(ले. अध्यात्म-महर्षि, न्यायरत्न डॉ. धुं.गो. विनोद)
जीवन हे विविध ध्येयांचे एक तंतुजाल आहे. एक मात्र ध्येय असणे ही गोष्ट केवळ सापेक्षत: खरी असते. निव्वळ एकच एक हेतु असणे हे असंभवनीय आहे. कारण त्या हेतूचे उदय, विकास व साफल्य अनेकानेक इतर हेतूंशी संबद्ध असतात.
एका हेतूंतून दुसया हेतूचा उद्भव होतो व दुसरा हेतूचा उद्भव तीन तऱ्हांनी होत असतो. एका हेतूची पूर्ती झाली की त्या पूर्तीतूनच दुसरा हेतू जन्म घेतो. विवाह-हेतू सिद्ध झाल्यावर नैसर्गिक तऱ्हेने संततीची इच्छा उत्पन्न होते. एक हेतू निष्फल झाला तर त्या निष्फलतेतूनही दुसरा हेतू निर्माण होतो. विवाहाच्या बाबतीत निराश झालेला `एकच प्यालातला' भगीरथ उच्च महत्त्वाकांक्षेने उत्स्फूर्त होऊन देशसेवेचे ध्येय स्वीकारतो. क्वचित एखाद्या हेतूची सफलता अगर निष्फलता निश्चित होण्यापूर्वीच ध्येयान्तर होते. देशास स्वातंत्र्य मिळवून देण्याकरीता सुरू झालेल्या योगाभ्यासाने पर्यवसान आमरण ईश्वरोपासनेत होते. उदा. श्री. अरविंद घोष.
अशा तऱ्हेचे ध्येयान्तर नैसर्गिक आहे. एकच ध्येय जीवनाच्या विशाल दृष्टीपुढे ठेवणे हे केवळ अवघड नसून अशक्य आहे! चर्मचक्षूला देखील एका केंद्रावर स्थिर करता येत नाही. वस्तू एकमेवतेने दिसणे कधीच शक्य नसते. एकंदर दृश्य वर्तुलातील विशिष्ट वस्तूला आपण सापेक्षतेने एकमात्र दृष्टीविषय कल्पितो. प्रत्येक दृष्य वस्तु अनेक वस्तूंशी संबंद्ध असते. विविध ध्येयांनी स्फूर्त असलेल्या जीवितांतील निरनिराळे अनुभव `स्वार्थे' मूल्यवान कधीही नसतात. प्रत्येक अनुभव `परार्थे' मूल्यवान असतो. त्या अनुभवाची सफलता दुसया एखाद्या अनुभवाच्या पोषकतेत असते.
अनुभवाची व्यवस्थिती मनुष्य बुद्धीद्वारा करतो. बुद्धी हे इंद्रिय अनुभवांचे नियमन करीत असते.
अनेक वस्तूंचे परस्पर संबंध व पोष्य, पोषक भाव निश्चित करणे आणि अधिकांत अधिक, व शक्य तितक्या उच्च उदात्त हेतूंना फलक्षम करणे हे बुद्धीचे कर्तव्य होय. बुद्धी ही अनुभवाच्या अंगोपांगातील तारतम्य ओळखते, निवड करते व यथोचित योजना करते. बौध्दिक व्यापार हा अन्वय व्यतिरेकात्मक, ऐक्य-भेद दाखविणारा म्हणजे व्यवस्थापक असतो.
एकंदर अनुभवाचा बुद्धि हा नेत्र होय.
बुद्धीच्या अध्यक्षतेखाली जीवनाचा व्यापार सुरळीत चालू शकतो. बुद्धीच्या अभावी अनुभवाच्या निरनिराळया अंगांमध्ये सुत्रकता रहाणार नाही. अनुभवांची अंगोपांगे सुसंगत नसतील तर जीवन संगीत बदसूर होईल.
