ते वेळी जयाकडे वास पाहे। तेउता मीचि तया एक आहे।।
अथवा निवांत जरी राहे। तऱ्ही मीचि तया।।
शब्द-दीक्षा व संकल्प-दीक्षा अशा आणखी दोन प्रकारच्या दीक्षा आहेत.
चार वैदिक महावाक्ये - प्रज्ञानं ब्रह्म (ऋग्वेद) अहं ब्रह्मास्मि। (यजुर्वेद) अयमात्मा ब्रह्म । (सामवेद) व सर्वं खलु इदं ब्रह्म। (अथर्ववेद) हे देखील शब्द - दीक्षेचेच प्रकार आहेत.
`स्फ्य' हा शब्द गुह्य कर्मकांडात एक गुप्तदीक्षेचे प्रतीक म्हणून उपयोजिला जातो. ही दीक्षा अत्यंत जटील पण महाप्रभावी आहे. या शब्दाचा वैदिक वाङ्मयात एक दोनदाच स्पष्ट उल्लेख आहे. मला याचे विधान माहित आहे व अनुभवही आहे.
गूढ विद्येत एवढी भयानक वेधशक्ती असलेले `स्फ्य' एवढे दुसरे विधान नाही. दीक्षाविधीचे पाचवे माध्यम म्हणझे संकल्प-दीक्षा होय. ही दीक्षा देणारे सद्गुरू या जगतीतलावर फारच थोडे असू शकतात. कारण ते परागतीला गेलेले अनेक जन्म संसिद्ध असावे लागतात. कोणताही विधी न करता, स्वशिष्याचा सर्वोद्धार व्हावा अशा नुसत्या संकल्पानेच त्याला कृतार्थ करणे, जीवनमुक्त करणे, या दीक्षेचे नाव संकल्पदीक्षा. संकल्पादेव तु । (ब्रह्मसूत्र ४.४.८)
श्री स्वामीसमर्थ अक्कलकोट सर्व प्रकारच्या दीक्षा प्रत्येकाच्या योग्यतेप्रमाणे देत असत. पण माझ्या मते संकल्पदीक्षा हा त्यांचा प्रमुख दीक्षा-विधी असे.
स्पर्श, दृष्टी, ध्यान, शब्द व संकल्प अशा या पंच-महा-दीक्षा आहेत. त्या सर्वात संकल्पदीक्षा ही सर्वोत्तम होय. शंकराचार्य डॉ.कुर्तकोटि यांनी ही दिव्यदीक्षा दिल्याचे एक उदाहरण मला माहित आहे. तेही या दीक्षा-विधीचा अनेक वेळा प्रयोग करतात.
शब्द दीक्षेलाच मन्त्र-दीक्षा असेही म्हणतात.
२)
पहिल्या तीन दीक्षांचा उल्लेख भारतीय तन्त्रग्रंथांत आढळतोच. पण अल्प-स्वल्प भेदाने तिबेटी तन्त्र ग्रंथांमध्ये व तिबेटी मठामध्ये याच प्रकारचे दीक्षाविधी माझ्या अवलोकनांत आले.
पद्मसंभव या बुद्धावताराचा दीक्षा-विधी `डाकिनी' या देवतेने केला. अर्थात् डाकिनी ही तिबेट-तन्त्रांत एक सौभाग्य देवता आहे. श्री पदमसंभव यांचा हा दीक्षा-विधी मोठा रहस्यमय व आल्हादक आहे.
चीन, जपान, ब्रह्मदेश व सयाम (थायलंड) येथील अनेक मंदिरात अधूनमधून आज देखील असे दीक्षा-विधी होत असतात. या सर्व देशांतील दीक्षा-विधीचे मंगल प्रसंगी उपस्थित राहण्याचा योग मला आला होता. हे दीक्षा-विधी व त्यातले मन्त्र आपल्याकडील व्रतबंधविधींच्या मन्मासारखे व विधींसारखे आहेत.
