[प्रवाचक - न्यायरत्न विनोद (फेब्रु. १९६४)पश्यंती (२३)]
अध्यात्म म्हणजे अंतर्मुखता, आत्म - सन्मुखता तसेच अतीन्द्रिय कक्षा, नियम व अनुभूति यांचेबद्दल आदरयुक्त जिज्ञासा ही अध्यात्मविद्येची लक्षणे आहेत. भारतीय जनतेत आजदेखील या अध्यात्मिक धारणा सर्वोत्कृष्ट प्रमाणात आहेत.
अध्यात्म विद्या म्हणजे नीतीशास्त्र असे समीकरण करणे तर्कशुद्ध होणार नाही. आजचे भारतीय लोक नैतिकदृष्ट्या इतर काही पाश्चिमात्य राष्ट्रांतील लोकांच्या, साधारणपणे बरोबरीचे आहेत, असेदेखील म्हणणे वस्तुस्थितीला धरून होणार नाही. विशुद्ध नैतिकदृष्ट्या विचार केल्यास, आजचा भारत काही राष्ट्रांच्या बराच मागे आहे, असे म्हणणे मान्य आहे. पण अध्यात्मात तो अग्रेसरच आहे. आजदेखील भारतांतला बहुजनसमाज अध्यात्मिक व अध्यात्म सन्मुख आहे. मी स्वत: अनेक राष्ट्रांतले नेते, विचारवंत व बहुजनसमाज अवलोकिले आहेत. माझा निष्कर्ष असा आहे, दीर्घकालीन सत्ता, तज्जन्य दारिद्य्र व दारिद्रजन्य लाचारी या कारण - कार्य शृंखलेमुळे, भारतीय जनतेत एक प्रकारची नैतिक शिथीलता आली आहे, हे खरे. पण सामाजिक नीती, राजकीय नीती आज अध:पतित झालेली असली, तरी भारतीय जनतेची अध्यात्म-निष्ठा अढळ आहे. अध्यात्म निष्ठा अढळ असेल तर सामाजिक नीती सहज सुधारू शकते.
नीती-शास्त्र हे मानवां मानवांमधील संबंध निश्चित करते. अध्यात्मशास्त्र हे मानव व परमेश्वर यांच्यामधील संबंध स्पष्टविते. हा संबंध तादात्म्य संबंध आहे, असे भारतीय अध्यात्म शास्त्राचे मूलतत्त्व आहे.
अध्यात्म - शास्त्र हे धर्म शास्त्र, नीती शास्त्र व समाजशास्त्र यांहून अगदी निराळे आहे. इतर सर्व शाखांचा अध्यात्माशी अल्पाधिक संबंध आहेच आहे. पण त्या शास्त्रांच्या hypothesis वर म्हणजे मूल-गृहीत कृत्यांवर व अन्तिम निष्कर्षांवर अध्यात्म-विद्या यत्किंचित् देखील अवलंबून नाही.
अध्यात्म हे एक स्वयंपूर्ण शास्त्र आहे. 'आत्मानं अधिकृ त्य यत् शास्त्रं प्रवर्तते, तत् अध्यात्मम्।` आत्म-तत्त्वाला अधिकरण म्हणजे मुख्य तत्त्व समजून, जे विश्व-शास्त्राचा व शास्त्रविश्वाचा परामर्श घेते ते अध्यात्म-शास्त्र.
मानव-मात्राचे ऐश्वर्य म्हणजे ईश्वर- भाव, हा अध्यात्म शास्त्राचा आद्य सिद्धांत होय.
आधुनिक पाश्चात्य विचारवंत ज्याला झहळश्रिीिहिू म्हणतात, त्याला अध्यात्मशास्त्र समजणे हे काही मर्यादेतल, योग्य ठरेल. तत्त्वज्ञान किंवा तत्त्वशास्त्र हे दोन्ही मराठी शास्त्र झहळश्रिीिहिू या शब्दाच्या ध्वन्यर्थाची प्रतीती देऊ शकत नाहीत.
झहळश्रिीिहिू म्हणजे ज्ञानाबद्दलचे प्रेम. झहळश्रिीिहिू म्हणजे ङिर्शीं आणि डिहिळर म्हणजे थळीविा झहळश्रिीिहिू या शब्दाचा तत्त्वज्ञान, तत्त्वज्ञान या दोन्ही शब्दांशी, केवळ दूरान्वित संबंध आहे. फिलॉसॉफिचा अर्थ अध्यात्म शब्दाला अधिक जवळ आहे. पण अध्यात्माची व्याप्ती त्याहूनही विशाल आहे.
आत्म-तत्त्व ज्ञानरूप आहे व प्रेमरूप आहे. वल्लभ सांप्रदायांत ज्ञान व प्रेम हे दोन्ही शब्द एकाच किंवा समान अर्थाने वापरलेले आहेत. आद्य शंकराचार्यांनीही आत्म-तत्त्वालाच 'परम प्रेमास्पदता` दिली आहे. आत्मन् या शब्दांत ज्ञान व प्रेम यांचा सहजसिद्ध सह-भाव आहे. फिलॉसॉफि व अध्यात्म हे शब्द समानार्थक मानणे पुष्कळ अंशी योग्य ठरेल.
अध्यात्म-विद्या ही आत्म-तत्त्वांचे स्वरूप प्रकटविणारी, आत्म हाच परमात्मा हे मूल अद्वैत दर्शविणारी विद्या होय.
- धुं.गो.विनोद
----------------------------------
(न्यायरत्न विनोद हल्ली 'शान्ति-मंदिर` विजयानगर कॉलनी, २१००, सदाशिव, पुणे- ३० येथे राहावयास आले आहेत. शान्ति-मंदिरात त्यांची ६३ वी जयंती १२ जानेवारी १९६४ रोजी साजरी झाली. श्री विवेकानंदांची पूण्यजयंती दि. १२ जानेवारीलाच साजरी होत असते. महर्षि विनोद यांनी विवेकानंदांचे कार्य अमेरिकेत सुमारे तीन वर्षेपर्यंत प्रवाहित केले. शान्ति-मन्दिरात, वैयक्तक व सामुदायिक पद्धतीने आध्यात्मिक मार्गदर्शनाचे कार्य व्हावयाचे आहे. परमपूज्य न्यायरत्न महर्षिंनना व त्यांच्या कार्याला 'रोहिणी` चे सादर वंदन. - वसंत काणे.)