साधना सूत्रे

श्रीसमर्थ शिष्या वेणाबाई

कीर्तन व श्वसन एकदम संपले!

[प्रवाचक - न्यायरत्न धुंडीराजशास्त्री विनोद(रोहीणी - एप्रिल - ६५)पश्यंती (२६)]

------------------------------

\

हेचि दान देगा देवा!

श्रीसमर्थ शिष्या वेणाबाई यांनी आपले कीर्तन संपविले तो दिवस चैत्र वैद्य द्वादशीचा (शके १६००) होता. इंग्रजी तारीख १० एप्रिल १६७८.

श्रीगुरूचरणाचे दान तिने मागितले, आणि ते गुरूचरणाजवळच मागितले!

हेचि दान म्हणजे कुठले दान? तिला गुरूचरण हवे होते. कायमचे, जन्मजन्मांतरीही गुरूचरण हवे होते. तिला अन्य देव नको होते, अन्य देवांचा आठव नको होता, अन्य देवांचा विसर पडला असता तरी चालला असता. तिला केवळ श्रीगुरूचरण, श्रीगुरूदेव हवे होते.

कीर्तनाच्या समाप्तीबरोबरच तिने स्वत:च्या जीवनाचेही कीर्तन संपविले!!

वेणाबाईंचे स्वत:चे जीवन म्हणजे एक अखंड धर्मकीर्तन होते. श्रीसमर्थचरणी तिची अतिकोटीची भक्ती, परानुरक्ती होती. तिच्या इच्छामरणाचे स्वरूप असे होते - 

''सीतास्वयंवराचे आख्यान संपवावे; 'हेचि दान देगा देवा` म्हणता म्हणता गुरूचरणावर मस्तक ठेवावे व त्याच क्षणी स्वत:चा श्वास थांबावा. पंचप्राणांची पंचारती गुरूचरणांच्या खालून वाहणा‍या अदृष्ट तीर्थसरस्वतींत वाहून जावी. समर्थचरणी माझे श्वास एकदाच व कायमचे सांडावे. कीर्तन करीत करीत, कीर्तनाचा व जीवभावाचा गरूचरणांवर शेवट व्हावा. सीता ही बुद्धी व राम हे आत्मतत्त्व. बुद्धीतत्त्व, आत्मतत्त्वात विलीन होणे हे सीतास्वयंवराचे मर्म आहे, लक्ष्य आहे, आंतररहस्य आहे. त्याची अनुभूती येऊनच जीवनापुढे पूर्णविराम पडावा. रोगाने विकृतीने नव्हे, अद्वैतज्ञानाने देहाचे भान कायमचे नष्ट व्हावे."

अगदी तिच्या जीवीच्या जीवाला हवे होते. तसेच सहज मरण तिला आले.

तिच्या देहाला विशेष विकृती अशी कधीच झाली नव्हती, रोग नव्हता. गुरूचरण जान्हवीच्या तीर्थाशिवाय तिने दुसरे औषध पूर्वी कधीच घेतले नव्हते. ''औषधं जान्हवी तोयं`` गुरूचरणतीर्थाशिवाय दुसरी जान्हवी, दुसरी भागीरथी, दुसरी गंगा तिने कधी मानलीच नाही!

महाराष्ट्राच्या आध्यात्मिक इतिहासांत वेणाबाईचे चरित्र हे एक सोनेरी पान आहे.

किती मराठी माणसांना वेणाबाईच्या या दैदिप्यमान आत्मनिवेदनाची आज आठवण आहे. माहिती तरी असेल का?

वेणाबाई ही बालविधवा होती. मिरज येथे देशपांडे यांच्या कुलांत तिचा जन्म झाला होता. (शके १५४८) बालपणीच विवाह झाला. दुदैवाची अतिसीमा झाली व तिला विवाहाचे मंगल दिवशीच वैधव्य प्राप्त् झाले. समर्थ रामदास एकदा भिक्षेला आले असता त्यांच्या झोळीत वेणाबाईने स्वत:च्या जीवन-सर्वस्वाची भिक्षा घातली.

वैराग्याची एक धवल लहरी विशाल विरागसिंधूंत विलीन झाली.

निवेदनभक्ती वेणाबाईजवळून शिकावी. प्रत्येक 'पूरक` श्वास, तिने श्रीगुरूचरणाचे प्रेम हृदयांत साठविण्यासाठी घेतला. प्रत्येक 'कुंभकाने` गुरूचरणप्रेम देहाच्या रोमारोमांत भिनविले व एकाच रोचक श्वासाने तिने गुरूचरणापुढे आपली श्वसनक्रिया संपविली.

वेणाबाई ही धगधगीत वैराग्याची ज्वलंत मूर्ती होती. त्या माऊलीच्या हातचे अन्न खाल्ले तर विकारवशता क्षीण होत असे. म्हणून ती सज्जनगडची अन्नपूर्णा म्हणनू राबली. अन्न ती शिजवी व त्या अन्नहुतीमुळे शेकडो भक्तांची भूकच नव्हे सर्व विकारदेखील शांत होत असत.

वेणाबाई कीर्तनयोगिनी होती. 'कीर्तनमेव मुक्ती:` कीर्तन म्हणजेच सदेह व विदेह मोक्ष. हे सूत्र तिने श्रीगुरूचरणांपुढे देहाचा कर्पूर जाळून कायमचे प्रकाशित केले आहे. कीर्तनाने मोक्ष मिळवायचा नाही. कीर्तन हाच मोक्ष किंबहुना मोक्षाची किंमत देऊनही कीर्तनशक्ती मिळविली पाहिजे.

वेणाबाईंसारखे कीर्तन करता यावे म्हणून चौ‍र्यांऐशींचा फेरादेखील पुनश्च स्वीकारणे योग्य ठरेल!

****

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col. Behind S. P. college Pune - 411030 

दूरध्वनी क्रमांक

+91-20-24338120

+91-20-24330661

+91 90227 10632

Copyright 2022. Maharshi Nyaya-Ratna Vinod by Web Wide It

Search