थायलंड येथील एक दीक्षा-विधी मात्र आपल्याकडील विधींशी बहुतांशी साम्य असलेला होता. फोर्मासा येथील एका सांस्कृतिक केंद्रांत एक अत्यंत गुप्त स्वरूपाचा दीक्षा विधी सुरू असता मी तेथे गेलो होतो. मला प्रत्यक्ष विधी-स्थंडिलाशी जाण्यास परवानगी मिळाली नाही, पण १७ मन्त्र व ४९ मन्त्र, १७ हवने व ४९ प्रदक्षिणा अशी अंगोपांगे असलेला तो विधी होता. १७ या मूलब्जिनीच्या, प्रकृति-कमलाच्या कला आहेत. चंद्राच्या कला १६ मानल्या जातात व सतरावी कला ही अनन्ततेची, पूर्णतेची समजली जाते. गुरू १७ प्रकारचे आहेत.
वाजपेय यज्ञातही १७ रथांच्या मिरवणुकीचा भव्य देखावा हजारोंनी पाहिला (१९५५). ४९ हा आकडा साताचा वर्ग आहे. ७ हा आकडा तन्त्र गणितात व गूढ-विद्येत मौलिक, महत्त्वाचा मानला जातो, हे प्रसिद्धच आहे. ७ चा वर्ग ४९ व ४९ वर्ग किंवा ७ चा चतुर्घात २४०१. मूळाच्या चतुर्घाताने फळाची सिद्धी होते, असा तन्त्र विद्येचा संकेत आहे. २४०१ हा आकडा फल-सिद्धीदायक समजला जातो.
३)
श्री भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला दिव्य-चक्षु दिल्याचा निर्देश आहे. (अ. ११ श्लो. ८) या दिव्य चक्षूचे स्वरूप काय असावे? याचे उन्मीलन हा दीक्षा विधीचा एक प्रकार असेल काय?
`चक्ष्' या धातूचा अर्थ `पहाणे' असा आहे. `बोलणे' असाही होतो. चक्ष: शब्दाचा अर्थ `बृहस्पति' असा होतो. तेथे चक्ष् धातूचा अर्थ बोलणे हा आहे. बृहस्पति हा वाक्-ईश्वर होता. चक्ष् धातुपासून चक्षु: हा शब्द सिद्ध झाला. त्याचा अर्थ `पाहणारा' किंवा `पाहण्याचे उपकरण, साधन असा होतो.
आर्ष वाङ्मयात ईक्षण-क्रिया व ज्ञानक्रिया या तत्त्वत: एकच समजल्या जातात. ईक्षर्तेर्ना शब्दत्! ईक्षति कर्मव्यपदेशात्। ही दोन ब्रह्मसूत्रे व त्यावरील आद्य श्रीशंकराचार्यांची भाष्ये, ईक्षण म्हणजे जाणणे हाच अर्थ गृहित धरतात.
जाणणे हे एक प्रकारचे पाहणे आहे किंवा पाहणे ही एक प्रकारची ज्ञानक्रिया आहे, ही गोष्ट सहज लक्षात येण्यासारखी आहे.
चक्षु हा शब्द ज्ञानसाधन या अर्थी अनेक वेळा वापरला जातो. घ्राण-चक्षु, तय-चक्षु, चार- चक्षु हे शब्द प्रसिद्धच आहेत.
भगवद्गीतेतील `दिव्य-चक्षु' हा शब्द अलौकिक ज्ञानात्मक` म्हणजे अलौकिक ज्ञान देणारा चक्षु अशा अर्थाचा आहे, असे श्रीधर टीकेत सांगितले आहे.
अद्वैतसिद्धीकार श्री. मधुसूदन सरस्वतींनी आपल्या टीकेत दिव्य शब्दाचा `अ-प्राकृत' असा एक अर्थ दिला असून `दिव्यरूपदर्शनम' असा चक्षु, असे मार्मिक विवेचन नंतर केले आहे. `रूपदर्शन' हे चक्षुचे स्वभावकार्य आहे.
