अधीत: सम्यक् प्रत्युक्त: स्वर्गे लोके कामधुक-भवति। (पतंजली महाभाष्य) कोठल्याही एका शब्दांत एवढी प्रचंड शक्ति, सुप्त व गुप्त असते याचे कारण तेथे साक्षात ईश-शक्ती स्वरूपत: केंद्रित असते, हे होय.
नामयोगातील अन:शक्ति याच सिद्धांतावर अधिष्ठित आहे. प्रत्येक शब्द हे परमेश्वराचेच नाव आहे. अनेक देवतांची सहस्र नामे प्रसिद्ध आहेत. विष्णु-सहस्रनाम, देवी-सहस्रनाम, शिवसहस्रनाम, गणपति-सहस्रनाम इत्यादी निरूक्तिशास्त्राच्या दृष्टीने सहस्र शब्दाचा अर्थ नऊशे नव्याण्णव अधिक एक असा नाही; ‘सह’ म्हणजे बरोबर ‘स्र’ म्हणजे सरणे किंवा सरकणे. सहस्र म्हणजे एकदम सरकरणारा पुंज, एकदम सरकणारा समूह, लक्ष व कोटि या संख्यांना देखील सहस्र म्हणता येईल व शे-दोनशेंच्या संख्येलाही सह-स्र म्हणणे अयोग्य होणार नाही. मुद्दा हा की संख्येला दुय्यम स्थान आहे. भाव दृढतर करण्यासाठी आवर्तनांची जरूरी असते, पण अगदी एकदाच कोणलाही शब्द संपूर्ण भावनेने एकाग्रतेने घेतला, म्हटला, तर तो मोक्षप्रद होतोच.
प्रत्येक शब्द हा मंत्र आहे; देवाचे नाव आहे आणि हे जर खरे असेल तर आपण काहीही बोललो तरी ते, विठ्ठलनामाचेच एक स्वरूप आहे. तशी दृढ भावना असेल तर हा सिद्धांत सर्वथैव खरा आहे. अंत:करणात विठ्ठलाची मंगलमूर्ति चिर-स्थिर असेल तर सर्व शब्द-व्यवहार एक नामस्मरणच आहे, यात संशय नाही. परा, पश्यन्ती, मध्यमा व वैखरी या चारी वाणींतून नाम निघत राहिले पाहिजे. नामतत्त्वाचा अनुभव परावाणीत येतो व एकदाच तो येतो. नंतर त्या अनुभवाचे स्मरण होत राहते. वैखरीवाणी फक्त ‘स्मरण’ करविते. हे नाम-योगाचे महागूढ आहे.
श्रीभागवतकारांनी व भागवत संप्रदायाने ‘नामस्मरण’ हा शब्द प्ररूढ करण्यात एक अभिनव ‘दर्शन’ निर्माण केले आहे.
नामाचे स्मरण करावयाचे असते. प्रथम अनुभूति असेल तरच, त्या ‘पूर्व’ अनुभूतीचे ‘स्मरण’ होऊ शकते. न्यायदर्शनकार गौतम यांनी ज्ञानाचे दोन प्रकार सांगितले आहेत. एक अनुभव व दुसरी स्मृति. स्मृति म्हणजे पुन: प्रत्यय, तोच अनुभव पुन्हा येणे.
अत्यंत सूक्ष्म दृष्टीने विचार केला तर आपल्या अगदी पहिल्या अनुभवात देखील तत् सदृश पूर्व अनुभवांची अल्प स्मृति असतेच. ती नसेल तर कोठलाही अनुभव आकृतीला येणारच नाही. याचाच अर्थ अनुभवात पूर्व-स्मृति असते व स्मृतित पूर्वानुभव असतो, पण शब्द-व्यवहाराच्या सुलभतेसाठी, अनुभव व स्मृति असे दोन प्रकार नैय्यायिक मानतात. त्याच्या परिभाषेत नामस्मरणाचा विचार केला तर, अनेकानेक गहन अर्थछटा उपलब्ध होतात.
नामाचे स्मरण करण्यापूर्वी देवाचा किंवा नामाचा ‘अनुभव’ आला पाहिजे. नुसते बर्हिमुख व जड क्रियात्मक नामस्मरण फलदायक होणार नाही. कारण ते स्मरणच नसते, त्याच्यामागे अनुभव नसतो.
‘नाम’ या शब्दाचा ‘लक्ष्य’ अर्थ एक कृति, एक अनुभव, एक साक्षात्कार असा आहे. त्या साक्षात्काराचा, पुन: पुन: प्रत्यय घेणे याचा अर्थ नामस्मरण.
नामस्मरण म्हणजे स्फूर्तीची संतति, अविरत स्फुरतेची महाज्वाला, महा चैतन्याची अखंड स्फुरण-धारा.
