(जून - १९६४)
रोहिणी हे नाव आरोहणाचे, आक्रमणाचे प्रतीक आहे.
रोहिणीला आज सतरा वर्षे पूर्ण होऊन ती अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
श्रीमती निर्मलादेवींच्या कल्याणकारक राज हस्ताने रोहिणीच्या अठराव्या वर्षारंभ - अंकाचे प्रकाशन होत आहे ही गोष्ट रोहिणीच्या उज्वल भवितव्याचे एक बोलके `प्रसादचिन्ह' आहे. अठरा या संख्येतील दोन घटक अंकांची बेरीज नऊ होते. नऊ हा, संख्याशास्त्रांतील परमोच्य विकास बिंदू आहे. नऊ किंवा त्या आकड्याचे गुणाकार यांचेबद्दल गणित शास्त्रांत कित्येक चमत्कृति उपलब्ध आहेत.
अठराव्या वर्षी किशोर अवस्था संपून `स्त्री' `युवती' होते, स-ज्ञान होते. अधिकारिणी होते.
रोहिणीने आध्यात्माला, साधना-सूत्रांना, आपल्या प्रपंचात अग्रस्थान दिले आहे. आध्यात्म हे भारताचे व महाराष्ट्राचे स्वरूप लक्षण आहे. यामुळे भारताचे व महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व रोहिणीला प्राप्त झाले आहे.
गेल्या सतरा वर्षात रोहिणीने एक उच्च `आरोह' साधला आहे. तिचे जीवन वसंत ऋतुत व प्रत्यक्ष वसंत हस्ताने चिरंजीव वसंतराव कोण यांच्या हस्ताने सुरू झाले असल्यामुळे, आनंद नव-नवोन्मेष सळसळणारे चैतन्य ह्यासारख्या वसंत ऋतुच्या वैशिष्ट्यांचा लाभ तिला सर्वथैव होत राहील.
आरोहण आक्रमण जीवनो जीवनो अयनम् - अथर्ववेद (५/३०/७)
अथर्ववेदातील हा महामंत्र मानवी जीवनाचे अंत:स्वरूप दर्शवितो. वर चढणे, पुढे पाऊल टाकणे, ही जीवनमात्राची सहजगति आहे. आरोहण आणि आक्रमण ही, `जीवतो-जीवतो' म्हणजे प्रत्येक जीवमान व्यक्तिची, `अयन' म्हणजे सहजगति आहे. विकासोन्मुख असणे हे जीवंतपणाचे लक्षण आहे. ज्याचा विकास थांबला, वाढ थांबली त्याचा मृत्यू झाला. `रोहिणी' शब्दाचा अर्थ वर चढणारी, पुढे जाणारी शक्ति असा आहे.
`रोहिणी' शब्द `रूह्' या धातूपासून उद्भवला आहे.
रूह् धातूचा अर्थ वाढवणे, सदैव वाढत राहणे; प्रत्येक प्रत्ययावर अडचणींवर विजय मिळवणे असा आहे.
रूह् या धानूपासून `रूहा' हा शब्द साधित आहे. रूहा म्हणजे दूर्वा. दुर्वांकूर हा अमरत्वाचा द्योतक आहे.
दूर्वा ही कधीच नष्ट होत नाही.
प्रत्येक तुकड्यांतून, खंडातून ती पुन: पुन: उद्भवते. पुन: पुन: स्वत:चे पुनरुज्जीवन करणारी ही तृणलता वैदिक ऋषींनी मृत्युंजयाचे, अमरत्वाचे प्रतीक मानली हा साहजिकच आहे.
रोहिणी हा शब्ददेखील `रूह्' धातूपासून उद्भवतो. रूह् व रोहिणी हे दोनही शब्द एकार्थवाचक आहेत.
वैदीक वाङमयांत रोहिणी हा शब्द तांबड्या रंगाची गाय या अर्थी उपयोजिला आहे. `रक्ता-गौ' ही यशाची, सामर्थ्याची विजयाची बोध-खूण आहे.
रोहिणी हे सत्तावीस नक्षत्रातील चौथे नक्षत्र आहे. अश्विनी, भरणी, वृत्तिका व रोहिणी, रोहिणी नक्षत्र पाच तारकांचा पुंज आहे.
`चन्द्राची प्रियतमा' असा रोहिणीचा उल्लेख अनेक ठिकाणी आढळतो.
रोहिणी हे नितांत निष्ठेचे, एकाग्र श्रद्धेचे प्रतीक आहे. सत्तावीस तारकांपैकी कलकित झालेल्या चंद्राबद्दल एकनिष्ठा ठेवणारी एक रोहिणीच होती असा एक संकेत आहे.
प्रगतिला, विकासाला, आरोहणक्रियेला, एकाग्रता, नितांतनिष्ठा ही अतीव आवश्यक आहेत.
रोहिणी शक्ति ही अचल श्रद्धेशिवाय गतिमान होत नाही.
वसुदेवाची एक पत्नी व बलरामाची माता म्हणून रोहिणीचा उल्लेख भागवतात आहे. श्रीकृष्णाची ही सावत्र माता व देवकीची सपत्नी होय. एकनिष्ठ पतिप्रेमाबद्दल तिचीही ख्याती होती.
रोहिणी हे नक्षत्र पंच-तारकांचा पुंज असूनदेखील एकीकृत तेजाने, संयुक्त ज्योतीने चमकते. रोहिणी नक्षत्राचा प्रकाश किंचीत वरच्या बाजूस उर्ध्व दिशेस पसरताना प्रत्यक्ष दिसतो. कॅलिफोर्नियातील पॅलमोर येथील दुर्बिणीतून मी हे कौतुक न्याहळले होते. रोहिणी हे नाव उर्ध्व गतीचे द्योतक असल्यामुळेच त्या पंचतारकांचे तेज, उर्ध्वगामी संयुक्त ज्योतीस लावले गेले हे स्पष्ट आहे.
रोहिणी ही आयुर्वेदांत शुद्ध रक्त पसरविणारी नाडी म्हणून समजली जाते. अशुद्ध रक्तवाहिनीला नीला असे म्हणतात.रोहिणी मासिकाने गेली सतरा वर्षे महाराष्ट्रात विशुद्ध विचाराचे व भव्य भावनांचे रक्त पसरविले आहे.
विवाहासारख्या सामाजिक समस्या उकलण्यास रोहिणीने चांगलीच मदत केली आहे - करीत आहे.
- धुं.गो.विनोद