(८)
श्री आऊबाई रणरागिणी होत्याच, पण त्यापेक्षाही त्या विरागिणी होत्या! त्यांचे ‘असंगशस्त्र’ त्यांच्या कमरेच्या तरवारी इतकेच प्रभावी व प्रखर होते.
दृक्-श्राव्यादि विषयांचे त्यांना वैराग्य. ‘दॄष्टानुश्रविकविषयवितृष्णस्यं वशीकार संज्ञा वैराग्यम्।’ - (योगसूत्रे)
त्यांच्या ठिकाणी अनेक सिद्धि जागॄत झाल्या होत्या. हठयोगाचा अभ्यास त्यांनी केला होता की नाही याविषयी प्रमाणे उपलब्ध नाहीत, पण भगवान् पतंजलींनी योगसूत्रांच्या विभूतिपादात (४९) एक राजगुह्य सांगून ठेवले आहे, “देहबुद्धि नष्ट होऊन आत्मबुद्धि प्रतिष्ठित झाली, पुरुष व प्रकॄति यातील भेदग्रह स्पष्ट झाला की सर्व विश्वाचे नियंतॄत्व व सर्वज्ञत्व प्राप्त होते.” - “सत्वपुरुषान्यथाख्यातिमानस्य सर्वभावाधिष्ठातृत्वं, सर्वज्ञातॄत्वं च।”
श्री आऊबाईंच्या ठिकाणी देहबुद्धिचा निरास झाला होता व आत्मप्रभेचा ठाणदिवा अखंड तेवत होता.
त्या नंदादीपाच्या प्रकाशामुळे आऊबाईंच्या धवल चारित्र्यपटावर, लौकिक व्यवहारांत ‘सिद्धि’ म्हणून गणले जाणारे अनेक साहजिकपणे भासमान होत.
स्वत: त्यांनादेखील आपल्या या अलौकिक कर्तॄत्वाची जाणीव नसे. या नेणतेपणांत त्यांचा गौरव आहे.
पुष्पाला घ्राणेंद्रिय कोंठे असते?
शुक्राच्या चांदणीला नेत्र नाहीत!
सिद्धिमंतांना स्वत:च्या कर्तृत्वाचे भान कोठले?
इमर्सन विचारतो, “Could Shakespeare give a theory of Shakespeare?”
अहंकर्तृक बुद्धिच्या ग्रहणाने सिद्धिचंद्रिका विलुप्त होत असतात.