१३) (महाराष्ट्राचे थोर तत्वज्ञ, श्रीजगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद यांचा नवमहाराष्ट्रला व त्याच्या निर्माण-कर्त्यांना आशिर्वाद व मार्गदर्शन)
लेखक : श्री जगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद, पुणे.
लतो राष्ट्रं, बलम्, ओजश्च जातम् । (अर्थववेद १९, ४१, १)
`राष्ट्र शब्दाचा वैदिक अर्थ भास्वर तेज असा आहे. आदित्याचे तेज, द्वादश आदित्यांचे तेज, कोट्यावधी सूर्यांचे तेज, वीर पुरुषांचा प्रभाव आणि असह्य, दुर्धर्ष, अपत्रिषेध्य दुर्दमनीय असे सामर्थ्य, या सर्व अर्थच्छटा `राष्ट्र' शब्दांत गर्भित आहेत.
`महाराष्ट्र' शब्दाचा, महत्तम तेज, उत्कट व उत्कृष्ट अन्त: शक्ती, हा स्वयंभू हा स्वत:सिद्ध अर्थ आज अक्षय्य तृतीयेला स्वयंप्रकाशाने पुन:श्च तळपत आहे.
महाराष्ट्राचे भास्वर व भास्कर तेज इतिहासाच्या अनेकानेक पृष्ठांना उजाळा देत आले आहे.
श्री शिवाजी व श्री समर्थ यांचे संयुक्त जीवन म्हणजे आदर्श मानव, संपूर्णत: विकसित मानव होय. देव व परिपूर्ण मानव यांच्या मधले अद्वैत, जगांतल्या सर्व धर्मज्ञांनी व तत्त्व द्रष्ट्यांनी मान्य केले आहे.
श्रीसमर्थांनी शिवप्रभूला स्फूर्ति दिली व शिवप्रभूंनी केवळ `कृती' केली, असे म्हणणे हे गाढ अज्ञतेचे लक्षण आहे.
स्फूर्ति व कृति यांच्यामध्ये यथार्थ भेद न्यायत: करता येत नाही. स्फूर्तिशिवाय कृती नसते व कृतीशिवाय स्फूर्तिला स्वरुप नाही.
शिवाय स्फूर्ति ही देखील एक कृतीच आहे. स्फूर्ति हे कारण असते त्याचप्रमाणे ते एक कार्य, तो एक परिणामही आहे. स्फूर्ति पूर्व मन:स्थिती, स्फूर्तिला जन्म देणारी उत्तेजक आंतर-अवस्था, हे `कारण' स्फूर्तीलाही आवश्यक आहे.
स्वत:च्या किंवा स्वेतर दुसया आदर्श व्यक्तींच्या कृती, हेच आपल्या स्फूर्तीचे कारण नेहमी असते, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.
जल आणि प्रवाह, प्रकाश आणि किरण यांच्या ठिकाणी असलेले अद्वैत, स्फूर्ती व कृती यांच्यामध्ये आहे.
श्रीसमर्थ व श्रीशिवराय हे परस्परांचे स्फूर्तिस्थान व कृती सामर्थ्य होते हेच अंतिम सत्य होय. त्यांच्यामध्ये द्वैत कल्पिणें सर्वथैव घातुक आहे, कारण त्यांत जातीय-वादाचे मूळ आहे.
श्रीसमर्थ व श्रीशिवराय यांचे अद्वैत आजच्या अ-क्षय मुहूर्तावर आपण अ-क्षय्यपणे ठोकविले पाहिजे.
हे अद्वैत, महाराष्ट्रीयांच्या मनात चिरस्थिर राहिले पाहिजे.
`मराठा तितुका मेळवावा' या समर्थश्रुतीचा अर्थ `मराठा' म्हणजे `अ-ब्राह्मण' तेवढा मेळवावा असा असणे शक्य तरी आहे काय?
त्यांच्या मनात मराठा म्हणजे `महाराष्ट्रीय' हा एक लौकिकार्थ होता.
शिवाय, त्यांच्या मनातला `अ-लौकिक' अर्थ असा होता की ज्या ज्या व्यक्तींच्या ठिकाणी `महा-राष्ट्र' म्हणजे `महतीय-तेज' असेल, त्या त्या व्यक्तींचा संग्रह करा.
श्रीसमर्थांबद्दल कित्येकवेळा काही अनभिज्ञ व्यक्ती अनुदार उदगार काढताना आढळतात. ``त्यांच्या ठिकाणी जातिब्राह्मण्याचा अहंभाव होता.'' ``त्यांची शिकवण प्रामुख्याने ब्राह्मणांसाठी आहे'' इत्यादी.
मला वाटते समर्थांचे अंत: क्षितीज विश्वव्यापी, सर्वव्यापी होते. बाल्यावस्थेत ते `चिन्ता करतो विश्वाची' अशी पक्ति सांगू शकले ही गोष्ट काय दर्शविते?
`मराठा तितुका मेळवावा' या त्यांच्या उक्तितील `मराठा' हा शब्दच काय सुचवितोते आपण लक्षांत घेऊ या. `ब्राह्मण तितुका मेळवावा' असे त्यांना म्हणता आले असते.
एकंदर समर्थ वाङमय हा एक अगाध महोदधि आहे. त्यांत चांगले अवगान केल्यावर श्रीसमर्थाच्या विशाल विश्वप्रेमाची व `सर्व-ब्रह्म-भावात्मक' वृत्तीची खात्री पटते.
