ले. न्यायरत्न धुं. गो. विनोद, (दिवाळी विशेषांक)( १९६५)
----------------------------------------------
१)
ज्ञान-दूताचे हे सहावे दर्शन, विश्वावसू संवत्सराच्या दीपावलीनिमित्त होत आहे.
हा ज्ञान-दूत येतो कोठून?
हा ज्ञान-दूत अनंत अवकाशातून येतो.
हा एक तारा त्याला मार्ग दर्शवित असतो.
या दूताजवळ ज्ञानाचे अ-मित वैभव असते.
सर्व प्रकारचे साहित्य अंकाच्या `पानापानांवर' ठेवून महाराष्ट्र सरस्वतीला व महाराष्ट्रीय सारस्वतांना यथेष्ट इच्छाभोजन देणे हा ज्ञान-दूताचा सत्य-संकल्प आहे.
या संवत्सराचे विश्वावसू हे नाव मोठे अर्थपूर्ण आहे. सर्व विश्वांतली `वसू' म्हणजे दैवी संपत् एकत्र आणणारे असे हे संवत्सर आहे. `विश्वा' म्हणजे सर्व. सर्व वसू म्हणजे आठहि वसू, आठहि दैवी शक्ती.
आजच्या भारतीय जीवनाच्या संदर्भातील आठ वसू असे आहेत व चालू संवत्सरांत ते भारतामध्ये अवतरले हे सहज-स्पष्ट आहे.
स्वातंत्र्य, निष्ठा, समता, बंधुता, राष्ट्रीय एकात्मता, परमोच्च् मानवी मूल्यांची तीव्र जाणीव, सह-भाव, स्वसंरक्षणासाठी युद्धोन्मुखता, राष्ट्रीय अस्मितेची जाज्वल्य जागृती या आठ वसूंची उपस्थिती, विश्वावसू संवत्सराने आजच्या भारताला दिली आहे. या वर्षात हे सर्व गुण भारतात प्रकटले आहेत. भारतात अन्न नसेल, द्रव्य नसेल पण या आठ वसूंची शक्ती भारतात आज सर्वत्र संचारत आहे.
हा ज्ञान-दूत ईश्वराचा दूत आहे.
त्यामुळे शक्ती, ज्योती आणि मुक्ती ह्या त्रिविध संदेशाचे बिल्वदल त्याच्या हातात असते. ही तीन दले, ईश्वराची लक्षणे आहेत व प्रतीकेही आहेत.
ईश्वर या शब्दामध्येच शक्तीचा निर्देश आहे. `ईश' धातूचा मूळ अर्थ शक्तीचा किंवा सत्तेचा विनीयोग करणे, वापर करणे असा आहे. ही सत्ता सत्+ता म्हणजे सत्याची शक्ती होय. सत्यालाच खरी शक्ती असते.
अ+सत् म्हणजे जे नाही, ज्याला अस्तित्त्व नाही, त्याला शक्ती कशी असणार?
सत् म्हणजे ज्याचे अस्तित्त्व त्रिकालसिद्ध आहे, जे सदैव-भूत, वर्तमान, भविष्यकाळी ही, अ-बाधित राहते, ते सत्. असे अस्तित्त्व फक्त ईश्वराचेच असते.
ऍश्वर्य म्हणजे ईश्वरत्व किंवा ईश्वर-भाव. नुसती अफाट संपत्ती किंवा द्रव्यराशी म्हणजे ऐश्वर्य नव्हे. ही संपत्ती जर दैवी असेल, जर सत्त्व-गुणांनी युक्त असेल, तरच तिला `ऐश्वर्य' ही संज्ञा लावता येईल.
ज्ञान-दूत अथवा ईश्वर-दूत ऐश्वर्य देण्यासाठी येतो. दीपावलीचे मंगलप्रसंगी ऐश्वर्याचा सत्त्वनिष्ठ सत्तेचा व दैवी संपत्तीचा प्रसाद देण्यासाठी त्याचा अवतार होतो.
ऐश्वर्य हे शक्तीचे प्रकट रूप आहे.
शक्तीचा अविष्कार झाल्याशिवाय ऐश्वर्याची सिद्धी होत नाही. शक्ती हे ईश्वराचे सूक्ष्म स्वरूप आहे व प्रकट संपत्ती हे ईश्वराचे स्थूल स्वरूप आहे.
ज्ञान-दूत किंवा ईश्वर-दूत ऐश्वर्य देण्यासाठी येतो ह्याचा अर्थ तो शक्ती देण्यासाठी येतो. आज महाराष्ट्रीय व भारतीय जनतेने शक्तींचे उपासक झाले पाहिजे. शक्तीशिवाय दैवी संपत् नाही, हा संदेश घरोघरी पाहोचवण्यासाठी ज्ञान - दूताचे आगमन होत असते.
२)
ज्ञान-दूत हा दीपालीच्या महोत्सवकाली येतो, कारण त्याला घरोघरी दीपांच्या पंक्ती लावावयाच्या असतात.
भौतिक दीप किंवा जड दीप हे ज्ञानाचे प्रतीक आहे. ऋग्वेदात देखील ज्ञानाला तेजाची अथवा ज्योतीची उपमा दिलेली आहे. वैदिक द्रष्ट्यांनी प्रकाश म्हणजे ज्ञान व अंध:कार म्हणजे अज्ञान हे समीकरण अनेकानेक ठिकाणी गृहीत धरले आहे! ब्रम्हसुत्रावरील शांकर भाष्यांत देखील हे समीकरण आढळते.
