पश्यंती (२७)
(रोहिणी - एप्रिल - ६३)
भगतसिंगाचे पुण्यस्मरण
प्रवाचक - न्या. विनोद.
२३ मार्च १९३१, या दिवशी सूर्यास्तानंतर लाहोरच्या तुरूंगात, भारतीय क्रांतीकारकांचे अग्रणी सरदार भगतसिंग यांना फासावर चढविण्यांत आले.
भगतसिंगांबरोबर त्यांची दोन फुप्फुसे राजगुरू व सुखदेव यांनाही शेवटचा श्वास अगदी त्याच क्षणी थांबवावा लागला. त्यांनाही भगतसिंगाबरोबर लाहोरच्याच तुरूंगात फासावर लटकून प्राण सोडावे लागले.
जणू काय भगवान सूर्यनारायणाच्या कोटी सहस्त्र चक्षूंना हा भयंकर अन्याय पहाणे असह्य झाले आणि म्हणूनच तो अगोदरच अस्तंगत झाला होता!
भगतसिंगाच्या परमपूज्य वीरमातेला, स्वत:च्या भारतरत्न पुत्राची अंतीम डोळा - भेट नाकारण्यात आली. एकट्या तिलाच भगतसिंगांना भेटण्याची अनुज्ञा त्या वेळच्या सरकारी सैतानांनी दिली. पण त्या वीरसू मातेने, ती संधी धैर्याने नाकारली, कारण तिच्याबरोबर गेलेल्या दुसऱ्या तीन कुटुंबियांना भगतसिंगांना भेटण्याचा परवाना नाकारण्यात आला होता.
तो क्षण त्या माऊलीला असिधारेप्रमाणे वाटला होता. तिचे हृदय रक्तबंबाळ झाले होते. आपल्या राजस राजीवाला एकदा तरी अखेरचे डोळे भरून पहावे असे एक मन तिला सांगत होते. दुसऱ्या मनाचे स्फुरण निराळे होते. दुसरे मन तिला म्हणाले, 'तू त्याला एकटी कशी भेटणार? पाशवी सत्तेपुढे तू आपले मस्तक वाकविणार? तुझ्या बरोबरचे कुटुंबीय मागे ठेवून, तू एकटी तुझ्या आणि भारतमातेच्या या वीरश्रेष्ठाचे दर्शन घेणार? खरोखरच चिरंजीव असलेल्या तुझ्या भाग्य-पुत्राची चर्म-मुद्रा तुला दिसली नाही तर काय होणार आहे?
''त्याच्या डोळयांचे सूर्य - चंद्र अनंत आकाशांत कायमचे लखलखणार आहेत. त्यांच्याकडे तू आणि भारतमाता अनंतकाल पाहू शकणार आहांत! तू क्षणिक स्वार्थाला बळी पडू नकोस. तू भगतसिंगाला आता न भेटलीस तरच त्याच्या आत्म्याला अधिक आनंद होईल. तू वीरमाता आहेस. भगतसिंंगांच्या मातु:श्रीला असला स्वार्थ कधीही शोभणार नाही.
त्या वीरमातेने निश्चय केला. भगतसिंगाना भेटण्याचे तिने नाकारले. तिच्या हृदयांतले रक्त तिच्या डोळयांतून आसवांच्या रूपाने पाझरू लागले. तिच्या अंत:चक्षूंनी तिच्या नंदकिशोराचे, अभिमन्यूचे दर्शन घेतले. आसवांच्या अमृताने त्याला न्हाऊ घातले. पंचप्राणांच्या प्राणवायूने त्यांचे अंग फुंकरले व पुसले, आणि चिरंततेच्या, अमरतेच्या पाळण्यांत त्याला एकदाचे आणि कायमचे ठेवून दिले. त्या वेळी तिने गाईलेले अंगाईगीत, कालदेवतेला चिरकाल ऐकू येईल!
(२)
या धीरोदात्त प्रसंगाचा उल्लेख अनेक हिंदी पद्यांत आहे. क्रांतीशाहीर दीक्षीत यांच्या भगतसिंगाच्या पोवाड्यांत तो करूण - रसाळ अर्थ तेजाळ शब्दांत रंगविला आहे.
