आहारशुद्धौ सत्वशुद्धी:। हे भगवान सनत्कुमारांचे सूत्र, आत्मशोधनप्रक्रियेचा अधिष्ठानभूत सिद्धांत आहे. सत्त्व-शुद्धी म्हणजे आत्म-शुद्धी.
आत्मशुद्धी करावयाची तर प्रथम आहाराची शुद्धी करावयास हवी.
आत्मशुद्धी म्हणजे शरीर-शुद्धी, अंत:करण-शुद्धी व परिणामत: जीवात्म-तत्त्वाची शुद्धी होय.
शुद्धी म्हणजे काय? `नैर्मल्यसम्पादनम्' ही धर्मशास्त्रांतली व्याख्या प्रसिद्धच आहे.
शुद्धी शब्दांचा न्यायदर्शनांतला अर्थ तदितरधर्म अनाक्रांतत्वम्। असा आहे.
तदितर धर्मामुळे जे आक्रमित झाले नाही ते शुद्ध. ज्या वस्तूंत, दुसऱ्या वस्तूंचे गुणधर्म प्राप्त् झाले नाहीत, ती वस्तू शुद्ध होय. उदाहरणार्थ - दुधात पाणी घातले नाहीत तर ते शुद्ध.
दुधात पाणी घातल्याने ते जसे अशुद्ध होते, तसेच पाण्यात दुध घातल्याने पाणीही अशुद्ध होते.
प्रत्येक वस्तूच्या सहजसिद्ध गुणात दुसऱ्या आगंतूक गुणांची भेसळ झाली की ती वस्तू अशुद्ध होते.
प्रत्येक वस्तूच्या सहजसिद्ध गुणात दुसऱ्या आगंतूक गुणांची भेसळ झाली की ती वस्तू अशुद्ध होते.
शरीरात विजातीय द्रव्ये गेली की ते शरीर अशुद्ध, दोष-दृष्ट, त्रिदोषदुष्ट मलसंयुक्त होते. रोग म्हणजे शरीराची अशुद्धी किंवा मल.
नुसते शरीर शुद्ध केल्याने सत्व-शुद्धी होणार नाही. शरीर व अंत:करण शुद्ध झाल्यानंतरच सत्व-शुद्धी होईल.
पातंजलयोगशास्त्रांत सत्त्व शब्दाचा `चित्त' असा अर्थ आहे. सत्वे तप्यमाने तत्संक्रांत: पुरूषो%पि तप्यते। (पातंजलभाष्य) उपनिषत्कारांनी सत्व शब्दाचा अर्थ `प्राण' असा केला आहे.
आहार-शुद्धीने सत्त्वाची, म्हणजे चित्ताची (योगशास्त्र) व प्राणांचीही (उपनिषद्कार) शुद्धी होते.
मानवी जीवनाची शांतिनिष्ठ अशी पुनर्रचना केली पाहिजे, तरच युद्ध निर्मुलन होईल व विश्वशांती अवतरेल.
या पुनर्रचनेत पहिलेपाऊल आहारशुद्धी हे होय. कारण मनाचे व प्राणांचे शोधन, शुद्ध आहाराशिवाय सर्वथैव अशक्य आहे.
छांदोग्य उपनिषदांत, `मन अन्नमय आहे.' असे स्पष्ट म्हटले आहे. `अन्नमयं हि सौम्य, मन:।' (छांदोग्य ६-५-४) छांदोग्यांत एक मार्मिक कथा आहे.
श्वेतकेतूला आरूणि उद्दालक, अन्न व मन यांचा संबंध विषद करून सांगत आहे :-
`अन्नं अशितं त्रेधा विधीयते।
तस्य य: स्थविष्ठो धातु: तत्पुरीषं भवति।
यो मध्यम: तन्मांस:,
य: अविष्ठ: तन्मन:।
अन्न खाल्ले की, त्याचे तीन विभाग होतात, त्यांतला जो अत्यंत स्थूल भाग त्याची विष्ठा होते, जो मध्यम भाग त्याचे मन होते.
श्वेतकेतूला, हे समजेना. अन्न स्थूल व दृश्य; मन सूक्ष्म व अदृश्य; अन्नापासून मन कसे होणार? म्हणून तो उद्दालकांना म्हणाला-
`भूय: एव भगवन्, विज्ञापयातु।' `भगवन्, मला पुनश्च एकदा नीट समजावून सांगा.'
उद्दालक म्हणाले, `हे सौम्य, दहीघुसळले की, वर लोणी येते, त्याचप्रमाणे अन्नाचे पचन होऊन शेवटी जो आणिमा, म्हणजे सूक्ष्मतम अंश येतो तेच मन होय.'
तरीही, श्वेतकेतूला बोध होईना; मग उद्दालक म्हणाले, `तू पंधरा दिवस अन्न न खाता नुसत्या पाण्यावर रहा.'
त्याप्रमाणे उपोषण करून श्वेतकेतूला परत उद्दलकांकडे आला. उद्दालक म्हणाले, `आता तू ऋचा, यजुर्वेद व सामगीते म्हण.'
श्वेतकेतूला काहीही आठवेना. `न वै मा प्रतिभांति भो:।' तो उद्गारला.
उद्दालक म्हणाले, `अशान्, अथ विज्ञास्यसि।'
`तू थोडे खा. म्हणजे सर्व तुझ्या लक्षांत येईल.'
श्वेतकेतून भोजन केले व गुरूजवळ येऊन उभा राहिला. नंतर, `तं ह यत्किंच पमच्छ सर्वं ह प्रतिपेदे- ' गुरूजींनी त्याला जे जे विचारले ते ते सर्व त्याने अचूक म्हणून दाखविले.
तेव्हा उद्दालक उद्गारले, `खद्योतमात्र, काजव्याएवढा,- परिशिष्ट असलेला अग्नि जसा, गवत, लाकडे इत्यादींनी प्रज्वलित होतो. त्याप्रमाणे अन्न खाल्ल्याबरोबर तुझे मन उत्तेजित झाले.' या प्रयोगामुळे श्वेतकेतूचे पूर्ण समाधान झाले.
मन अन्नमय आहे हा सिद्धांत त्याला पटला. `अन्नं ब्रह्म इति व्यजानात्'- अन्न हेच ब्रह्म होय. असेही तैत्तिरीय उपनिषदांत म्हंटले आहे.
वरील गोष्टीचा उल्लेख अन्नाचे सर्वंकष महत्त्व नि:संदेहत: सिद्ध करतो.
व्यक्ती मात्राच्या बुद्धीत व मनोरचनेत क्रांती झाली पाहिजे. मानवाचे मन व बुद्धी बदलणे, हे त्याच्या अन्नात बदल केल्याने सुशक्य होईल. किंबहुना दुसरा सुलभतर मार्गच उपलब्ध नाही.
युक्ताहार हे योगविद्या `दु:ख हा' होण्याची पहिली साधना आहे. असे गीताकार म्हणतात व श्रीज्ञानदेव भाष्य करतात -
ऎसे युक्तीचे नि हाते। जै इंद्रियां वोपिजे भाते।
तै संतोषासि वाढते। मनचि करी।।
ज्ञानेश्वरी, अ. ६/५२.
- धुं.गो.विनोद