१, १, २४) (अ. १, ३, ४०) (अ. १, २, ९)
बृहदारण्यक उपनिषदांत ह्या विषयावर याज्ञवल्क्य व सम्राट जनक, ह्यांच्या मध्ये झालेल्या एका सर्वात्कृष्ट संवादाचा उल्लेख आला आहे. जनक विचारतो की, मानव मात्राला जगविणारी आणि जागविणारी अशी ज्योती कुठली?
किंज्योतिरयम् पुरूष:।।
आदित्य, चंद्र व अग्नि ह्या निन्ही ज्योती निरूपयोगी आहेत. कारण त्या अस्तमित होतात, मावळतात, दिसेनाशा होतात.
आत्मतत्त्व म्हणजेच ज्ञानतत्त्व ज्ञान ही एकच ज्योती अशी आहे की, जिचा कधीही अस्त होऊ शकत नाही. ह्या आत्मतत्त्वाचे `सव्यं, ज्ञानं, अनंत' असे त्रिविध पण वस्तूत: एकविधच आहे. अर्थात आत्मतत्त्व हे ज्ञानरूप आहे, सत्यरूप आहे व अनंत आहे. ज्ञानाला अंत नाही व अस्त नाही कारण अंताचे व अस्ताचेही ज्ञान प्रत्यक्ष असल्याशिवाय किंवा निदान शक्य असल्याशिवाय, अंत व अस्तही सिद्ध होऊ शकत नाहीत!
एवंच ज्ञान हेच त्रिकालाबाधित तत्त्व आहे. ज्ञान हेच आत्मतत्त्व आहे व ईश्वरत्व आहे.
अशा ज्ञानाचा हा ज्ञानदूत आत्मज्ञानाच्या, ईश्वरज्ञानाच्या पणत्या ......... साठी सर्वत्र संचार करीत असतो.
३)
आद्य श्री शंकराचार्य ह्यांचा `ज्ञाना...मोक्ष:। हा सुप्रसिद्ध सिद्धांत ज्ञानाचे मूल उद्दिष्ट विशद करतो.
मोक्ष हा मानवी जीवनाचा अंतिम हेतू आहे. ज्ञान हे मोक्षाचे सर्वात्कष्ट साधन आहे, असे आद्य श्री शंकराचार्य मानतात.
मोक्ष ह्या शब्दाचे पारमार्थिक विवेचन न करता केवळ व्यावहारिक अर्थाने ह्याचा आपण विचार करू. मोक्ष म्हणजे सुटका. बंधनात असतील, त्यांचीच सुटका होऊ शकते. बंधने दूर झाल्यानंतर बद्ध असलेला मनुष्य मुक्त होतो म्हणजे स्वतंत्र होतो.
मुक्ती किंवा मोक्ष ह्याचा अर्थ स्वातंत्र्य अथवा स्वयंनिर्णय असा आहे. स्वतंत्र होण्यासाठी व रहाण्यासाठी ज्ञान हेच प्रमुख साधन आहे. साध्याचे, साधनाचे व एकंदर परिस्थितीचे ज्ञान असल्याशिवाय कोणीही स्वतंत्र होऊ शकत नाही व राहू शकत नाही.
जी वि-मुक्ती देईल तीच खरी विद्या.
सा विदया या विमुक्तये।
असे श्री शंकराचार्यांचेच दुसरे एक वचन सुप्रसिद्ध आहे. त्याचा अर्थ विशेष महत्त्वाचा आहे, जे स्वातंत्र्य देत नाही, जे स्व-तंत्र करीत नाही, ते ज्ञान नव्हे, ती विद्या नव्हे.
अज्ञान हा मानवाचा एकमात्र शत्रू आहे. भय अज्ञानाचे अपत्य आहे. भय-भावनेला जिंकणे हा खरा पराक्रम, ही खरी वीरता, हे खरे शौर्य.
ढहश िश्रिू ींहळसि ींि षशरी ळी षशरी ळींीशश्रष!
भयाला ज्याने जिंकले त्याने मृत्यूला जिंकले, तो मृत्यूंजय झाला. भयाकूल माणसे क्षणाक्षणाला मरत असतात. आपण भीतीला बळी पडता कामा नये, तरवारीला बळी पडले तरी चालेल!
अभयं मित्रात् । अभयम् अ-मित्रात्।
अभयं ज्ञातात्। अभयं पुरो य:।
अभयं नक्तम्। अभयं दिवा न:।
सर्वा आशा मम मित्रं भवन्तु।।
अथर्व वेद १९-१५. ५ व ६
मित्रांपासून आम्हाला अभय असो,
मित्रांपासून शत्रूंपासून आम्हाला अभय असो,
आम्ही ओळखत असलेल्या शत्रूंपासून (ज्ञातात्) आम्हाला अभय असो,
आमच्या पुढे (पुरो) ठाकलेल्या शत्रूंपासून आम्हाला अभय असो,
रात्री आम्हाला अभय असो, दिवसा आम्हाला अभय असो.
सर्व दिशांकडून आम्हाला मित्र लाभावेत.