साधना सूत्रे

शरणागति-योग

- १ -

ज्ञानदूताचे हे सातवे दर्शन आहे.

गेली सहा वर्षे प्रत्येक दीपावलीला उच्च सारस्वताचा एक अमृत-कुंभ घेऊन हा स्वर्गीय ज्ञानदूत महाराष्ट्र भूमीवर अवतरत असतो.

एक तारा त्या ज्ञानदूताला आमंत्रण देते. त्याचे भक्तिभावाने आगत-स्वागत करते.

अ-मित आनंद, अमर्याद उत्साह तिच्या मनांत, तिच्या शेजारी खेळत बागडत असतो.

- २ -

हे सर्व विश्व स-अन्त; सान्त आहे. प्रत्येक जीव, प्रत्येक व्यक्ति मर्यादित आहे. विश्वे हीदेखील असंख्य वाटली, तरी त्यांची संख्या मार्यादित आहे.

आपण सर्व स-अन्त, सान्त असल्यामुळे, मित असल्यामुळे अनन्तेकडे; अ-मिताकडे आपणा सर्वांची नैसर्गिक ओढ असते. प्रत्येक मित वस्तु, मर्यादित व्यक्ति, अ-मिताच्या शोधांत असते. अ-मिताकडे झेप घेत असते.

प्रत्येक सान्त वस्तू अनन्ततेचा एक भाग, एक अंश आहे; प्रत्येक मर्यादित वस्तूही अमर्याद अशा अ-मिताचा एक घटक, एक अंश असते.

अंश ही पूर्णाशी, वस्तूचा घटक हा घटित वस्तूशी, स्वभावत: संबद्ध असल्यामुळे, वेगळे असण्याचा रहाण्याचा त्याचा स्वभावच नसतो. आपण ईश्वराचे अंश व घटक असल्यामुळे ईश्वराकडे आपले सहज व स्वाभाविक आकर्षण असते. अतएव ईश्वराला शरण जाणे हा आपला स्वभावधर्म आहे.

 

- ३ -

`शरणागति' म्हणजे देवाला शरण येणे, शरण + आगति.

इतर सर्व शक्यता संपल्या की शेवटी मनुष्य देवाला शरण येतो. परमेश्वर हा अखेरचा आधार, शेवटचे `शरण्य' आहे हे सत्य पटते.

`शरण्य' हा शब्द अतीव मधुर आहे. जेथे आश्रय मिळतोच मिळतो तो शरण्य.

शरण्य या शब्दामधले माधुर्य कसे, केव्हा लक्षात येते?

जीव निराधार झाल्यानंतर सर्व न-कार, निराश व अंधतम निशा पत्ययास आली आहे; परमेश्वर हे एकच आश्रयस्थान उरले आहे; बाकी सर्व आशास्थाने नष्ट झाली आहेत; अशा परिस्थितीत अशा मनोवस्थेत, `शरण्य' शब्दांतले माधुर्य, आश्वासन; अमृतस्त्राव चाखता येईल.

आदिकवी वाल्मिकीने प्रभु रामचंद्राला `सर्व-लोक-शरण्याय' असे विशेषण देऊन, परमेश्वराच्या करूणास्वरूपाचे रहस्य प्रकट केले आहे.

सर्व लोकांचे अखेरचे शरण्य म्हणजे एक परमात्मा आहे. सर्व नाती, सर्व संबंध, सर्व लागे-बांधे यांनी निराशा केली आहे; सर्व मानवी प्रयत्न अ-सफल ठरले आहेत अशा क्षणी देवाचे स्मरण होते; आणि तेव्हांच, खरीखुरी आस्तिक्यबुद्धी जन्माला येते. तोपर्यंत देव असेल किंवा नसेल, अशी अ-निश्चयत्मिका वृत्ति असते; संदेह असतो.

विभिषण आपल्या सख्ख्या भावाला, रावणाला सोडून प्रभु रामचंद्राला `शरण' येतो; तेव्हा, आपला स्वीकार होईल की नाही; अशी त्याला शंका येते; त्यावेळी त्याचा मन:स्पंद असा असतो की प्रभु रामचंद्र `सर्व-लोक-शरण्य' आहेत; सर्व सर्व लोकांचे, पावनांचे व पतितांचेही अखेरचे आश्रयस्थान आहेत. ते माझा अव्हेर कसा करतील? हा मन:स्पंद श्री वाल्मिकीने `सर्व-लोक-शरण्य' हे विशेषण वापरून साकार केला आहे, साक्षर केला आहे.

 

- ४ -

शरण येणे, (आगति) ही क्रिया शरण जाणे (गति) या क्रियेहून वेगळी आहे.

`शरणागत' झाल्यावर, दुसरी गति शक्यच नसते.