रूप शब्दाचा अर्थ आकृति form असा आहे.
लौगाक्षिभास्कर यांच्या तर्क कौमुदीत, चक्षुर्मामग्राह्य, जातिनाम्, गुणो इति रूपम् असे रूप शब्दाचे लक्षण दिले आहे ते प्रसिद्धच आहे.
वैशेषिकांच्या २४ प्राथमिक गुणांमध्ये रूप हा एक गुण म्हणून अंतर्भूत आहे.
`दिव्य' शब्दाचे `दिव्यरूपदर्शन-क्षम' असे विवरण करण्यात श्री.मधुसुदन सरस्वतींचा आशय हा की दिव्य रूपे दर्शविणारा चक्षु हा एक अगदी आगळा असा चक्षु असतो. सामान्य रूपे दर्शविणाऱ्या चक्षुहून तो अगदी निराळा, अति विलक्षण असा असतो. त्याचे लक्षण करावयाचे `तर दिव्य रूप देखणारा चक्षु तो' असेच करावे लागेल. येथे चक्षुर्मात्र ग्राह्य व जातिमान् अशी रूपे न पाहता, जो अतींद्रिय रूपे पाहतो तो `दिव्य' चक्षु होय.
श्री.मधुसुदन सरस्वती म्हणतात त्याप्रमाणे, `प्राकृत' चक्षुला न दिसणारी रूपे पाहणारा तो `दिव्य -चक्षु' होय. जो चक्षु प्राकृत नाही, म्हणजेच `संस्कृत' आहे किंवा गुरूदीक्षेने उन्मीलित आहे, तो `दिव्य' या संज्ञेला पात्र आहे; असा श्री. मधुसूदन सरस्वतीचा स्पष्ट अभिप्राय आहे.
श्री ज्ञानेश्वरांच्या शब्दांत सांगायचे तर -
बोली अरूपाचे रूप, दावीत।
अतींन्द्रिय परि भोगवीन, इन्द्रियाकरवी।
अरूपाचे रूप ज्याला डोळविता येते तो दिव्य चक्षु होय.
४)
येथे एक रहस्य ध्यानात आले पाहिजे.
सामान्य चक्षुला प्रकाश कधीच दिसत नाही. केवळ प्रकाशित वस्तू दिसतात. प्रकाश पाहू शकतो, तोच दिव्य चक्षु. प्रकाश म्हणजे काय व तो पाहणारा दिव्य चक्षु कसा असेल?
`अर्थ' शब्दाची एक निरूक्ति `इंद्रियाणि ऋच्छन्ति यत्र' अशी आहे. इंद्रिये जेथे जातात तो अर्थ. इन्द्रिय आणि अर्थ किंवा आकाश आणि शब्द, पुष्प आणि सुगंध, प्रकाश आणि नेत्र यांच्यामधले द्वैत वेगळीक आकागंतच येत नाही असा अनुभव घेणारा तो दिव्य-चक्षु, दिव्य-श्रृति किंवा दिव्य स्पर्श होय।
ज्ञाता आणि ज्ञेय, प्रमाता आणि प्रमेय, द्रष्टा आणि दृष्य यांच्यामधली भेद प्रतिती नष्ट होणे, भेदप्रतीतीचा संभव देखील असंभाव्य वाटणे याचे नाव दिव्य चक्षु.
द्रष्टा आणि दृष्य, ज्ञाता आणि ज्ञेय यांमध्ये जो एक `संबंध' निष्पन्न होत असतो त्याचे कारण एका द्रष्टाला अनेकानेक विविध दृष्ये दिसत राहतात. या संबंधाला दर्शन किंवा ज्ञान अशी संज्ञा दिली जाते. अगोदर दर्शन व नंतर दृश्य व द्रष्टा हा एक संभव, अगोदर द्रष्टा आणि नंतर दृश्य व दर्शन हा दुसरा असे दोन पर्याय साहजिक वाटतात. पण, वस्तुत: द्रष्टा, मग दृश्य व दर्शन असा प्रकार नसून, हे तीनही अवयव एकदम व एकत्रच प्रतितीत येतात. द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी हे प्रत्यक्ष प्रतितीचे एख पृथ्थकरण, एक विश्लेषण आहे.
