साधना सूत्रे

स्फुरण-उपनिषद

जुलै १९६०(श्री ज्ञानेश्वर, कार्ल मार्कस् व हेगेल)

---------

विद्यमान मानवी जीवन सर्वतोपरी उध्वस्त झाले आहे.

याचे कारण मानवाच्या आन्तर जीवनांतल्या विसंगती म्हणजेच अन्तर्विरोध हे होय.

हा अन्तर्विरोध अनेक स्वरुपे धारण करतो. विकृतीरुप असणारा हा अन्तर्विरोध केवळ वैचारीक व बौध्दिक नसतो.

वैचारीक विसंगती, बौध्दिक समस्या ही विकृती नव्हे. मानवाची ती प्रकृती आहे. किंबहुना, मानवाच्या संस्कृतीचे उगमस्थान वैचारिक विसंगती हेच म्हणता येईल.

कार्ल मार्क्स या साम्यवादाच्या जर्मन प्रणेत्यांचे तत्त्त्वज्ञान वैचारिक विरोधांच्या अधिष्ठानावर उभारले गेले आहे.

वाद, प्रतिवाद व संवाद; आधान, प्रतिधान व सन्धान; थेसिस, अन्टिथेसिस व सिन्थेसिस ही कार्ल मार्क्सच्या तत्त्वशास्त्राची प्रसिद्ध प्रक्रिया आहे.

प्रथम, हेगेल या जर्मन तत्त्ववेत्त्याने या त्रिपदा गायत्रीचा विनियोग, मानवी इतिहासाचा अन्वयार्थ लावण्यासाठी केला. हेगेलच्या मते, मानवी इतिहास, मानवी उत्क्रांती किंवा विकास क्रम, वरील त्रिपदा गायत्रीप्रमाणे, त्रिविध पदन्यासाने होतो.

प्रथम एकाहे विधान केले जाते, याला `थेसिस' म्हणतात. नंतर ते विधान विराधिले जाते. त्याला `अन्टिथेसिस' असे म्हणतात. नंतर विधान व प्रतिधान यांचा समन्वय करणारे तिसरे तत्त्व उदित होते, त्याला `सिन्थेसिस' किंवा `सन्धान' असे म्हणतात. हेगेलने या प्रक्रियेने सर्व मानवी इतिहासाची संगति लावलेली आहे.

कार्ल मार्क्सने या प्रक्रियेला शीर्षासन घालण्यास लावले. त्याने हेगेलची सर्व पद्धती उर्ध्वमूल व अध:शाख करुन ठेवली.

कल्पना किंवा चैतन्य हे हेगेलचे विधान थेसिस किंवा प्रथम पद आहे. कार्ल मार्क्सने जडसृष्टी, बाह्यपदार्थ यांना प्रथम पद, अग्रस्थान दिले.

कार्ल मार्क्सच्या पद्धतीत कल्पना, विचार, ध्येय, अचेतन पदार्थांचे परिणाम आहेत, प्रतिक्रिया आहेत, पडसाद आहेत. हेतूला, मनाला, विचाराला, कल्पनेला दुय्यम स्थान असून सृष्टीला, वातावरणाला, भूगोलाला, बाह्य वस्तूच्या आघातांना कार्ल मार्क्सच्या मताने अग्रस्थान आहे. मानवी मनांत उत्पन्न होणाऱ्या आशा, अपेक्षा, आकांक्षा ह्या बाह्य वस्तु-सृष्टीच्या उत्तेजनामुळे निर्माण झालेल्या प्रतिक्रिया होत.

अन्न असते म्हणून भूक लागते, दृश्य वस्तू आहेत म्हणून डोळे निर्मार झाले.

विल्यम जेम्स या सुप्रसिद्ध मानसशास्त्राचा असाच एक विलक्षण सिद्धांत आहे.

तो म्हणतो, हसा म्हणजे आनंद होईल. रडा म्हणजे अश्रू येतील. अगोदर आनंद व नंतर हास्य, अगोदर दु:ख नंतर रूदन, असा अनुक्रम नसून गालांचे विस्फुरण झाले, ते रुन्दावले, म्हणजे आनंद निर्माण होतो. डोळयांत विशिष्ट तऱ्हेचें आकुंचन, प्रसरण झालें की अश्रू येतात व नंतर दु:ख होते.

