(७)
अनेक जन्मांची संसिद्ध म्हणजे विशिष्ट सात्विक संसकाराचा परिपोष.
जीवात्म्याच्या आंतर इंद्रियावर, अंत:करणावर झालेल्या क्रिया-प्रतिक्रिया म्हणजे संस्कार; त्यांच्या स्वरूपाहून जीवाचे भवितव्य ठरत असते.
संस्कार ही एक सुप्त पण अमोघ शक्ती आहे.
अद्वैतसिद्धीकर, श्रीमधुसूदन सरस्वती जीवन्मुक्तीची उपपत्ति लावताना म्हणतात की, अविद्येचा अस्त झाला तरी संस्काराच्या अनुवृत्तीमुळे- पुनरूद्भवामुळे अविद्येचे कार्य काही काल तरी चालू राहतेच; संस्कारानुवृत्तेरविद्यानिवृत्तावपि तत्कार्यानुवृत्तिसंभवात्।
क्रियासंपन्न व ज्ञानसंपन्न अशा सचेतन सृष्टीलाच संस्कारांच्या पुनरावृत्तीचा नियम लागू आहे असे नसून, जड पदार्थांतही त्याची व्याप्ति आढळते. फुले काढली तरी परडीला वास येतोच! नि:सारितपुष्पयां संपुटिकायां पुष्पवासनादर्शनात् । -(अद्वैतसिद्धी:)
फल्गु नदीचे जल अदृष्ट असते कारण ते वालुके खालून वहात असते. विस्मरणाच्या वालुकेखाली दडलेली संस्कारांची फल्गु अदृष्ट असली तरी जीवनशील असते व योग्य वेळी ती स्वत:चे स्वरूप प्रकट करते.
भगवान पतंजली सांगतात की, “कर्माशय म्हणजे विशिष्ट संस्काराचा समुदाय - या जन्मी अगर दुसर्या जन्मी फलोन्मुख होतोच. कृतकर्माचे फल भोगलेच पाहिजे.”
नमुक्तं क्षीयते कर्मकल्पकोटिशतैरपि। - (शंकराचार्य)
“जाति, आयुदीय व भोग हा संस्काराचा विपाक आहे.”
सति मूले तद्विपाको जात्यायुर्भोगा:। -(पतंजली)
श्री आऊबाई यांचे जीवन हा यदृच्छेचा एक अद्भुतरम्य चित्रपट आहे. त्यांचा विवाह, युवराज्ञीपद, पतिमृत्यू, श्वशुरमृत्यु, राज्ञीपद, शाहूमहाराजांची भेट, वैराग्य, अंतस्त्याग व बहि:संग, यौगिक चमत्कार, सर्वच अनपेक्षित, अद्भूत व अलौकिक!
श्री आऊबाईंच्या बुद्धिबळाचा, तपोबळाचा खेळ म्हणजे मोहोरलेले पूर्व-संस्कार!
त्या काळी मुसलमानांची वक्रदृष्टी सर्वत्र वावरत होती. पण श्री आऊबाई यांच्या शौर्यसंपदेचा बोलाबोलाच इतका प्रबळ होता की, जतचे रहिवासी नेहमी सुखासमाधानात असत.