साधना सूत्रे

सेंट फ्रॅन्सिसचे पायापाशी

रोमहून फ्लॉरेन्सला जाताना वाटेत `असिसि' हे एक शहर लागते. एका लहानशा टेकडीवर, आजूबाजूस दर्‍याखोर्‍या असलेले व इटलीचे वैशिष्ट्यपूर्ण सृष्टीसौन्दर्य हळुवारपणे दर्शविणारे हे स्थळ म्हणजे पश्चिम संस्कृतीचे एक तीर्थक्षेत्र आहे.

वर्षाकाठी लक्षावधी माणसे येथे येऊन जात असतील - कारण एका महानुभाव ख्रिस्ती संताचे हे जन्मस्थान आहे.

असिसीला इटलीच्या महाकवि <strong>डांटे</strong> याने "पश्चिममधली पूर्व" (Orient) असे विशेषण दिले, कारण येथे इ.स. ११८९ मध्ये एक सूर्योदय झाला आणि तो सूर्य म्हणजे सेंट फ्रॅन्सिस.

गेली सातशे वर्षे या असिसीच्या आदित्याने ख्रिस्ती जगाला ज्ञानाचा प्रकाश, शद्धेची उष्णता व सेवाधर्माचे चैतन्य दिले आहे.

भौगोलिक दृष्टीने असिसी हा इटालियाचा मध्यकेंद आहे. फ्रॅन्सिसच्या जन्मस्थानामुळे युरोपच्या आध्यात्मिक जीवनाची केंद्रभूमि असिसीच ठरली आहे.

अमेरिकतेतील सॅन्फ्रॅन्सिस्को या शहराचे नाव सेंट फ्रॅन्सिसच्या पुण्यस्मृतीचे वाचक आहे.

या पश्चिम प्रदेशात व आजच्या यांत्रिक युगातदेखील, सेंट फ्रॅन्सिसबद्दल असीम आदर व परमप्रेम आढळून येते.

फ्रॅन्सिसचे वडील पिअॅट्रो असिसी मधले एक धनाढ्य श्रेष्टी होते. त्यांच्या दुकानात एके दिवशी एक भिक्षेकरी आला. त्याला अर्थातच हाकलून देण्यात आले - शाळेत जाणारा दहा वर्षांचा फ्रॅन्सिस त्या भिकार्‍याचे मागे गेला व त्याला भरपूर द्रव्य-शिधा देण्यात आल्यानंतरच परत आला.

एकदा रोम येथील सेंट पीटर्सच्या महामंदिरात जात असता फ्रॅन्सिसने स्वत:चा मौल्यवान पोशाख महाद्वाराजवळील एका भिकार्‍यास दिला व त्याची लक्तरे आपल्या अंगावर चढवून एक संपूर्ण दिवस तो भिक्षेकर्‍यांचे जीवन जगला.

भर तारूण्यात त्याने आपला धुव-निश्चय प्रकट केला. `दरिद्रता हीच माझी प्रेयसी. तिच्याशी माझे लग्न झाले आहे.'  "I am wedded to Lady Poverty."

खरा संत साधकावस्थेत स्वत:च्या देहाला आणि मनाला वैभवाचा विटाळ कसा होऊ देईल?

वित्तेषणा व लोकेषणा यांच्या चिखलात रूतलेले ज्ञान शेकडो माणसांजवळ असते - पण वैभव म्हणजे वमन किंवा विष्ठा - साधकावस्थेत अशी अचल श्रध्दा स्थिरावली तरच साधकाला सिद्धसंत होत असतो.

इंद्रियांच्या लोलिंगत असलेल्या मानवी कीटकांनी संतपदाची आशा करू नये. निद्रावस्थेत असतानाही नाण्याचा स्पर्श हाताला सहन होता कामा नये.

योगवसिष्ठात सांगितलेला अंतस्त्याग आणि बहि:संग - अवतारी विभूतीनांच शक्य असतो किंवा सिद्ध संतांना वैभव व वमन या मधलाही भेद प्रतीत होत नाही. 

वैराग्य ही एक स्वयंपूर्ण, स्वयंसिद्ध व स्वयंप्रकाश वृत्ती असते.

तेथे आसक्तीचा आमूलाग निरास व्हावा लागतो. अंशदृष्टी किंवा प्रमाणशीरपणा तेथे शिल्लक असता कामा नये. अंशत: किंवा प्रमाणात केलेले प्रमाद वैराग्याची विशुद्धता नष्ट केल्याशिवाय कसे राहतील?