एकापेक्षा अधिक दर्शने व दृश्ये शक्य असल्यामुळे त्यांना सामान्य असणारा द्रष्टा हा द्रष्टा, दृश्य व दर्शन हा त्रिपुटीचा स्थायी बिन्दु समजला जातो.
दर्शन व दृश्य यांनाही स्थायित्व देणे अशक्य नाही. क्षणवाद स्वीकारणारे बुद्धदर्शन क्षणाला स्थायित्व देते व द्रष्ट्याला अ-स्थायित्व देऊन अनत्तावादाचा, अनात्मवादाचा पुरस्कार करते.
परंतु क्षणवाद किंवा अनत्तावाद यांना स्थायित्व देणे तर्कशास्त्रदृष्ट्या असंभवनीय ठरते. कारण `क्षणा'ची सिद्धी परंपरेशिवाय, मालिकेशिवाय होत नाही. दोन क्षण, दोन बिंदू यांच्या संदर्भाशिवाय, संपर्काशिवाय `एका' क्षणाची अर्थवत्ता सिद्धच होऊ शकत नाही.
परस्परांशी असंबद्ध, अ-संपृक्त राहिलेल्या दोन द्वीपांमध्ये काहीच संबंध नसेल तर ती दोन द्वीपे आहेत हे कसे कळणार? एकमेकांशी संबंध असतील तरच ती `दोन द्वीपे' होऊ शकतात. नाही तर ती दोन आहेत, हे कळणार कसे?
संबद्धतेशिवाय अनेकत्व, विविधत्व संभवत नाही हे पक्षात आल्यावर, क्षणवाद, बिंदुवाद व अनत्तावाद यांचा मूळ आधाराच नष्ट होतो, हे स्पष्ट आहे.
दिव्य चक्षुला प्रेक्षणात द्रष्टा, दृश्य व दर्शन ही त्रिपुटी नसते. तेथे स्थल-कालाच्या मर्यादा नसतात, वस्तुमानाच्या सीमा नसतात.
५)
अशा तऱ्हेची प्रतीति, अशा तऱ्हेचा अनुभव, अशा तऱ्हेचे ज्ञान असू शकते काय, असा संशय येणे साहजिक असते. पण त्या श्रेणीवर, त्या कोटीवर गेल्यानंतर, आरूढ झाल्यानंतर अशा तऱ्हेचे ज्ञान होऊ शकते, एवढे खरे !
त्याला अनुमान व उपमा अशी दोनही प्रमाणे उपलब्ध आहेत. स्वप्न या अवस्थेत गेल्यावर व बाह्य जड वस्तूंचा अभाव असूनही, प्रत्यय येऊ शकतो, हे उपमान प्रमाण झाले.
अतीन्द्रिय व निरिन्द्रिय अशा अनुभूति सद्य कालाच्या व इतिहासकालीन अनेकानेक व्यक्तींना मिळाल्या आहेत. श्री समर्थ स्वामी हे उदाहरण धगधगीत तेजाने चमकत आहेच. त्या अनुभूति ज्या उप-करणाच्या द्वारे मिळतात त्याला `दिव्य' चक्षु म्हणणे सर्वयैव योग्य आहे.
सामान्यत: देखील कोठल्याही विषयाचे आकलन होण्यास एक प्रकारची `दृष्टी' उत्पन्न व्हावी लागते. एक असिश्रश, angle, perspective साधावा लागतो. ही दृष्टी, हा angle अनुभवी व्यक्तीच्या प्रत्यक्ष मार्गदर्शनाने किंवा सहवासानेच येतो, एरवी तो दृष्टीकोन येऊच शकत नाही!
