नैतिक व आध्यात्मिक मूल्यांच्या अधिष्ठानावर मानवी जीवनाची वैयक्तित पुनर्रचना हे विश्वशांतीचे बीज आहे.
मानवमात्राचे, स्वत:च्या प्रयत्नाने, स्वत:च्या ज्ञानजन्य वैचारिक पुनर्जन्म याच जन्मात सिद्धविला पाहिजे.
द्विज-त्व हा प्रत्येकाचा जन्मसिद्ध हक्क आहे.
जीवनाच्या मूलभूत तृष्णांमध्ये विसंगती निर्माण झाल्यामुळे मनुष्य दुर्वृत्त व व्यसनाधीन होतो.
युद्ध हा एक मोह व व्यसन आहे. मोहमूढ व व्यसनाधीन अवस्थेतदेखील सुखोत्पत्ति होत असताना त्याच्या अंत:करणात एक पाल चुकचुकत असते.
ती म्हणते, `हा आत्मघात आहे; हे सुख नव्हे - हा सुखाचा आभास असून खरोखर हे हालाहाल विषाचे घुटके तू गिळीत आहेस.'
आंतर जीवनातील विसंगती व मूलभूत आंतर-विरोध नष्ट झाल्याशिवाय व केल्याशिवाय, व्यसनाची किंवा मोहाची मनावरची पकड सुटू शकत नाही.
व्यसनाशी सन्मुख सामना देणे हिताचे नसते. गनिमीकाव्याने त्याला चेचले पाहिजे.
आपली चित्तशक्ती दुसया कोठेतरी अन्यत्र केंद्रित करावी. एखादे ध्येय, एखादी उपासना, एखादे महत्कार्य अंगीकृत करावे व इतक्या परिपूर्णतेने त्यामध्ये समरस व्हावे की व्यसन-विषयाचा आठव देखील होणार नाही.
व्यसनाचा आठव राहता कामा नये. व्यसनाशी झगडताना हा आठव वाढत राहतो व त्यामुळे आपली चित्तशक्ती म्हणजे चित्शक्ती व्यसनाला आपोआप मिळत राहते.
व्यसनाव्यतिरिक्त अन्य कल्पनेला पूर्णत: आत्मनिवेदन करणे ही प्रक्रिया कोणत्याही व्यसनाला ताळयात आणू शकते. एखादी संस्था किंवा एखादा ध्येयवाद आत्मसात करावा. पूर्णपणे त्या स्थंडिलावर आत्मनिवेदन करावे म्हणजे क्रमश: कोठलेही व्यसन आपोआप गळून पडते!
निवेदित व समर्पित जीवन असेल तरच ते पूर्णत: निर्व्यसनी होऊ शकते व राहू शकते.
तो पुनर्जन्म, ती आंतर-जागृती ते समर्पण सिद्धविण्याला अनुकूल वातावरणाची आवश्यकता असते.
बाह्य विषय ज्ञानातच आले नाहीत, की त्यांचे ध्यान होत नाही, ध्यान नसले म्हणजे संगती घडत नाही व संगती नसली की वासना स्थिरावत नाहीत.
वस्तुनिष्ठ व बहिर्मुख असणारी अंत:करणातील वृत्ती पुन: पुन: त्या वस्तूकडे जात राहिली की, हा अनुभव स्थिरावतो, बसतो. जी वृत्ती स्वत:ला बसविते, बसविले, ठाण मांडले तिला वासना म्हणतात.
व्यसन-हेतुक विषयांचाच अभाव करणे, त्याचे उपयोगाविरुद्ध कायद्याचे नियंत्रण आणणे या गोष्टीही कराव्याच लागतात.
कारण त्या केल्याशिवाय परिपोषक पार्श्वभूमी किंवा अनुकूल वातावरण निर्माण होत नाही.
हृदयपालट व अनुकूल वातावरण ही एकसमयाने निष्पन्न होत राहिली पाहिजेत. तरच मानवमात्र निर्व्यसनी होऊ शकेल व विश्व-शांति सत्यसृष्टीत अवतरेल.
अर्थात् हृदय-पालट हा अनुकूल, बाह्य परिस्थितीपेक्षाही अधिक आवश्यक व महत्त्वाचा आहे.