(रोहिणी-फेब्रुवारी १९४९)
पातंजल योगशास्त्रांत `प्रातिभ' नावाच्या एका भूमिकेचा उल्लेख आहे.
प्रातिभ म्हणजे चैतन्याचा एक अवस्थाविशेष आहे. या अवस्थेचा सर्वज्ञत्त्व हा स्वभाव होय.
मानवी बुद्धी पराकोटीला पोहोचली तरी तिला काही गहन अर्थांची ज्ञेयांची, विषयांची प्रतीती होत नाही.
असल्या अर्थांना परम अर्थ, परमार्थ असे म्हणतात.
लौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' इंद्रियोन्मुख व विषयोन्मुख बुद्धीला होते.
अलौकिक अर्थांचे `प्रत्यक्ष' आत्मोन्मुख बुद्धीलाच शक्य असते.
बुद्धी हेच अर्थज्ञानाचे व परमार्थ ज्ञानाचे साधन आहे, मात्र अर्थ-ज्ञ बुद्धी ज्ञानेंद्रियांचे सहाय्य घेते.
परमार्थ-ज्ञ बुद्धी कोणत्याही इंद्रियांचे, ज्ञानेंद्रियांचे देखील सहाय्य घेत नाही.
प्रकाशणे चमकणे हा रत्नाचा स्वभाव असतो; `क्रिया' नसते.
बुद्धीची क्रिया ज्ञानेंद्रियांशिवाय होत नसेल, पण बुद्धीचा स्वभाव, बुद्धीचा प्रकाश ज्ञानेंद्रियावर अवलंबून नाही.
बुद्धी आत्मोन्मुख होणे, आत्मसन्मुख होणे म्हणजे तिची इंद्रियनिष्ठा, ज्ञानेंद्रियावरील तिचे अवलंबन, नष्ट होणें.
बुद्धी आत्मोन्मुख झाली की तिचे खरे स्वत्व व मूलस्वभाव प्रकट होतो; किंबहुना आत्मोन्मुखता निष्पन्न करणे हेच बुद्धीचे स्वभावकार्य, अवतार कार्य आहे.
बुद्धीनेच आत्मदर्शन होते. पण या स्वभावसाफल्यात बुद्धीचा, एका अर्थाने अस्त होऊन जाणे आवश्यक असते.
विषयांचे दर्शन घडविणारी बुद्धी, तिला आत्मदर्शन होताच, विषयाकडे पाठमोरी होते. विषयोन्मुख बुद्धीची लक्षणे आपणास परिचित असतात ती लक्षणे, विषय परामुख बुद्धीला, आत्मसन्मुख बुद्धीला, कशी लावता येतील ?
तोंड फिरवल्यानंतर पाठ दिसते पण व्यक्ती तीच असते. तोंडाची लक्षणे ही पाठीची लक्षणे नव्हेत.
लक्षणे विविध असली, अनेक असली, परस्पर विरोधी असली तरीदेखील लक्ष्य एकच असू शकते.
जड विषयांचे आकलन करणारी बुद्धी, सन्निकर्षदोषाते, संपर्क-दोषाते जड समजली जाते.
अ-जडाचे, केवल चैतन्याचे, आत्मतत्त्वाचे दर्शन घेणारी बुद्धी अ-जड, चैतन्यरुप व आत्मगुणयुक्त का असू नये ?
जडाचे विहाळाने ती जड होते, तशीच चैतन्याच्या स्पर्शाने ती चैतन्यमय का होणार नाही?
जड विषयांचा व्यतिरेक व आत्मतत्त्वाचा अन्वय हे बुद्धीचे, उभयविद्य, जसे स्वभाव लक्षण आहे.
विषयांची वेगळीक व आत्मतत्वाशी सामारस्य हे बुद्धीचे अवतार कार्य होय.
विविध विषयांमधील मेद, बुद्धी दर्शविते, विषयश्रेणी व आत्मतत्व यातील मेदही बुद्धीच दर्शवू शकेल.
बुद्धीला हा मेद समजणे म्हणजेच बुद्धीचे, प्रातिभ अवस्थेत विकसन, पर्यवसान होणे.
प्रातिभज्ञान म्हणजे विषयांचे ठिकाणी असलेल्या कोट्यावधी गुणविशेषांचे ज्ञान नव्हे. तर विविध विषयांत आंतरभूत असलेल्या घटक द्रव्यांचे ज्ञान होय.
अर्थोन्मुख बुद्धिला गुणविशेषांचे ज्ञान होते.
आत्मोन्मुख बुद्धीला घटक द्रव्यांचे र्(ीीलीींरलिश) ज्ञान होते.
अर्थोन्मुख बुद्धीला इंद्रियांचे सहाय्य घ्यावें लागतें व त्यामुळे गुणविशेषांचे ज्ञान होतें; पण घटक द्रव्यांचे होत नाही.
द्रव्य एक असते गुण अनेक असतात.
आत्मसन्मुख बुद्धीला, सर्व वस्तूंना विषयांना अधिष्ठान मूल असलेल्या द्रव्याचा साक्षात्कार होतो.
विषयोन्मुख बुद्धीला भासमान होणाऱ्या अनेक गुण विशेषांचा आधार किंवा अधिष्ठान म्हणजे एकमेव चैतन्यद्रव्य होय.
आत्मोन्मुख बुद्धिला या अ-विविध चितद्रव्याची प्रतीती येते व तत्क्षणीच व्यतिरेकात्मक विषयोन्मुख बुद्धीचा विलय होतो.
अनेकाचा एकत्वाशी अन्वय साधून आत्मोन्मुख बुद्धी स्वत:च्याही विशेष अस्तित्त्वाचा निरास निष्पन्न करते.
बुद्धिज्ञानाच्या स्वरुपाचे ज्ञानही बुद्धीलाच होते व या `ज्ञान-ज्ञानाच्या' उपलब्धीत बुद्धीचे स्वभाव-साफल्य आहे.
बुद्धीला बुद्धीची ओळख पटणे, स्वस्वरुप समजणें, ज्ञानभावाचे ज्ञान होणे, ज्ञानाचे मूलस्वरुप समजणे, हाच मोक्ष होय.
`ज्ञानान्मोक्ष' हा श्री शंकराचार्यांचा सिध्दांत किंवा `प्रातिभात् वा सर्वम्' ही भगवान पतंजलीची योगसिद्धी अशा तऱ्हेने अनुभवावयची असते.
- धुं.गो.विनोद