शिक्षक व शिष्य, ज्ञाता व जिज्ञासू यांना समरेषेंत यावे लागते. एका समबिंदूवर अधिष्ठित व्हावे लागते. तेव्हाच खरे ज्ञानसंक्रमण होऊ शकते. ज्ञानदानाच्या, ज्ञानग्रहणाच्या या क्रियेलाच `दीक्षा' अशी पारिभाषिक संज्ञा आहे.
`दीक्षा' शब्दांतला मूळ धातु 'दीक्ष्' हा आहे. दीक्ष् धातु आत्मनेपदी आहे. परस्मैपदी नाही. तो तसा आत्मनेपदी असण्यात एक सूक्ष्म व्यग्नता आहे. दीक्षा घेणे ही कृति मुख्यत: आत्मनेपदीच आहे, परस्मैपदी नाही.
दीक्षा ही स्वत: घ्यावयाची असते. स्वत:करीता घ्यावयाची असते आणि स्वेच्छेने घ्यावयाची असते. ती दुसऱ्याच्या आग्रहाने, आकसाने व केवळ उपचार म्हणून कधीही घेतली जात नाही.
दीक्षेमध्ये समग्र व्यक्तित्वाचा अंतर्भाव होतो. केवळ बुद्धी ही दीक्षा होऊ शकत नाही. संपूर्ण कर्माशय, शरीर, मन, बुद्धी व आत्मा ही पाचही `दीक्षित' व्हावी लागतात. म्हणूनच, सामान्यत: गुरू-शिष्य संबंध हा पारंपारिक व पूर्वजन्मार्जित असतो. केवळ एका जन्मात संपूर्ण आत्मज्ञान होण्याची शक्यता तरी कोठे असते? व्याकरण, गणित, भूगोल यांच्यासारखे सामान्य विषयदेखील एका जन्मात आत्मसात होण्याची शक्यता नसते; मग आत्मविद्येचे संपूर्ण आकलन एका जन्मात कसे होणार?
अत एव -
अनेक जन्म संसिद्ध ततो याति परां गतिम् ।
७)
श्रीमत् भागवतात अकराव्य स्कंधातील पंधराव्या अध्यायात भगवान् श्रीकृष्णांनी उद्धवाला विविध प्रकारच्या सिद्धी आणि त्या मिळविण्याची साधने सांगितली आहेत.
अणिमा लधिमा प्रात्प्रि: प्राकाम्यं महिमा तथा।
ईशित्वं च वशित्वं च तथा कामावसायिता ।।
विष्णुपुराण व ब्रह्मपुराण यांतही अनेक सिद्धींचे वर्णन आहे. या सिद्धींचीही `संक्रांति' होऊ शकते. श्री गुरूदेव कोणत्याही सिद्धीचा शक्तीपात करू शकतात.
शक्ती व सिद्धी हे दोन्ही शब्द साधारणपणे एकार्थवाचक आहेत.
शक्तिपात याचा अर्थ सिद्धीपात असा होऊ शकतो. एकंदर २३ प्रकारच्या सिद्धी व आधुनिक विज्ञानाने प्राप्त झालेल्या शक्ती किंवा सिद्धी यांची सर्व शास्त्रीय नावे स्वरूपे यांचा अल्प परामर्श घेणे या ठिकाणी आवश्यक आहे.
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ यांचे जीवन म्हणजे सर्व सिद्धींचा एक चित्रपटच आहे.
अणिमा, लधिमा, महिमा प्राप्ति, प्राकाम्य, ईशित्व, वशित्व व कामावसायिता या जीवतत्त्वांचे वैभव वाढविणाया आहेत.
अणिमा सिद्धीने शरीराचे, अणु-परमाणु इतके लहान रूपांतर करता येते. सीतेच्या शोधार्थ संचार करणाऱ्या हनुमंताने अणुरूपानेच रावणाच्या लंकेत प्रवेश केला होता, असे वर्णन आहे.
'महिमा' सिद्धीमुळे देहाला प्रचंड आकार देता येतो किंवा घनताही देता येते.
`लधिमा' सिद्धीत शरीर कापसासारखे हवेत तरंगण्याइतके हलके होते.