आपल्या पुण्यातला गायकवाड वाडा भगतसिंगांना दाखविण्याचे भाग्य मला लाभले होते. गायकवाड वाड्यापुढे त्यांनी, दंडवत् पडून लोकमान्यांना साष्टांग प्रणिपात केला होता, तेथील माती मस्तकी धारण केली होती.
लाहोर, दिल्ली, अमृतसर या शहरांतल्या एखाद्या अंधाऱ्या गल्लींतल्या मोडक्या घरांत क्रांतीकारकांच्या गुप्त् बैठकी होत असत. तेथे क्रांतीसन्मुख युवकांना दीक्षा देण्यात येत असे.
त्या ठिकाणी क्रांतीकारकांची कठोर परीक्षा होई. तापलेले खिळे स्वत:च्या शरीरावर ठेऊन घ्यावे लागत. निखारे हातांत घेणे, रक्तांने शपथ - पत्रिका लिहीणे, अशा प्रकारच्या अनेक दिव्यांतून क्रांतीदेवतेच्या अभिनव उपासकांना जावे लागे.
त्या वेळचे ते स्फूर्तीदायक प्रसंग माझ्या डोळयांमोर वास्तवतेच्या तेजाळ दीप्तीने, अजूनही खडे होत असतात.
८ एप्रिल १९२९ या दिवशी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त या दोघांनी दिल्लीच्या असेंब्ली हॉलमध्ये एक स्फोटक बाँम्ब टाकला. सायमन कमिशनचे सभासद यावेळी उपस्थित होते.
भगतसिंग व त्यांचे सहकारी हे अहिंसावादी होते, याचा हा पुरावाच नाही काय?
स्वत: सायमनवर व कमिशनच्या सभासदांवर त्यांना तो स्फोटक बाँब टाकता आला असता. पण हेतूपूर्वक त्यांनी हिंसा टाळली. त्यांच्या बाँबफेकीचे पडसाद इंग्लंडमध्ये आणि सर्व जगभर उमटले. भगतसिंगांचे उद्दीष्ट एवढेच होते.
(३)
भगतसिंग हे अकारण हत्येच्या पूर्णतया विरूद्ध होते. त्यांचा प्रत्यक्ष सहवास घडलेल्या व्यक्तींना, त्यांचे अंत:करण किती हळूवार, दयार्द्र व स्नेहाळू होते, चांगलेच ठाऊक आहे.
भगतसिंगांसारख्या लोकोत्तर महामानवांच्या वृत्ती, तत्त्वनिष्ठेमुळे 'वज्रादपि कठोराणि` होत असत. पण स्वभावत: त्या वृत्ती 'मृदूनी कुसूमादपि` अशा होत्या.
तेवढ्या लहान वयांतही ते परिणत प्रज्ञासारखे बोलत. त्यांचे अध्ययन विशाल होते. भगवद्गीतेचा दुसरा व पंधरावा अध्याय त्यांना मुखोद्गत होता. ''माम् अनुस्मर युध्य च।` ही शब्दपंक्ती हा उर्जस्वल संदेश त्यांच्या तोंडून अनेक वेळा ऐकावयास मिळे. ते म्हणत, 'आपल्या प्रत्येकामध्ये भगवान श्रीकृष्ण आहेत. आपण प्रत्येक जर 'नर` आहोत, म्हणजे अर्जून आहोत. गीता हा एक नरनारायण संवाद आहे, आणि तो संवाद मानव मात्रामध्ये अखंड चालू आहे.`'
ते म्हणत, ''आपण कोणाला मारू शकत नाही, व कोणी आपल्या हातून मरूही शकत नाही. आवश्यक असेल तेव्हा दुर्जनांचा संहार करणे हे भगवंताचे अवतारकार्य आहे. प्रत्येक मानव हा नर-नारायण असल्यामुळे हृदय-परिवर्तन, सात-दंड अयशस्वी झाल्यावर दुष्टांचा संहार हेच त्याचे नैसर्गिक कर्तव्य ठरते.``
''भारताच्या स्वातंत्र्यासाठी हा संहार म्हणजे तर एक देवपूजाच आहे. आपण इंग्रजांना, ते इंग्रज म्हणून केव्हाही मारणार नाही. भारताच्या स्वातंत्र्याचे शत्रू म्हणून त्यांना मारणे, हा धर्म प्रयत्न आचरणांत आणला पाहिजे.``
(४)
सीमा प्रदेशांतील चिनी आक्रमकांबद्दल प्रत्येक भारतीय तरूणाने आज ही भूमिका स्वीकारणे सर्वथैव आवश्यक आहे. आततायी आक्रमकांची हत्या ही हत्या नव्हे, ते एक शान्तिकर्म आहे.