नामाचे स्मरण हे नाम-स्मरण मुद्दाम बळे बळे करावयाचे नसते. नामस्मरण देखील आपोआप व्हावयाचे असते. तसे पाहिले तर स्मरण हे मुद्दाम करताच येत नाही. ते स्वयंप्रेरणेने होत राहते. जितका मूळ अनुभव तीव्र, अर्थपूर्ण, सखोल असेल तेवढ्या प्रमाणात स्मृतीची किंवा स्मरणाची साहजिकता व स्वयंस्फुरता प्रकट होते. मूळ अनुभव उथळ असेल तर त्याची स्मृति, बळे बळे करावी लागते.
नाम हे स्मरणात यावयाचे तर मूळ साक्षात्कार अतीव तीव्रतेचा असला पाहिजे. ह्या साक्षात्कारात व्यक्तित्वाचे पूर्ण निवेदन अहं-वृत्तीचा संपूर्ण ‘नैवेद्य’ समर्पित झाला पाहिजे. श्री नामदेव हे निवेदनभक्तीचे आदर्श उपासक होते स्वत: व स्वत:चा नैवेद्य कसा दाखवावा हे श्री नामदेवरायांनी महाराष्ट्रीय जनतेला शिकविले आहे.
निरहंकार व निर्विकार झालेल्या श्रीनामदेवाच्या निवेदित जीवनाचे धवल-विशुद्ध दुग्धामृत श्रीपांडुरंगांनी प्रत्यक्ष प्राशन केले. यात चमत्कार आहेच कोठे? बाह्य घटना ही अंतरंगातल्या अध्यात्म-विश्वात घडलेल्या, अद्वैत अनुभूतिची एक साक्षात् प्रतिकृती असते. सर्व चमत्कारांचे स्वरूप असेच असते. बहिर्दृष्टीला तो चमत्कार वाटतो. अन्तर्निष्ठ उपासकांना असला चमत्कार सहजसिद्ध व नैसर्गिक असा ‘अनुभव’ वाटतो. दूध पांढरे-धवल, नामदेवांचे जीव-चैतन्य हे नैवेद्य दाखवताना एकाग्रतेमुळे व सर्वस्व निवेदनामुळे पूर्णत: शिवरूप झालेले धवल ब्रह्म; आणि पांडुरंग हा तर पांडु: ‘धवल-अंग’ असलेला, देव; धवलता एकरूप झाली यात चमत्कार कसला?
माझे परममित्र श्री प्रल्हादबुवा, सुबंध यांच्या आंतरिक व आध्यात्मिक जीवनाशी माझा सुमारे चाळीस वर्षाचा नाम-योगजन्य संबंध आहे. त्यांच्या ठिकाणच्या तीन शक्ति. विरक्ति, ईश्वर-भक्ति व अध्यात्म-रति, मला विशेष उल्लेखनीय वाटतात. ते वैराग्याचे विवेचन करू लागले की मी मंत्रमुग्ध होतो.
श्री. प्रल्हादबुवा यांच्या श्वासाश्वासांतून महाराष्ट्र संतांच्या आत्मानुभूतीचा सुगंध सांडत असतो. महाराष्ट्रभूमीला त्यांचे जीवन हे ‘देणे ईश्वराचे’ आहे. गेली दोन वर्षे त्यांची प्रकृति अत्यंत क्षीण अवस्थेत होती. केवळ संतसेवेच्या आस्थेने, ध्येय-निष्ठेने व नाम-कृपेमुळे त्यांना आयुर्वृद्धि लाभत आहे. आजपर्यंत आध्यात्मशास्त्राची त्यांनी उदंड सेवा केली आहे.
वृत्ति-प्रभाकर हा त्यांचा षट्दर्शनावरील ग्रंथ त्यांच्या विशाल विद्वतेची साक्ष देतो. त्यांनी प्रसिद्धीलेल्या संतवाङ्मयात त्यांचा भक्ति-प्रेमा ओसंडत आहे.
श्रीनामदेवांच्या बहुतेक सर्व उपलब्ध अभंगांची सार्थ गाथा त्यांनी प्रकाशित केली आहे. प्रस्तुत खंड म्हणजे या गाथेचा पाचवा भाग होय. या पाच विभागात श्रीनामदेवांचे पंचप्राण साकारले आहेत अशी माझी निष्ठा आहे.
अजून उदंड संतकार्य, व्हावयाचे आहे. त्याच्या पूर्तीसाठी श्री प्रल्हादबुवांना दीर्घप्रदीर्घ आयुष्य लाभो, हीच श्री नामदेवचरणी प्रार्थना
- धुं. गो. विनोद
ॐ ॐ ॐ