आपणा सर्वांना हे ठाऊक आहे की, विशिष्ट अभिनयाने विशिष्ट वृत्ती निष्पन्न होऊ शकतात. पण आपल्या सर्व मनोवृत्ती केवळ अभिनयाचा परिणाम आहेत, हे म्हणणे खरे नव्हे. त्यातला अतिव्याप्ती दोष स्वयंस्पष्ट आहे.

अगदी तसेच, `अन्न असते म्हणून भूक लागते, किंवा अन्नसाधनांची सत्ता ताब्यात आली की, सर्व मानवी जीवन हुकमतीत आणता येईल.' या सिद्धांतातही अतिव्याप्ती आहे.

`भूक' हे मनुष्याच्या गरजांचे एक प्रतीत आहे. अन्न हे भूक भागविणाऱ्या साधनांचे प्रतीक समजावे. शारीरिक भुकेप्रमाणे बौद्धिक, आध्यात्मिक आणि नैतिक भूक असू शकते.

कार्ल मार्क्सच्या मते उदरांतर्गत क्षुधा एवढीच खरी भूक. इतर सर्व भूकेचे प्रकार ही उदरक्षुधेची रुपांतरे आहेत. बहुतांशी ही रुपांतरे आभासमय आहेत. खरी भूक एकच व ती अन्नाची. अन्नाची साधने हाती ठेवणे, म्हणजे सर्व मानवी क्षुधा, मानवी देह, मानवी कल्पना व मानवी संस्कृती हातात ठेवणे होय असे कार्ल मार्क्स म्हणतो.

उलटपक्षी हेगेल म्हणतो की, बुद्धीची व मनाची भूक, मानवी विचार, प्रतिभा व कल्पना यांना आद्यस्थान असून उदरींची क्षुधा, शारीरिक व्यापार आणि एकंदर बाह्य सृष्टी यांचे नियमन व अस्तित्व देखील, मानवी मनावर व बुद्धीवर अवलंबून आहे.

भारतीय दर्शन ग्रंथांत काहीशी हेगेलच्या भूमिकेसारखी `दृष्टी-सृष्टीवाद' ही भूमिका आहे. कार्ल मार्क्सच्या भूमिकेचा सृष्टी-दृष्टीवाद म्हणता येईल. अर्थात ही तुलना स्थूलमानाने घ्यावयाची.

या परिभाषेंत हेगेलचा `आयडियॅलिसम' म्हणजे दृष्टी-सृष्टीवाद किंवा `दृष्टी तशी सृष्टी' ही भूमिका होय.

कार्ल मार्क्सचा जडवाद म्हणजे सृष्टी-दृष्टीवाद किंवा `सृष्टी तशी दृष्टी' ही भूमिका होय.

दृष्टीवर सृष्टी उभारली जाते की सृष्टीवर दृष्टी अवलंबून असते, या प्रश्नावर हेगेल व कार्ल मार्क्स यांनी दिलेली ही पूर्णत: विरोधी अशी उत्तरे होत.

तथापि, त्यांचीच प्रक्रिया, त्यांच्या परस्परविरोधी दोन उत्तरांना लावता येईल.

हेगेलचे म्हणणें, हा `थेसिस'; कार्ल मार्क्सचे म्हणणे, हा `अॅण्टिथेसिस-प्रतिधान' या दोन्ही पदांचा समन्वय करणारें तृतीयपद किंवा सं-धान असू शकेल.

`स्फूर्ति' हा शब्द किंवा श्री ज्ञानेश्वरांचा `स्फुरण' शब्द वरील दोन्ही दृष्टीकोनांचा समन्वय करणारा आहे.

उत्तेज्य व उत्तेजक, ज्ञान व वस्तु, चैतन्य आणि दृष्टी आणि सृष्टी ही दोन्ही अंगे `स्फूर्ति' या तत्त्वांत होतात.

पुरुष व प्रकृति, चैतन्य व जड या दोहोंचीही उपस्थिती, स्फूर्ति किंवा स्फुरण या तत्त्वांत आहे.

स्फुरणांत गति व स्थिती या दोहोंचा प्रत्यय येतो. स्फुरण हे विशुद्ध गति नव्हे व विशुद्ध स्थिती नव्हे. मानवी जीवनांत व विश्वसंस्थितीत स्फुरण हे मूलतत्त्व आहे.

दृष्टी किंवा सृष्टी या द्वंद्वातील कोणत्याही एका पदाला अग्रस्थान नाही. त्या दोहोंचा समावेश करणारे स्फुरण हे अंतिम तत्त्वांचे स्वरुप आहे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search