बुद्धि हे मनुष्याचे वैशिष्ट्य होय पण बुद्धीने जरी अनुभवात सुसंगती आली, तरी त्या अनुभवाचे व सुसंगतीचे मूल्य, बुद्धी-दत्त नसते. बुद्धी ही दृष्टी आहे. ती फक्त मूल्य ओळखते. मूल्य उत्पन्न करीत नाही. बुद्धीन मूल्यांचे तारतम्य ठरेल, पण मूल्यांचा अविर्भाव केवळ बुद्धिव्यापारामुळे सिध्द होत नाही. मानवी जीवीत प्रगत व सुसंस्कृत झाले आहे, यांचे कारण बौद्धिक अनुभव असेल, पण संस्कृतीचे, सदाचाराचे, सौंदर्याचे `मूल्य' आपणांस वाटते, ते बुद्धी प्राप्त नाही, भावना प्राप्त नाही व वासना प्राप्तही नाही.
भावना ही वि-ज्ञात मूल्यांना चिकटून बसते. त्यांना अनुभवात स्थापण्याचा प्रयत्न करते. वासना ही मूल्यांना प्रत्यक्ष अनुभवांत आणण्यास धडपडते. पण बुद्धी, भावना व वासना या तीनही अंगात मूल्यांची उत्पत्ती होत नाही. मग मूल्यांचे उगमस्थान कोणते ?
शुक्राचे तेज जसे एकंकार असते. पारिजात पुष्पांचे सौंदर्य जसे पाकळी पाकळीत असते, कवितेतील काव्य जसे शब्दाशब्दांतून उमलते, त्याचप्रमाणे मूल्य हे अनुभवाच्या सर्वांगातून व संयुक्त स्वरुपामध्यें प्रगटते.
जीवनाच्या काही निवडक भागांनाच मूल्य असते, असे नव्हे. रम्य बालपण देवाजवळ फिरून मागावेसे वाटले, म्हणून तारुण्याला किंवा वार्धक्याला काहीच मूल्य नसते, अशातला काही भाग नाही. मूल्यांत जाती असतील, पण अनुभवांचे कोणतेही अंग निर्मूल्य असणार नाही.
अनुभवाच्या सदाफुलीचे पुष्प निर्मूल्यदशेत किंवा निर्माल्यदशेत केव्हाही व कोठेही आढळणार नाही, क्षणोक्षणी अभिनव रूप-सौंदर्य दाखविणाया जीवन-पुष्पाचा मूल्यसौरभ सदा-सर्वकाळ व सर्वत्र दरवळत असतो. अनुभव म्हणजे सुखदु:खाच्या उभ्याआडव्या धाग्यांनी विणलेला वस्त्रपट आहे. दु:खाच्या अनुभवांतही मूल्य असतेच, बहुधा अधिकच असते.
बुद्धी, भावना किंवा वासना यातील कोणीही मूल्योत्पत्ती करू शकत नाही.
बुद्धी मूल्य-मापक आहे. भावना मूल्यस्थापक आहे व वासना मूल्य-व्यापक आहे.
मूल्यांची उत्पत्ति सर्व अनुभवांतून एकरूपतेने होते. सर्व अनुभव संपूर्णत: मूल्यनिष्पत्ति करतो. अनुभव चिरकाल मूल्यनिष्पत्ति करीत आहे. त्या मूल्य-निष्पत्तीची जाणीव होत राहणे म्हणजेच आध्यात्मिक साधना. अनुभवांचे `मूल्य अनुभविणे' म्हणजेच आध्यात्मिक जीवन होय. सौंदर्य दर्शनाने किंवा सत्यज्ञानाने जो मूल्यानुभव येतो र्ींरर्शीश शुशिीळशलिश तो अनुभव सर्व जीवनात जीवमान व जागृत ठेवणे म्हणजे जीवन्मुक्ती.