तसे एकदा मानले, की प्रमाणात केलेले सर्व दुराचार-परस्वाचा अपहार किंवा व्याभिचार देखील - उत्कट वैराग्याचे नमुने ठरून जातील. (आणि पुन:, प्रमाणे व मर्यादा ठरवणार कोण व कशा?)

एके दिवशी फ्रॅन्सिसने आपल्या आईला सांगितले, `आई, माझे स्नेही मी जेवावयास बोलावले आहेत. पंचपक्वानांची मेजवानी आपण त्यांना घालू या - शेकडो मित येतील.'

आईला वाटले इटलीतील सर्व अमीर-उमराव आपल्या बाळाने बोलावले आहेत. तिने जय्यत तयारी केली. फ्रॅन्सिसचे स्नेही दुपारपासून येऊ लागले. सूर्यास्तापर्यंत शे-दीडशे जमले.

पण ते कोण होते?

असिसीच्या आसपासचे शे-दीडशे भिक्षेकरी.

फ्रॅन्सिसने सर्वांना कपडे व भोजन दिले. अर्थात् त्याचे वडील फ्रान्समध्ये व्यापारानिमित्त गेले असताना हा समारंभ साजरा झाला.

फ्रॅन्सिसच्या आईचे नाव पिचा (Pica) असे होते. पिचाला सर्व गाव हिणवू लागला. तिचा मुलगा वेडपट ठरला. पण ती माऊली म्हणे, `माझा बाळ माझा नसून देवाचा आहे. तो पैसे घालवील पण देव मिळवील.'

माऊलीची वाणी खरी झाली

फ्रॅन्सिसला देव भेटला.

फ्रॅन्सिसजवळ देव बोलला.

ती घटना अशी झाली -

असिसीजवळच सेंट डेमिअनचे एक भंगलेले चर्च. प्रार्थनामंदिर होते. तेथे फ्रॅन्सिस गेला व गुडघे टेकून प्रार्थना करू लागला. Oh God, Illumine the darkness of my heart" ' हे परमेश्वरा `तमसो मा ज्योतिर्गमय!'

त्याला जीससचा आदेश झाला, `फ्रॅन्सिस जा, माझ्या ह्या चर्चचा - प्रार्थनामंदिराचा जीर्णोद्धार कर - ते उद्ध्वस्त झाले आहे.' 

फ्रॅन्सिस घरी परतला नाही.

ख्रिस्ताचा आदेश अक्षरश: स्वीकारून त्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी दगड व लाकडे जमविण्यास त्याचक्षणी त्याने सुरूवात केली. मंदिरात एक नंदादीप लावण्यासाठी त्याने पैसे आणून दिले. एका घोड्यावर वडिलांच्या दुकानातील खूपसा माल चढवून तो घोडा व माल त्याने बाजारात विकून टाकला. मिळालेले पैसे घेऊन गवंडी, सुतार जमविले व जीर्णोद्धाराचे काम झपाट्याने सुरू झाले.

त्याचा वडिलांचा, पिआट्रोचा राग अनावर झाला. फ्रॅन्सिस पूर्णपणे देवाचा झाला. त्याने अंगावरचे कपडे व खिशात होते ते थोडे पैसे फेकून दिले व प्रार्थना मंदिराची वाट धरली.

इहलोकचे सर्व पाश तोडून आता तो स्वतंत्र, ईशतंत्र झाला.

खर्‍या वैराग्याचे तेज अलौकिक असते.

बर्नार्ड नावाचा असिसीचा एक उमराव, पीटर नावाचा एक विख्यात कायदेपंडित व सिल्व्हेस्टर नावाचा धर्मगुरू अनुकमे फ्रॅन्सिसचे अनुयायी झाले.

`मालकी हक्काचा त्याग' ही फ्रॅन्सिसच्या पंथाची पहिली आज्ञा.

या तीन व्यक्तींनी आपली सर्व संपत्ति, घरे-दारे विकून टाकली व प्रार्थना मंदिरांचे जीर्णोद्धार सुरू झाले.

एक, दोन, तीन, पंचवीस, शेकडो प्रार्थना मंदिरे दुरूस्त होऊन राहिली. शेकडो माणसांनी आपले मालकी हक्क ख्रिस्तार्पण केले.

