(ऑगस्ट - ५६
राष्ट्राचे नेतृत्त्व नीतिनिष्ठ असलेच पाहिजे. नेता, व नीती हे दोन्ही शब्द `नी' या एकाच धातूपासून उत्पन्न झाले आहेत.
नीती नसलेला नेता म्हणजे दृष्टि नसलेला नेत्र होय. नेत्र म्हणजे नेणारे इंद्रिय.
नेत्र शब्द देखील `नी' या धातूपासून सिद्ध होतो. नेत्र म्हणजे नेऊन रक्षण करणारा, किंवा रक्षण करीत नेणारा.
महाराष्ट्राचे, भारताचे, जगाचे नेतृत्व आज पदभ्रष्ट, नीतिभ्रष्ट झाले आहे.
ज्या द्रष्ट्रत्वाने सनातन सत्याचे संशोधन केले, त्या `प्रज्ञान' चक्षूने `प्रज्ञान हेच ब्रम्ह' हे सत्य उद्घोषिले ते द्रष्ठत्व, तो प्रज्ञान चक्षू आज तरी नियमित झाल्यासारखा वाटतो.
मानवी संस्कृतीची स्थायी मूल्ये कोणती व आगंतूक आभास कोणते याचा निश्चय आजच्या जागतिक नेतृत्वाला देखील झालेला नाही.
आजच्या महाराष्ट्राला नेता नाही. बंगाल, पंजाबला कोठे आहे? आजच्या जगाला तरी कोठे आहे?
खरा नेता कोण - जो योग्य ठिकाणी व योग्य तऱ्हेने नेईल तो नेता.
श्रेयाकडे नेईल तो नेता.
नेतृत्त्व व अधिकार कधीही एकत्र असू शकत व बसू शकत नाहीत. सत्ता, अधिकार व शासक शक्ती या गोष्टी नेतृत्वाशी संलग्न झाल्या की, ते नेतृत्व शबलित, कलंकित होणारच.
नेतृत्वाचा खरा अर्थ काय?
नेतृत्व म्हणजे एक उद्बोधक `उदात्त' व उज्वल असे उदाहरण घालून देणे, असे एक प्रगल्भ प्रात्यक्षिक निर्माण करून ठेवणे. नेतृत्त्वाला दुसरा अर्थच नाही.
नेतृ्त्त्व स्वीकारणे म्हणजे सत्ता गाजविणे नव्हे, हुकूमशाही नव्हे.
नेता हा पुरोहित असतो, पुढे राहिलेला असतो. म्हणजे तो सर्वांच्या पुढे असतो, अगोदर जातो, व शेवटपर्यंत म्हणजे आवश्यक तर स्वत:चा देखील शवट होईपर्यंत त्याच ठिकाणी झगडत रहातो.
नेता हा लोकांच्या, सर्वांच्या `वर' नसतो - `पुढे' असतो. पुढे म्हणजे त्याच श्रेणीवर पण अग्रभागी.
एकदा, नेता लोकांच्या, `वर' चढू लागला, चालू लागला की, त्याचे नेतृत्व लयास जाते.
लोकांच्या न्याय्य अपेक्षा व आकांक्षा पायदळी तुडवू लागला की, त्याचे नेतृत्त्व हास्यास्पद होऊ लागते.
तो लोकांच्या डोक्यावर चालू लागतो. अर्थातच त्याच्या `जड' भारामुळे लोकाची मान थरथर कापू लागते आणि तो वर चढलेला `वरचढ' नेता अलगद लोकांच्या पायदळी पडतो.
जो नेता स्वत: `लोकांनी' शिरसा `मान्य' केला असेल तो अर्थातच लोकांचे `वर' असू - राहू शकतो.
वास्तविक, तो स्वत: `वर' नसतो. लोकच त्याला स्वत:चे शीर्ष समजतात; अथर्वशीर्ष मानतात.
ज्ञानेश्वर माऊलीने निर्मिलेला `लोकसंस्था' हा महान शब्द आठवतो.
लोकशाही ही एक लोकसंस्था आहे.
जो नेता, लोकांचे उत्तमांग असेल, अथर्व शीर्ष असेल लोकांशी संबद्ध, संलग्न राहून जो स्वत:चा व त्यांचा आत्मविकास सिद्धविल तोच खरा लोकमान्य नेता.
जो लोकसंस्थेचा अधिक्षेप करील, उपमर्द करील, त्या नेत्याचे नेतृत्व, त्याचा स्वत:चा अध:पात शतमुखांनी घडवून आणण्यापुरतेच शिल्लक उरते!!
लोकमान्य टिळक हे भारताच्या लोकसंस्थेचे `अथर्वशीर्ष' होते, उत्तमांग होते.
भारतीय लोकसंख्या हे लोकमान्यांचे आराध्य दैवत-
-आणि लोकमान्य हा भारतीय लोकसंस्थेचा तेजस्वी स्वातंत्र्य - तिलक.
पूज्य व पूजक या दोन्ही वृत्तींचे जेथे स्वाभाविक तादात्म्य होते, तेथेच खरे स्वातंत्र्य व खरे ऐश्वर्य म्हणजे ईश्वरी - भाव सिद्ध होतो.
लोकमान्य व भारतीय लोकसंख्या यांचेमध्ये असे तादात्म्य आहे.
लोकमान्यांनी दिलेल्या स्फूर्ती, प्रेरणा व निष्ठा अनंत काल भारताला चेतवीत राहतील.
भारत लोकमान्य यांचा सहभाग चिरंजीव आहे.
वैदिक व मध्यकालीन भारताचा प्रभावी प्रतिनिधी आणि आधुनिक व भविष्यकालीन भारताचा निर्माता हेच लोकमान्यांचे यथार्थ अवतार -स्वरूप होय.