सौंदर्य-दृष्य डोळयाआड झाले तरी त्याचे मूल्य आपणांस प्रतीत होते. सौन्दर्यानुभूतीने त्या मूल्याचा साक्षात्कार आपणांस क्षणभर होतो; पण तो क्षण गेल्यावर जे शब्दातीत `काहीतरी' अनिर्वचनीय `किमपि' आपण अनुभवल्यासारखे वाटते तेच अनन्ततेचे दर्शन, तोच सच्चिदानंदाचा ओसरता साक्षात्कार होय.
सर्व जीवनातला तो सखोल अनुभव ओळखणे, ही साक्षित्वाची भूमिका. तो मूल्यसाक्षात्कार स्थल-कालातील असल्यामुळे सर्व जीवन अशा तऱ्हेने व्यतीत झाले तर सुख-संशोधक वासनांचे बीज शिल्लक राहणार नाही व पुनर्जन्माची भीतीच वाटत असेल, तर त्यापासूनही सहज सुटका होईल.
अनुभव सर्वत: मूल्यनिष्पत्ति करीत असतो, पण अनुभवाची ही मूल्य-निष्पत्ति प्रतीतीस न येण्याचे मुख्य कारण म्हणजे मानवी बुद्धीचा उपयुक्तता-वाद.
वस्तूंचे मूल्य आपण बहुधा तिच्या किंमतीवरून व उपयुक्ततेवरून ठरवित असतो. ही किंमत व उपयुक्ततासुद्धा आपल्या शारीर व बहिर्मुख जीवनाच्या दृष्टीने बहुतांशी ठरली जाते. उपयुक्ततेची दृष्टी राहणे नैसर्गिक आहे; कारण बाह्य परिस्थितीशी योग्य योजना न झाली तर आपली जीवनसिद्धी होणार नाही. पण वस्तूची किंमत िळीलश निराळी व मूल्य र्ींरर्शीश निराळे, हे आपण कधीही विसरता कामा नये.
येथे असा प्रश्न उद्भवेल की, व्यक्तिमात्राची जीवन-सिद्धी जर परिस्थितीवर सर्वस्वी अवलंबून असेल तर तिला व्यक्तीचे जीवन हे नांव कसे देता येईल? पण जीवन-सिद्धी ही काही शून्यांत होत नाही. सिद्धीस साधने आवश्यक असणारच. बाह्यान्तर परिस्थिती केवळ साधन म्हणून उपयोजिली जाते. व्यक्तीच्या अनुभवाला उपकारक होत असलेल्या अनन्त साधनांनी अनुभवाची स्व-तन्मता बाधित होणार नाही. व्यक्तीच्या स्व-तन्त्रतेला अपकारक होईल अशी एकच गोष्ट आहे; ती म्हणजे दुसया व्यक्तीचे, स्वत:ची इच्छा नसताना जड साधन होणे.
बाह्य-परिस्थिती माझ्या जीवन-सिद्धीला साधनभूत आहे. मी बाह्य परिस्थितीला साधनभूत नाही. परिस्थिती स्वरूपत: जड आहे. तिला मी स्वच्छेने वापरतो. परिस्थितींची विशिष्ट अंगे मी स्वत:च निवडतो व माझ्या अनुभवाच्या बुद्धी-सिद्धीसाठी त्यांची उपाययोजना करतो. आता ही उपयोजना करताना माझी दृष्टी केवळ बहिर्मुख व शारीरिक राहिली तर माझे मानसिक व बौद्धिक जीवन, शारीर जीवनाचे एक जड साधन झाले. शारीरिक गरजांपुढे मानसिक व बौद्धिक गरजा वाकविल्या गेल्या. माझे मानसिक व बौद्धिक जीवन एक जड उपकरण झाले, तर माझ्या अनुभवांची मूल्य-ग्राहक धार बोथट होते. मग वस्तूंची व माणसांची किंमत तेवढी लक्षात येते. मूल्य समजत नाही. हा मूल्य-अंधतेचा शाप जन्मान्धतेच्या शापाहूनही अधिक भयानक व खडतर आहे.