चरितार्थाकरिता लागणारे अत्यल्प द्रव्य शक्यतोवर स्वत: कष्ट करूनच मिळविणे; रूग्ण, कुष्टी, महारोगी यांना शक्य ती सेवा देणे; प्रार्थना मंदिरे व ख्रिस्ती धर्म यांचा जीर्णोद्धार करीत, भक्तिगीते गात स्वत:चे जीवन व्यतीत करणे - सहसावधी माणसे या नवपंथाकडे आकृष्ट झाली.

 

पोप इनोसंट दि थर्ड, याला स्वप्नात संदेश मिळाला की फ्रॅन्सिस हा ख्रिस्त धर्माचा उद्धारक आहे. फ्रॅन्सिसने सुरू केलेल्या त्यागमय संन्यस्त जीवन पंथाला पोपची मान्यता मिळाली.

 

" To possess nothing Under the sun" ही फ्रॅन्सिस्कन ऑर्डरची पहिली प्रतिज्ञा.

`मालकी हक्काचा संपूर्ण संन्यास' - दौलत-प्रॉपर्टी हीच सर्व गुन्ह्यांची, पापांची, माणुसकीचे मुडदे पाडणार्‍या राक्षसी महत्त्वाकांक्षेची जननी आहे. घरेदारे, इस्टेटी, मालमत्ता यांच्यावरील हक्कांची होळी करणाराच माझा - ख्राइस्टचा व ईश्वराचा भक्त व अनुयायी होय' असली मनस्वी व तेजस्वी आचारपणाली शिकवणार्‍या या महाभिक्षूला अनुयायांची वाण पडली नाही.

इटलीत, युरोपभर, या त्यागयज्ञाच्या ज्वाला भडकल्या.

वैराग्य हे भयंकर स्फोटक दव्य आहे.

मदिरा व मदिराक्षी यांचा मोह सहज अगदी सहज सुटू शकतो; कारण तो कल्पनाजन्य असतो. पण, वैराग्य हे सर्व अनुभवांचे अंतरंग उघडे नागडे करून खर्‍या वस्तुस्थितीचे दर्शन घडविते आणि म्हणून ते कल्पनाजन्य नसून वास्तववादाची परमावधी आहे.

तुमच्या चित्तदेहाला वैराग्याचा अगदी एकच एक स्पर्श झाला तरी पुरे - पुनरपि त्या पकडीतून सुटण्याची आशाच नाही.

रागाला जिंकता येते पण विरागाला कसे जिंकणार?

विराग म्हणजे जेत्यांचा विजेता. विरागाची विजयादशमी साजरी झाली की जीवनाचे सोनेच सोन होऊन जाते. हा विजयादशमीचा मुहूर्त म्हणजे विरागी विभूतीचा क्षणसहवास. तोच वैराग्याचे वेड कायमचे लावू शकतो व कोठल्याही मोहापेक्षा ते आकर्षण बलवत्तर ठरते. हाही एक स्पर्शजन्यच पण रोग नसून महाभोग आहे. त्याचा विमोचक आनंद कसा सांगता येईल?

संत सत्पुरूषाच्या जीवनातले सर्व दैवी चमत्कार फ्रॅन्सिसच्या हातून ईश्वराने घडविले.

एका तृषार्ताला पाणी मिळावे म्हणून फ्रॅन्सिसने पाण्याला हात मारताच, जवळच्या दगडांतून एक निर्झर धडाडतच पुढे आला.

कित्येक रोगी त्याच्या हस्तस्पर्शाने बरे होत. त्यांच्याविषयी विशेष प्रसिद्ध चमत्कार म्हणजे पक्षी त्याचे भाषण ऐकत बसत. तो त्यांना जमवून त्यांच्यासाठी कीर्तने करीत असे व त्याच्या आज्ञा ते पक्षी हमखास पाळीत. त्याने हात वर करताच ते एकदम शांत बसत. एक बगळा त्याचा विशेष लाडका होता. तो नेहमी त्याच्या जवळपास असे. पाच-दहा पक्षी त्याच्या अंगावर-खांद्यावर सारख्या येरझारा घालत.