शरण येणे म्हणजे पुन्हा कोठेही जाण्याची शक्यता नष्ट करणे. शरण आल्यावर `जाणे' थांबते; कायमचे थांबते.

शरण-आगति हा भाव ईश्वराच्या बाजूचा आहे. भक्ताच्या बाजूचा नव्हे.

देव म्हणतो, `हा भक्त मला शरण आला आहे, शरणागत आहे.' भक्त असे म्हणत नाही. `मी शरण गेलो आहे.' शरणागतीत `मी' हा भाग शिल्लकच नसतो. शरण्यांत विलय पावणे, आपला अहं नष्ट करणे अहंकाराला अणुमात्र अवसर न ठेवणे - हे शरणगतीचे मर्म आहे.

`फक्त तू आहेस. मी नाहीच मुळी' हा शरणआगताच्या अवस्थेचा, भूमिकेचा आकार आहे.

जो पर्यंत आपण दुसरे आधार शोधीत असतो, दुसऱ्या आधारांची कल्पना शिल्लक असते, तोपर्यंत ईश्वर-शरणगतीचा `योग' आपणांस साधला नाही.

खऱ्या प्रेमांत ही अशी शरणागति असते, समर्पण-योग असतो.

शंकराचार्य म्हणतात, `सामुद्रो हितरंग:। तरंग' हा समुद्रात राहतो. विशाल समुद्र हा लहानग्या तरंगांत कसा सामावेल !

अंशत: तो तरंगांत असेल, पण किती लहान अंश!

``न मामकीनस्त्वम् ।'' तू माझा नाहीस, मी तुझा आहे; व हे मला पुरे आहे.

 

- ५ -

शरणागतीचे एक महनीय तन्त्र आहे. या तंत्राला सहा अंगे आहेत.

आनुकूल्यस्य संकल्प: प्रतिकूल्यस्य वर्जनम् रक्षिष्यति इति विश्वासो गोपृत्ववरणं तथा आत्मनिक्षेप्रकार्पण्ये षड्विधा शरणागति: ।

शरणागतीत पहिला भाव आनुकूल्य आहे. ईश्वराला मी अनुकूल राहीन. ईश्वरत्वाचे ज्ञापक असे जे गुण प्रसिद्ध आहेत त्यांचा मी स्वीकार करीन. उदा. समबुद्धि, दयालुत्व.

दुसरा भाव, ईश्वरी गुणांना प्रतिकूल असेल त्याचा त्याग. उदा. असत्य व सर्व आसुरी प्रवृत्ती.

देव माझे रक्षण करील हा विश्वास, ही श्रद्धा, हे तिसरे अंग; व तू माझे रक्षण कर अशी आर्त व हार्दिक प्रार्थना हा चौथा पाद.

स्वत:चा व स्वत्वाचा संपूर्ण निक्षेप हा पाचवा व कार्पण्य किंवा दीनता व लीनता हा सहावा, असे एकंदर सहा भाव शरणागतीचे घटक भाव आहेत.

या षड्विध भावनेत दीनतेला विशेष प्राधान्य आहे.

`सा, विरहे तव, दीना' गीतगोविंदात जयदेवांनी या दीनतेचा निर्देश केला आहे.

आत्मनिक्षेपानंतर, प्रभुचरणी स्वत:ला निक्षिप्त केल्यावर, दीनतेची भावना सहजसिद्ध असते. निक्षिप्त झालेल्या जीवाला अहंकार उरणार कसा? कार्पण्यांत, दीनतेच्या वृत्तींत शरणागतीचे रहस्य आहे. बिंदूचा सिंधूत निक्षेप झाल्यावर बिंदू अन्तर्धान पावते.

`सकृदेव प्रप्रन्नाय तवास्मि इति याचते

अभयं सर्वभूतेभ्यो ददामि एतद्वतं मम ।'

अगदी एकदाही जो मला शरण आला आहे. `मी तुमचा आहे ना?' अशी ज्याने एकदाच याचना केली आहे. त्याला सर्व भूतांपासून अभय देणे हे माझे व्रत आहे.''

मर्यादा पुरुषोत्तम रामचंद्रांचे हे प्रतिज्ञा वचन आहे. भाष्यकारांनी `अभय' या शब्दाचा अर्थ मोक्ष असा केला आहे. `द्वितीयात् वै मयम्' - दुसरेपणापासून भय निर्माण होते. अद्वैत सिद्धी हीच खरी निर्भयता होय.

या दीपावलीच्या प्रतिपदेस एकदा, अगदी एकदाच, ईशचरणी प्रपन्न होऊ या; शरणागत होऊ या. प्रपत्ति या शब्दाचा अर्थ शरणागति असाच आहे.

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search