माझे ध्येय हे असावे की मी पूर्णत: स्वतन्त्र राहीन. माझा सर्व अनुभव साध्यरूप असेल, तो दुसया मानवाचे जड साधन केव्हाही होणार नाही. माझ्या बुद्धीला पटल्यावर मी अवश्य `साधन' होईन, उपकरण होईन, पण तेव्हा मी जड नसतो. स्वतन्त्र असतो.
हे ध्येय साधावयाचे असेल तर केवळ शारीरिक जीवनास उपकारक असणारा उपयुक्ततावादही मला विसरावा लागेल.
शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक अशा जीवनाच्या तीनही अंगांना एकदम पोषक होणारा उपयुक्ततावाद हाच अध्यात्म-वाद आहे.
व्यक्तीला, अव्यक्तांत, स्थूलाला सूक्ष्मांत, जडाला चैतन्यांत पर्यवसित करणारी ही शक्ती अनुभवाच्या केवळ शारीरिक अगर मानसिक अंगात वास करीत नाही. तिचा उगम अनुभवाच्या अतीन्द्रिय किंवा आध्यात्मिक अंगात असतो.
केवळ शारीर अगर मानस-दृष्टीने विचार करू लागल्यास जीवित हे जड परिस्थितीचे अवश्याभावि फल आहे असे वाटते व ते तसे असतेही. जड शरीराचे अस्तित्व जड परिस्थितीतूनच निघणार. समष्टी मन हे व्यक्तीच्या मनाचे कारक हेतू असेल.
पण समष्टी मन देखील जड-रूपच असते व यष्टी मनही त्या जडाचेच फलित असते.
ज्या तऱ्हेच्या सामाजिक विचारांचे वातावरण मजभोवती पसरलेले असेल, त्याच तऱ्हेचे विचार माझ्या जीवनांत वावरत असणार.
आपण मानसिक म्हणजे आध्यात्मिक समजतो. पॅसिफिक महासागरामधील मी पाहिलेल्या बेटांवरच्या काही रानटी जातीत शारीरिक म्हणजेच मानसिक जीवन समजले जाते.
आपल्या बुद्धीची मंडूक प्लुति मानसिकापलीकडे क्वचितच जाऊ शकते.
अध्यात्म म्हणजे `यतो वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह।' `मानसिकाच्या सीमेपलीकडे अध्यात्म आहे. विचार-विकारांचे जड स्थंडिल म्हणजे मन. तेथे धडधडणाया अध्यात्माच्या यज्ञाग्नीचे स्वरूप जड-स्थंडिलाहून अतिविलक्षण असणारच.
मूल्यांचा खरा उगम अति-मानस कक्षेत आहे. शरीर, कर्मेन्द्रिये, ज्ञानेन्द्रिये मन व बुद्धी यांचा एककार याला आपण जीवात्मा समजू या. मानवी जीवन हे साकल्य म्हणजे कोणताही एक अवयव नव्हे व त्या अवयवांची नुसती गोळाबेरीजही नव्हे. समग्रतेत सामूहिक अवस्थेत एक अभिनव शक्ती उदित होते.
आि िसीरळिीा ळी ािशी ींहरि ींहश र्ीीा षि ळींी रिीींी.
जीवात्म-तत्त्व ओळखण्याचा हा एक सुलभ मार्ग आहे. सर्व घटक पदार्थांच्या बेरजेत तो नसतो. पण बेरजेमुळे तो उदित होत नसतो. मूल्य-ज्ञान त्या जीवात्म-तत्त्वाला होते. ती साकल्यात्मक दृष्टी, ती सिद्धी आपण मिळवू या, सौंदर्याची अल्प दर्शने, संगीताचे हवेत रंगणारे आलाप, सायाचे, निरूप्रचार प्रेमाचे, त्यागाचे अल्प-स्वल्प पण उज्ज्वल आविष्कार, यांनी आपले जीवन आपण समृद्ध करू या.
लहानांतल्या लहान, इवल्याल्या मूल्यांची दीप्ति ओळखणे, त्या पणत्यांची पंक्ति डोलवीत राहणे ही जीवनाची खरी दिवाळी, दीपावली आहे.