वैशाख शु.।।१५सोमवार दि.१३ मे १९५७ हा पंच पर्वणीचा दिवस आहे.
आद्य श्रीशंकराचार्य यांची पुण्यतिथी त्या दिवशी येत आहे.
भगवान् बुद्धांचा जन्म, साक्षात्कार व निर्वाण, त्याच दिवशी (वैशाख शु. १५ ला) झाले अशी बौध्दजनांची श्रध्दा आहे.
खग्रास चंद्र-ग्रहण त्याच दिवशी या वर्षी (शके १८७९) आले आहे.
खग्रास चंद्र-ग्रहण हे मनो-लयाचे भौतिक प्रतीक आहे.
श्री शंकराचार्यांची शांति-समाधि भगवान् बुध्दांची निर्वाण समाधि व चंद्राची म्हणजे सृष्टीच्या मनस्त्रत्त्वाची लय-समाधी या तीन घटना स्वरूपत: एकच आहेत. स्वरूपैक्य ओळखणे याचेच नाव ज्ञान किंवा ज्ञानाची अत्युच्च अवस्था.
स्वरूपत: सर्वसर्व एक आहे. भेद-प्रतीति ही दृष्टिनिष्ठ आहे, वस्तुनिष्ठ नाही. किंबहुना, व्यक्ति-गत व वस्तु-गत चैतन्य-तत्त्वे मुळात एकमेव एकच आहेत.
वस्तू किंवा दृश्य यांना स्वतंत्र सत्ता नाही. ती ज्ञानवृत्तीवर अवलंबून आहेत. ज्ञानवृत्ति देखील आगमापायी, म्हणजे येणारी-जाणारी आहे.
ज्ञान-शक्ति ही ज्ञान-वृत्तीच्याही मागे व अगोदर, मुल-कारणभूत व अधिष्ठानभूत अशी शक्ति आहे.
साक्ष देणाऱ्या माणसाप्रमाणे प्रत्यक्ष वस्तुस्थितीशी या ज्ञानशक्तीचा संबंध नसतो. म्हणून या ज्ञानाला `साक्षीज्ञान' म्हणतात. हे ज्ञान, वस्तुज्ञानाला व वस्तुवृत्तीला कारणीभूत असते - म्हणून ही ज्ञान - `शक्ती' आहे. केवळ ज्ञान-व्यक्ति नव्हे. प्रत्येक `ज्ञान शक्तीच्या' मागे असणारा स्थायीभाव म्हणजे ज्ञानशक्ती होय.
`साक्षित्व' या तत्त्वाचा शोध प्रथम आद्य श्रीशंकराचार्यांनी लावला.
साक्षित्वाच्या कल्पनेचा आढळ उपनिषत् ग्रंथातूनही होतो; पण तत्त्वशास्त्रातील व अनुभूतीयोगातली गुरूकिल्ली म्हणून त्या कल्पनेचा उपयोग व विनियोग प्रथम श्रीशंकराचार्यांनी केला.
अनश्नन् अन्य: परिचाक्रणीती । दुसरा पक्षी स्वत: फळे न खाताही तेज:पुंज दिसतो. एका झाडावर दोन पक्षी बसलेले असतात, एक खालच्या फांदीवर व दुसरा वरच्या फांदीवर. खालच्या फशंदीवरचा पक्षी फळे खातो; वरच्या फांदीवरचा पक्षी फळे न खाताही तेज:पुज असतो व दिसतो. (मुंडक. ३,१,१) उपनिषदातील या रुपकात वरच्या फांदीवरील पक्षी म्हणजे साक्षी-ज्ञान होय. श्रीशंकराचार्यांनी आपले साक्षित्व ज्ञानावर अधिष्ठित केलेले सर्व तत्त्वज्ञान या एका रुपकावरून उद्धृत केले असेल काय?
साक्षित्वाची भूमिका हेच जीवन्मुकतावस्थेचे स्वरूप आहे. साक्षित्वाची दृष्टि हाच मोक्ष.
भगवान बुद्ध निर्वाणाला गेले म्हणजे ते द्रष्टा म्हणून किंवा द्रष्टा-दृश्य व दर्शन या त्रिपुटीचा आकार म्हणून, मागे शिल्लक राहिले नाहीत; पण द्रष्ट्याच्याही मागे असणारे जे साक्षितत्त्व ते अढळ व अमर आहे. ते निर्वाणाला कधीच जाऊ शकत नाही. तेच ब्रह्म म्हणजे मूल्यत: सर्वांहून मोठे असे तत्त्व; ब्रह्म-निर्वाण म्हणजे ब्रह्मामध्ये त्रिपुटी भावांचा व अस्तित्वांचा लय ब्रह्मणी निर्वाणम् !
निर्वाणात शून्य आहे तर ब्रह्म निर्वाणात शांती आहे.