`प्राप्ति' म्हणजे कोणत्याही वस्तूशी तादात्म्य संबंध घटविणे व आपल्या इच्छेप्रमाणे तिचा उपयोग करणे.
`प्राकाम्य' म्हणजे कोणतीही इच्छित वस्तू उपलब्ध करता येणे `ईशित्व' म्हणजे जड व अजडावर सत्ता व वशित्व म्हणजे परचित्त, परेच्छा आपल्या काबूत ठेवणे.
शेवटची व आठवी सिद्धी `कामावसयिता' म्हणजे मनात उदित होईल ती इच्छा पूर्ण होणे.
या अष्ट महासिद्धींशिवाय गौणसिद्धी दहा आहेत.
१) अनूर्मि म्हणजे क्षुधा, तृष्णा, शोक, मोह, जरा, मृत्यु या उर्मींचा स्पर्श शरीराला न होणे.
२) `दूरश्रवण'
३) `दूरदर्शन'
४) `मनोजव' अर्थात् मनोवेगाने वाटेल तेथे शरीरासह जाणे.
५) `कामरूप' म्हणजे मनात येईल ते रूप धारण करण्याची शक्ती
६) परकाय-प्रवेश
७) स्वच्छन्द-मरण
८) दैवक्रीडानुदर्शन - या सिद्धींचाही गौण सिद्धींमध्ये अंतर्भाव होतो.
९) यथा - संकल्प - संसिद्धी म्हणजे संकल्पिलेली वस्तू ताबडतोब सिद्ध होणे
१०) अप्रतिहत - गती म्हणजेच आज्ञा. ही सिद्धी प्राप्त असलेल्या योगाच्या आज्ञेचा भंग कोणालाही करता येत नाही.
भौतिक जीवनावर सत्ता चालविणाऱ्या योगांच्या आणखीही पाच सिद्धी सांगितल्या आहेत. त्यांना `क्षुद्र-सिद्धी' अशी संज्ञा दिली आहे.
`त्रिकालज्ञता' अर्थात् वर्तमान, भूत, भविष्य या तीनही काळातील घटनांचे ज्ञान असणे.
`अद्वंद्वता' म्हणजे शीत-उष्ण, सुख-दु:ख आदि द्वंद्वांपासून अलिप्त राहणे.
`परचित्ताभिज्ञता' दुसऱ्याच्या मनातील विचार जाणण्याची, दुसऱ्यांची स्वप्ने जाणण्याची शक्ती.
चौथी सिद्धी `प्रतिष्टम्भ' म्हणजे मानवी शरीरावर परिणाम करणाऱ्या अग्नि, वायू, जल, शस्त्र, विष आणि सूर्याचा ताप या गोष्टींचा काहीही परिणाम न होणे.
`अपराजय' म्हणजे सर्व बाबतींत अजिंक्य होणे
८)
जन्मौघधिमन्यतप: समाधिजा: सिद्धय:।
पांतजल-प्रणीत योगसूत्रांत सिद्धींची पाच प्रकारची उगमस्थाने सांगितली आहेत. जन्मत: औषधींच्या योगाने, मन्मप्रयोगाने, तपश्चरणाने वरील सिद्धी प्रकट होतात.
`समाधि' हे सिद्धीचे पाचवे कारण हीच सर्व सिद्धींत, समाधिज सिद्धी ही श्रेष्ठतम होय.
अष्ट-महासिद्धी, दहा गौण-सिद्धी व पाच क्षुद्र सिद्धी अशा २३ प्रकारच्या सिद्धींचे विवेचन, श्रीमद्भागवत व दुसऱ्या अनेक तंत्रशास्त्रीय ग्रंथातूनही आले आहे.
पाच `क्षुद्र' सिद्धींना `क्षुद्र' म्हणायचे कारण आत्म-ज्ञान हीच खरी सिद्धी आहे. यापुढे बाकी सर्व सिद्धी क्षुद्रच आहेत.