त्यांच्या ठिकाणी मर्यादित जातिब्राह्मणाचा आरोप करणे म्हणजे स्वत:च्या क्षुद्रत्वाची साक्ष देणे होय.
वर्णाश्रम धर्म किंवा चातुर्वर्ण्य, समाजाच्या धारणेला आवश्यक आहे. अशी अर्थातच त्यांची निष्ठा होती पण ती तात्विक स्वरुपाची होती, अशी निष्ठा भगवान श्रीकृष्ण मनु, याज्ञवल्क्यही स्मृतिकार, यांचीही होती इतकेच काय प्लेटो, एच्. जी. वेल्स व विद्यमान तत्त्वज्ञ जेराल्ड हर्ड यांचीही आहे, असे दिसते.
प्लेटोने आपल्या आदर्श राज्यरचनेत विविध पुरुष व विविध कर्मक्षेत्रे यांचा निर्देश केला आहे. सत्त्व, रज, तम हे त्रैगुण्य सांगणारा सांख्य-दर्शनकार कपिल याने त्रैवर्णिक समाजरचनेचे मूलसूत्रच सांगून ठेवले आहे.
जाति-तत्व म्हणजे जातिभेद, जातिवाद, जातिद्वेष नव्हे. जाति वैविध्य हे समाजाची संपन्नता वाढवणारे आहे. वस्तुत: जाति तत्वाने समाजाची एकात्मता दृढतर होते. मूलभूत एकतेची विस्मृती होणे हे एक जातीय समाजांत देखील शक्य असते.
परक्या जातीशी कलह होतात व स्वकीयात ते होत नाहीत असे आपण म्हणू शकू काय? जातिभेदाने भारताचे पतन झाले नाही असे म्हणण्याचा माझा आशय नाही, पण खरे कारण त्याहुन खोल आहे. `वैयक्तिक' जीवनाचे नैतिक अधिष्ठान ढासळणे हे खरे कारण होय.
पारतंत्र्य, दारिद्र्य, शुचिर्भूत नेतृत्वाचा अभाव, इत्यादी गोष्टींमुळे काही काळ भारतीय समाज पतित झाला होता. आता जातीयवादाच्या पगड्यातून त्यांची झपाट्याने सुटका होत आहे. `जाति' अटळ आहे. पण जाति-भेद जाति-द्वेष व जातिवाद अटळ नाहींत. त्यांचा नाश झालाच पाहिजे. ब्राह्मण आणि मराठा यांच्यामध्ये भेद, द्वेष व वाद यांचा मागमूसही राहता कामा नये. महाराष्ट्र धर्म हा तेजस्वितेचा धर्म आहे. मनस्वी, तेजस्वी व ब्रह्मवर्चस्वी असे हे महाराष्ट्रीयांचे मानव कूल आहे.
मराठा म्हणजे महाराष्ट्रीय आणि महाराष्ट्रीय म्हणजे महा तेजाचा धारक.
महाराष्ट्राचे भौगोलिक वैशिष्ठ्य व सौंदर्य, महाराष्ट्राच्या इतिहासाचे अलौकिकत्व, महाराष्ट्रीयांची कणखर बुद्धिनिष्ठा ही मानवी जीवनाची व मानवी संस्कृतीची वैभवे आहेत. तरीही आपण लक्षात ठेवले पाहिजे की महाराष्ट्राच्या भौगोलिक सीमा महाराष्ट्रीयांना व महाराष्ट्राला तुरुंगात टाकत नाहीत.
जेथे जेथे महाराष्ट्र आहे तेथे तेथे महातेज आहे. महाराष्ट्रीय हा महातेजस्वी असणारच.
पण जेथे जेथे महातेज असेल तेथे तेथे महाराष्ट्र आहे व जो जो महातेजस्वी असेल तो तो महाराष्ट्रीयच आहे, हा सिद्धांत ओळखण्याची व आचरण्याची वेळ आज आली आहे.
जो जो महाराष्ट्रीय आहे तो तो मराठा आहे. महाराष्ट्रातला तो मराठा. जाति-ब्राह्मण नकोत आणि जाति-मराठाही नकोत आता फक्त महाराष्ट्रीय पाहिजेत. संयुक्त महाराष्ट्र आज अवतरला आहे. महाराष्ट्रीयांनी यापुढे संयुक्त असणे व राहणे क्रमप्राप्त आहे. मराठ्यांना म्हणजे महाराष्ट्रीयांना क्षुद्र मर्यादा रुचत नाहीत व पचत नाहीत. यापुढे महाराष्ट्रीयांनी आपले महातेंज भारतात व जगांत प्रकटवले पाहिजे.
संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन हे प्रांतनिष्ठ केव्हाही नव्हते, ते न्यायनिष्ठ व तत्त्वनिष्ठ होते.
अन्याय व अत्याचार यांचे विरुद्ध, तत्त्वनिष्ठ तेजस्वितेची ही एक भडकलेली महा-ज्वाला होती. ती अयशस्वी होणार कशी? अग्निज्वालेची राख कधीही होत नसते. महाराष्ट्र म्हणजेच महाज्वाला!
त्या यज्ञ ज्वालेला माझी चिरं-प्रणति, अखंड, अष्टांग नमन.