(९)
स्वत:च्या पुतण्याला गादीवर बसवून आऊसाहेबांनी शाहुकरवे त्याला सनद दिली व आपण रामतीर्थक्षेत्री सेवा करीत राहिल्या. काही दिवस तर राहावयाचे उभारणीला व तेथून ५ मैलांवर रोज रामतीर्थाला जावयाचे! ढफ़ळयांच्या व भोसल्यांच्या रक्तात जणू काय रघुवंशाचे ब्रीद अवतरले होते.
रघुकुळातील राजर्षि, गुणवान पुत्राच्या ठिकाणी राजश्रीला निविष्ट करून वृद्धकाळी संयमी सत्पुरूषांना योग्य अशी वल्कले परिधान करीत. स्वसामर्थ्याने राज्यश्रीला व्यवस्थितपणे सांभाळणार्या पुत्राला म्हणजे अजाला पाहून रघुराजा स्वर्गीय सुखोपभोगाविषयीही विरक्त झाला.
श्री आऊबाईंनी यशवंतरावांना सिंहासनस्थ करून स्वत: मृगाजिनाचे विरक्तासन स्वीकारले. येथे कालिदासाच्या खालील पंक्तीचे स्मरण साहजिकपणे होते.
गुणवस्तुरोपितश्रिय: परिणामेहि दिलीपवंशजा:।
पदवी तरूवल्कवाससाम् प्रयता: संयमिनाम् प्रपेदिरे।
अथ वीक्ष्य रघु: प्रतिष्ठितं प्रकृतिष्वात्मजमात्मवत्तया।
विषयेषु विनाशधर्मसु मिदिवस्थेष्वपि नि:स्पृहोऽभवत्।।
श्री आऊबाईंचा कर्मयोग सफल झाला. जतसंस्थानच्या राज्यव्यवस्थेची घडी व्यवस्थित बसली. तदुत्तर, आऊबाईंचे तपोनिधान सुरू झाले. आपल्या देहाला त्या कष्टवू लागल्या व मनाला मुरवू लागल्या.
मन मुरे मग जे उरे। ते तू कारे सेविसिना ।।
मन मुरल्यानंतर उरणार्या उन्मनीला त्या सेवू लागल्या. ‘देहे दु:ख ते सुख’ मानीत असता त्यांना उमराणीहून पाच मैलांवर असलेल्या रामतीर्थाला पायी जाताना कष्टापेक्षा सुखस्वास्थ्यच अधिक लाभे !
त्यांनी "कमलकंदाप्रमाणे आपले सुकुमार शरीर कठोर तपस्येने क्षीण केले व मोठमोठ्या तपस्व्यांनाही लाजविले." कालिदास पार्वतीविषयी हेच लिहितो -
मृणालिका पेलवमेवमादिमि:। व्रतै: स्वमंगं ग्लपयन्त्यहर्निशम्।।
तप: शरिरै: कठिनैरूपार्जितम् । तपस्विनाम् दूरमधश्चकार सा। - कुमारसंभव, ५, २९
तीन वर्षे श्री आऊबाईंनी उमराणीत काढली.
त्यांचे कठोर तप त्यांच्या देहाला झिजवू लागले व देहस्थ देवाला रिझवू लागले.
अखेरीस इ.स. १७५७ साली जन्माष्टमीचे दिवशी या साध्वीने विश्वाला देहदंड देऊन विश्वेश्वराला चित्खंड वाहिला!
बिंदू सिंधूला मिळाला आणि जीवाशिवाची मिळणी झाली