भगतसिंगांच्या ठिकाणी सर्व धर्मांबद्दल आदर असे. ते म्हणत, ''भारतीय स्वातंत्र्याचा द्वेष्टा तो म्लेंछ. कोणत्याही स्वातंत्र्याचा द्वेष्टा तो म्लेंच्छ. मग तो काशीतील वेदमूर्ती ब्राम्हण असला तरी तो म्लेंछच.``
भगतसिंगांचे शब्द म्हणजे अग्नीचे स्फुल्लींग असत. त्यांच्या तोंडातून जणू काय निखारेच बाहेर पडत असत. कानांना स्पर्श न करता ते निखारे काळजाला जाळीत असत.
त्यांना उभे राहून बोलण्याची फार आवड असे. एक श्रोता असला तरी ते उभे रहात व बोलू लागत. सूर्य, चंद्र, तारे यांना उद्देशून कधी कधी ते लहानसे व्याख्यान देत सूर्याला म्हणत, ''तू अंधाराचा शत्रू ना? मग भारतातला हा अंधार तुला कसा दिसत नाही?'' चंद्राला म्हणत, ''भारताला तुझ्या शीतल किरणांची जरूरी नाही. आम्हाला चटके देणारी अशी किरणे तू टाकशील तर आम्ही उपकृत होऊ.`` ते ताऱ्यांना सांगत, ''तुमचे तेज भारतीय तरूणांच्या अंत:करणशंत तळपले पाहिजे. तुम्ही तेथे जाऊन बसा.``
ते अभिजात कवी होते, धर्मज्ञ होते, तत्त्वज्ञ होते, पण त्यांचे सर्व प्रतिभा विशेष देशभक्तीत व स्वातंत्र्यप्रेमात विलीन झाले होते.
लोकमान्यांची निष्ठा त्यांनी पूर्णपणे आत्मसात केली होती.
'अगोदर स्वातंत्र्य, नंतर सर्व प्रकारच्या चळवळी.` ते म्हणत, ''इतिहासाच्या जड अभ्यास काय कामाचा? सर्व मानवी इतिहास एकच गोष्ट शिकवितो. स्वतंत्र व्हा आणि स्वतंत्र रहा.`` त्यांच्या मते धर्म म्हणजे, ''स्वातंत्र्य मिळवून देणारा आचार.``
भगवान श्रीकृष्ण, प्रभू रामचंद्र, कालीमाता, श्रीशंकर आणि दत्तभगवान हे त्यांचे देव-पंचायतन असे.
(५)
पंजाबच्या लायलपूर जिल्ह्यांतील वंगा नावाच्या एका खेड्यांत १९०७ साली भगतसिंगांचा जन्म झाला. त्यांचे वडील किशनसिंग, क्रांतीकार्यासाठी कारावास भोगत होते. त्यांचे चुलते अजितसिंग हद्दपारीची शिक्षा झाल्यामुळे परराष्ट्रांत फिरत होते.
सरदार भगतसिंगांना तीन धाकटे भाऊ व तीन भगिनी होत्या. त्यांच्या तिसऱ्या वर्षीच ते गायत्री मंत्राचा नियमित जप करू लागले. 'तू मोठेपणी काय करणार?` असा प्रश्न त्यांच्या वडिलांचे स्नेही त्याला पिंडीदास यांनी त्यांना विचारला, ते म्हणाले, ''मी खूप खूप बंदूका तयार करणार.`` आपले सवंगडी एकत्र करणे. त्यांना दोन तहांत विभागून लुटुपुटीच्या लढाया करणे, एक बाजू इंग्रजांची व दुसरी भारताची, त्यांच्यामध्ये युद्ध व भारताची सरशी हे त्यांचे बाळपणाचे खेळ होते.
भगतसिंगाचा पुण्याशी जिव्हाळयाचा संबंध होता. लोकमान्य टिळक हे त्यांचे स्फूर्तीस्थान होते.