मी आत्ता बसलो आहे, हे सेंट फ्रॅन्सिसचे असिसीमधले स्मारकमंदिर. त्यातल्या चित्रसौंदर्यामुळे जगद्विख्यात झाले आहे. गिओट्टो (Giotto) या महान कलाकाराने येथे स्वत:ला व स्वत:च्या प्रतिभेला अमर करून ठेवले आहे. फ्रॅन्सिसच्या चरित्रातले अठ्ठावीस प्रसंग निवडून त्याचे चित्रण करीत-करीत गिओट्टोने आपल्या आयुष्यातली बावीस वर्षे येथे घालवली. फ्रॅन्सिसला सेंट डेमियनमध्ये प्रार्थना करीत असता, जीझसने धर्मोद्धाराचा आदेश दिला - त्या प्रसंगाचे चित्रण म्हणजे कुंचल्याने भावदर्शन घडविणार्‍या कलाशक्तीची परिसीमाच होय. ऑस्ट्रियामधील दोन चित्रकार या चित्रांच्या प्रतिकृती करीत, पंधरा दिवस राहिले आहेत. सकाळी नऊला ते येतात व सायंकाळी पाचला परततात.

येथली ही दृष्टी, ही शद्धा, ही संतपूजा पाहिली की, अध्यात्मवृत्ती भारतात बहरली आहे व पश्चिमेतले जग जडवादी व सुखलोलुप आहे, असे कोण म्हणू शकेल? महाराष्ट संतांचे, पुण्यस्मरण येथे बसल्यावर सहजच होते - पण आपल्याकडून त्यांची किती अक्षम्य उपेक्षा झाली आहे, असे वाटू लागते.

*****

श्री ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, समर्थ रामदास, तुकाराम, गोरा कुंभार, चोखामेळा - महाराष्टाच्या या संत सप्तर्षींची अशी मंदिरे का नसावी?

महाराष्टाच्या कलावंतांनी रोममधल्या सेंट पीटर्ससारख्या, असिसीमधल्या सेंट फ्रॅन्सिससारख्या अमर कलाभुवनांना का निर्मिले नाही? महाराष्टात तसले महान शिल्पज्ञ व चित्रकार का जन्मास आले नाहीत? महाराष्टातल्या गेल्या सातशे वर्षांतल्या धनिकांना, संस्थानिकांना, जमीनदारांना संतजीवनाची कदर नव्हती असेच म्हणावयाचे काय?

 

महाराष्टीय संतांनी आपली मंदिरे मराठी हृदयातून उभारून ठेवली आहेत पण ही त्यांच्या तपस्येची, पुण्याईची शक्ती आहे. पेशव्यांना देखील ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ, रामदास, तुकाराम यांची यथार्थ ओळख झाली नाही काय?

 

श्रीज्ञानेश्वरांच्या ओवीने, मनाच्या एकेक श्लोकाने, तुकयाच्या एकेक अभंगपंक्तीने लक्षावधी मराठ्यांच्या मनात तेजोमहाल चिरचैतन्याचे महाल निर्माण करून ठेवले आहेत. 

 

पण महाराष्टातल्या धनिकांनी, संस्थानिकांनी, संपन्न सरदारांनी, संतांची पूजा भव्यतेने बांधली नाही. काही वर्षासने असतील, देणग्या असतील, नंदादीप आढळतात, पण डोळे दिपवणारी संतसेवेची आस्था, स्वार्थत्यागाची ईर्षा त्यांनी दाखविली नाही, हे खरे नाही काय? देवी अहिल्याबाईसारखे काही अपवाद आहेत. पण महाराष्ट संतांच्या वाट्यास त्यांचे औदार्य अत्यंत अल्प प्रमाणात आले ही गोष्ट खरी. 

 

या पाश्चिमात्य जगातल्या संतांची भव्यसुंदर स्मारकमंदिरे पाहिल्यावर आपल्या महाराष्ट्र संतांची झालेली उपेक्षा विंचवाच्या नांगीसारखी मराठी हृदयाला वेदना देऊ लागते व कटू विषण्ण विचार मनात येऊ लागतात.

 

उद्याच्या जगात, उद्याच्या जगातल्या काही भागात, संतांची ईशभक्ती कदाचित उपेक्षणीय ठरेल, पण त्यांच्या हृदयाची विशालता, दलित-दु:खीतांशी त्यांनी अनुभवलेले तादात्म्य, त्यांच्या जीवनातली ऋजुता, अंत:करणाची शांती ही मूल्ये कोणत्याही युगविशेषांत आदरणीय ठरतील. केवळ आर्थिकदृष्टीने सिद्ध झालेल्या साम्यवादाच्या संस्कृतीत देखील संतांची समत्त्वदृष्टी चिरवंद्य राहील, यात संशय नाही.

*****

पाश्चिमात्य लोक सर्वथैव जडवादी आहेत - ही आपली कल्पना किती चुकीची आहे?