तसे पाहिले तर या `क्षुद्र' सिद्धी फारच श्रेष्ठ दर्जाच्या आहेत. पण त्यांचे प्राकट्य किंवा वापर स्थलकालीन मर्यादित असल्यामुळे त्यांना `क्षुद्र' म्हटले आहे.
जीव-चैतन्याच्या दृष्टीने ज्यांना महासिद्धी म्हटले आहे त्यादेखील महाचैतन्याच्या दृष्टीने क्षुद्रच ठरतील.
या सर्व सिद्धींची उपपत्ती काय? त्या उत्पन्न कशा होतात?
९)
या अनेक प्रश्नांचे उत्तर एकच आहे. सर्व प्रकारच्या शक्ति ह्या आत्मशक्तिची रूपांतरे आहेत. आत्म-तत्त्व हे सर्व शक्तिंचे केंद्र आहे, उगमस्थान आहे.
सांख्य-दर्शनाच्या परिभाषेत हेच तत्त्व सांगावयाचे तर जड प्रकृतीला स्वत:ची शक्ती नाही. ती पुरूष-तत्त्वाची आहे. पुरूष-तत्त्वालाच उपनिषदांत व वेदान्द दर्शनांत आत्म-तत्त्व ही संज्ञा आहे. समाधि अवस्थेमध्ये जीव-तत्त्व व परम-आत्मतत्त्व एकरूप होतात. परमात्म शक्ति ही सर्व शक्तिंचे सिद्धींचे मातृस्थान आहे. समाधि अवस्थेमध्ये किंवा आत्मज्ञानामुळे जीव-तत्त्वाचे परमात्म-तत्त्वाशी तादात्म्य होते आणि सर्व सिद्धी व शक्ति उपलब्ध होतात.
शुक्ल-सिद्धी आणि कृष्ण-सिद्धी असे सिद्धींचे दोन प्रकार आहेत.
जन्म-ज व समाधि-ज या दोन प्रकारच्या सिद्धी सहजसिद्धी होत.
काही सिद्ध्यांना जन्मत:च सर्व सिद्धी व शक्ति प्राप्त होत असतात. श्री स्वामी समर्थ अक्कलकोट हे साधनासिद्ध नसून केवलसिद्ध होते. त्यांनी सिद्धी मिळवल्या नव्हत्या. पक्षांना आकाश संचार जसा सहज तशा सर्व सिद्धी त्यांना सहजप्राप्त होत्या.
जीवपदापासून शिवपदापर्यंत होणाऱ्या विकासक्रमांत निरनिराळया सिद्धी या विविध कक्षांच्या ज्ञापक आहेत. प्रत्येक सिद्धी हा एक अवस्था-विशेष आहे; एक कक्षाविशेष आहे. तेथून पुढे, आणखी पुढे जावयाचे असते.
यामुळे भगवान पतंजलींनी सर्व सिद्धींना समाधीचे उपसर्ग, अन्तराय, अडथळे म्हणून संबोधले आहे.
शुक्ल-सिद्धी या सहजासहजी, आपोआप प्रकट होतात. कृष्ण-सिद्धी या वैयक्तिक स्वार्थ, कामोपभोग, हेवादावा, सूड बुद्धी अशा हेतूंच्या पूर्तीसाठी वापरल्या जातात. वामाचार तन्त्राच्या सर्व सिद्धी या कृष्ण-सिद्धी आहेत.
१०)
आधुनिक विज्ञानाला या महा-सिद्धी, गौण-सिद्धी व क्षुद्र-सिद्धी उपलब्ध करता येतील काय?
आधुनिक विज्ञान हे बहिर्मुख आहे. केवळ प्रकृति-निष्ठ आहे. बुद्धितत्त्वाचा अंतर्भाव प्रकृतीत होतो. बुद्धी म्हणजे आत्म-तत्त्व नव्हे. आधुनिक विज्ञानाचे बहुतेक शोध केवळ बुद्धीने लावले आहेत. बुद्धी ही जड आहे याचा अर्थ शिला, मृत्तिका आदि पदार्थांप्रमाणे आहे, असे नव्हे. बुद्धीमध्ये जड-ता ही फार थोड्या प्रमाणात आहे. तरीही जोपर्यंत बुद्धीचे विषय बाह्य पदार्थ असतात, तोपर्यंत ती प्रामुख्याने जडच रहाते.