शिवराम हरी राजगुरू या त्यांच्या जिवलग सहाय्यकाचा जन्म पुणे जिल्ह्यांतील खेड गावी झाला होता. राजगुरूंनी काशी विद्यापीठाची तर्कशास्त्राची सर्वाच्च् परीक्षा दिली होती.
उमरावतीच्या हनुमान व्यायाम शाळेंत त्यांची लाठीकाठीचे शिक्षण घेतले होते. नागपूर येथील रा. स्व. संघाच्या शाखेत ते प्रकटपणे काही काळ जात असत. दिल्ली, लाहोर, फिरोजपूर, कानपूर, मजमीर इत्यादी ठिकाणी त्यांचा संचार असे. त्यांनी च म्हणजे 'मर्डरर` (इंग्रजांचा) असे नाव धारण केले होते.
सुखदेव हे भगतसिंगांबरोबर फाशी गेलेले दुसरे युवक. लाहोर येथे काश्मीर बिल्डींगमध्ये बाँब तयार करण्याचा एक कारखाना सुखदेवांनी चालविला होता. त्यांच्या ठिकाणी कर्तृत्व शक्ती, नेतृत्व शक्ती व संयोजक शक्ती या तीन्ही शक्तींचा त्रिवेणी संगम होता.
सुखदेवांना क्रांतीकारकांचे मस्तक म्हंटले आहे. भगतसिंग हे क्रांतीचे आक्रमक बाहु-बल होते. या उपमा त्यांना फांशीची शिक्षा फर्मावणाऱ्या न्यायाधीशाने दिल्या होत्या. अर्थात् त्या तितक्याशा खऱ्या नाहीत.
त्या तिघांनाही ओळखणाऱ्या माझ्यासारख्या व्यक्तीला, भगतसिंग, राजगुरू, व सुखदेव हे दत्त भगवानांप्रमाणे एकरूप वाटत. भगतसिंगांचे व्यक्तीमत्त्व झशीीिरिश्रळींू अतीव आकर्षक होते. त्यांची उंची ५ फू ट ८ इंच होती. वर्ण गोरा, दृष्टी भेदक, अनंत अंतराळाचा व सप्त् पाताळांचा ठाव घेणारी अशी होती. ते टोकदार मिशी राखीत. उग्रता, शीघ्रता व एकाग्रता हे जणू काय त्यांचे त्रिनेत्र होते. हिरवी फेल्ट हॅट डोक्यावर किंवा हातात असे. अस्सल इंग्रजी पद्धतीचा सूट ते सामान्यत: वापरीत, त्यांच्या संचारातया आंग्ल वेषाची फार मदत होई. कलेक्टर, पोलीस ऑफिसर, न्यायाधिश यांचा अभिनय करून पोलिसांच्या पकडीतून सहज सुटका करून घेत.
पंडीत मोतीलाल नेहरूंना भगतसिंगांच्या व्यक्तीमत्त्वाबद्दल फार आदर वाटे, लाहोरच्या काँग्रेस अधिवेशनानंतर (१९२९) त्यांनी स्वत: भगतसिंगाची भेट घेतली होती. भेट झाल्यावर ते म्हणाले, ''माझ्यापेक्षा श्रेष्ठतर व्यक्तीला भेटण्याचे, तिच्याशी बोलण्याचे भाग्य मला लाभले.``
भारतावर चीनचे आक्रमण झाले आहे, होत आहे. व उद्या ते अत्यंत प्रखर प्रमाणांत होण्याची शक्यता आहे. अशा वेळी भारतीय तरूणांना भगतसिंगांच्या आत्माहुतीचे पुण्यस्मरण, त्यांचा उर्जस्वल संदेश अत्यंत उपयुक्त व स्फूर्तीदायक ठरेल.
फाशी जाण्यापूर्वी भारतीय तरूणांना उद्देशून ते म्हणतात -
''भारतवर्षाला आज अशा तरूणांची जरूरी आहे की, जे स्वत: पुढारी होण्याचे ध्येय ठेवणार नाहीत. पुढारी होण्याकरीता पुढे येणाऱ्या तरूणांच्या हातून काहीही होऊ शकणार नाही. देशाकरीता जगण्यापेक्षा, देशासाठी मरण्यास सिद्ध असलेले तरूण पुढे येतील, तेव्हाच त्यांच्याकडून भारताची सेवा होईल, असे मला वाटते.``