ईश्वरनिष्ठा, विशेषत: संतसेवा युरोपीय संस्कृतीच्या रोमरोमांत भिनली आहे.

युरोपातल्या प्रत्येक राष्टांतले प्रत्येक शहर संत-मंदिरांनी सजलेले, श्रियाळलेले आहे. प्रत्येक शहराला एक एक संरक्षक संत आहे.

<strong>दु:ख, दैन्य, दारिद्य यांच्याशी सहवास, सहानुभूति व सेवावृत्ती दर्शवील तो संत.</strong>

युरोपीय संतांचे चारित्र्य सेवाधर्माने ओथंबलेले आहे.

<strong>संतजीवनाची निर्मिती हेच मानवी संस्कृतीचे साध्य आहे.</strong>

बुद्धीचा विशिष्ट तऱ्हेने विकास-विनयन करते ते शिक्षण; लढ्याचा विकास ज्या प्रकियेने होतो ती संस्कृती.

सुशिक्षित माणसे सुसंस्कृत असतातच असे नाही कारण त्यांचे हृदय शाळेत गेलेले असते.

संत-संगती, संत-सेवा व संत-वाङ्मयाची उपस्थिती या लढ्याचा विकास करणार्‍या पाठशाला आहेत.

बुद्धी व हृदय यांचा समप्रमाणात विकास झाला तरच मानवी जीवनाचे व मानवी संस्कृतीचे आदर्श स्वरूप प्रत्यक्षतेत अवतरेल.

केवळ बौद्धिक विकासाने माणसाचा राक्षस होतो.

आजचे आसुरी अणुयुग विषम प्रमाणात झालेल्या बुद्धीविकासाची फलश्रुति आहे.

संत-जीवनाचा आदर्श पुढे ठेवणे, हेच आजच्या जीवनातल्या समस्या सोडवणारे तंत्रशास्त्र आहे. अंतःकरणाची विशालता, हृदयाची श्रीमंती, निरूपचार प्रेम, दीनदु:खितांशी सहानुभाव, ही दैवी संपती संतजीवनातच आढळेल. तेथेच ती शोधली पाहिजे व आपण आत्मसात केली पाहिजे.

*****

गिओट्टोने चित्रित केलेले सेंट फ्रॅन्सिसच्या जीवनातले हे अठ्ठावीस प्रसंग श्रीज्ञानेश्वरांच्या हरिपाठांतल्या अठ्ठावीस अभंगांप्रमाणे भक्तीरसाने रसरसलेले आहेत.

त्याग आणि तपस्या, रूग्णसेवा आणि ऋजुता, पावित्र्य आणि प्रेम, शद्धा आणि सहजता, या अष्टांगांनी अलंकृत झालेले संतजीवन पाहिले की मनुष्यमात्राचे हृदय उदात्त ऐश्वर्याने म्हणजेच ईश्वरभक्तीने उचंबळून येते.

असताकडून सत्याकडे, अंध:काराकडून प्रकाशाकडे व मृत्यूतून अमृततत्त्वाकडे नेणारे संतचरणाचे दर्शन चुकलेल्या मानवाचा हा एकच अखेरचा आधार व शेवटचे शरण्यस्थान आहे.

स्वत: सेंट फ्रॅन्सिस, संतसेवेनेच मुक्त झाला. संतमंदिरे उभारण्यात त्याने आपले आयुष्य वेचले व युरोपच्या धर्मविचारांत आचारनिष्ठेला अमरस्थान निर्माण करून हा महानुभाव सदतिसाव्या वर्षीच मृत्यूलोकांतून अमृतत्त्वात विलीन झाला.

३ ऑक्टोबर १२२६ - जणू काय सायंसंध्येचे मंत्रोच्चार करीत द्विजगण आकाशात संचार करीत होते. त्यांचे पांढरे पंख एका नीलमेघाच्या कडेला चंदेरी काठ लावीत होते. त्या मेघाचे एकाकी सुवर्ण गोलात रूपांतर झाले -

सेंट फ्रॅन्सिसच्या जीवात्म्याने इहलोकाची याता संपवून शेवटचा निश्वास सोडला तोच तो निश्वास त्या कृष्ण-शाम मेघांत प्रथम विलीन होऊन नंतर तेजो-गोलाचे स्वरूप धारण करीत अनंततेत अंतर्धान पावला.

- धुं. गो. विनोद

सप्टेंबर १९५१

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search