बुद्धीने संशोधिलेले निसर्गाचे नियम योग्य तऱ्हेने उपयोजिले तर निसर्गावर मानवी बुद्धीची सत्ता उत्पन्न होते. ही देखील एक सिद्धीच आहे. अंतरिक्षांतून पृथ्वीची प्रदक्षिणा करून गागारिन, आज सुखरूप परत येऊ शकतो, ही निस्संशय एक सिद्धीच आहे. बौद्धिक सिद्धी आहे. या सिद्धीत आत्म-तत्त्वाचा विनियोग नाही.
बाह्य-विश्वाप्रमाणे एक आंतर-विश्व आहे. या विश्वाला `अंत:करण विश्व' म्हणता येईल. या आन्तर-विश्वाचे नियम पुष्कळ अंशी मानवी बुद्धीला समजू शकतात. काही भाग, काही गूढ वैशिष्ट्ये ज्या इंद्रियाला समजतात. `प्रतिभा' असे पतंजलीने म्हटले आहे. हा देखील बुद्धीचाच एक विकास, एक उन्मेष असू शकेल. पण बुद्धीच्या सर्व-सामान्य मर्यादा येथे नष्ट झालेल्या असतात. या प्रकारच्या ज्ञानाला पतंजलीने `प्रातिभ' ज्ञान असे म्हटले आहे. ते ज्या शक्तीला प्राप्त होते, तिला प्रतिभा असे म्हणतात.
योगसिद्धी मिळवण्याचे प्रतिभा हे प्रमुख साधन आहे. तेथे सामान्य बुद्धीची तितकीशी आवश्यकता नाही.
आधुनिक विज्ञानाला या प्रकारच्या प्रतिभाजन्य सिद्धी कधीही प्राप्त होणार नाहीत असे नव्हे, पण आधुनिक विज्ञानाच्या प्रक्रिया आमूलाग्र बदलाव्या लागतील. त्या आपोआपच बदलल्या जातील. प्रामुख्याने, कार्य-कारणभाव या तत्त्वाचे पूर्णत: स्वरूपान्तर झाल्याशिवाय, स्थल-कालातील विश्वाची प्रतीति येणार नाही व संगती लागणार नाही.
कार्यकारणभाव, गुरूत्वाकर्षण, एकंदर त्रि-कक्षात्मक विश्व-संस्थिती यांना बाजूला सारणे, त्यांच्या मर्यादा ओळखणे, आजच्या विज्ञानवेत्त्यांना अपरिहार्य झाले आहे. केवळ जडवादाला अगम्य असणाऱ्या अधात्म-विश्वाचे दर्शन प्रतिभेच्या दिव्य नेत्रालाच होईल.
विज्ञानवेत्त्यांच्या ठिकाणी आर्ष-प्रतिभा म्हणजे ऋषींची दृष्टी जागृत होऊ लागली आहे. डॉ. युंग (Jung) आईनस्टाईन, मिलिकन, आल्डस् हक्स्ले, डॉ. ऱ्हाईन, डॉ. पुहारिश यांच्या ठिकाणी ही आर्ष प्रतिभा जागृत झाली असल्याचे, त्यांच्याशी झालेल्या माझ्या अनेकानेक संभाषणात, मला स्पष्टपणे आढळून आले. आधुनिक विज्ञानाच्या मर्यादा त्यांनी पूर्णपणे ओळखल्या आहेत, अशी माझी खात्री झाली. आधुनिक विज्ञानपलीकडील अतिन्द्रियप्रकाशाचे कवडसे त्यांना दिसू लागले आहेत. यात अणुमात्रदेखील संशय नाही.
।। श्री स्वामी समर्थार्पणमस्तु ।।