श्री शिव चिंतन
ज्वलद्व्य घ्मतेजाय नम: शिवाय।
श्रीविष्णुरूपाय नराधिपाय।
महाराष्ट्र- धर्म- श्रुतीरूक-प्रणेत्रे:।
स्वातंत्र्य-मंत्र-प्रदात्रे नमोस्तु।।
सन १९३० सालची दासनवमी सज्जनगडावरील उत्सव मध्यान्हीचा समय फलाहार सुरू होता. भक्तमंडळी एका मागून एक श्लोक म्हणत होती. माझे एक स्नेही श्री. विष्णूपंत रामचंद्र गोखले यांनी मला, श्रीशिवप्रभूंवर स्वकृत व संस्कृतमध्ये श्लोक म्हणण्याचा आग्रह केला.
`ज्वलंत' सूर्य-किरणांतून वरील श्लोक मला श्री शिवसमर्थांनीच पाठविला असावा. `ज्वलंत' शब्दाने श्लोकाची सुरूवात झाली आहे. कारण, फलाहार करताना मला उन्हाची तीक्ष्ण तिरीप भाजत होती! हा अगदी सामान्य श्लोक मोठा भाग्यवान ठरला. श्री विष्णूपंत गोखले यांनी एका चित्र - मुद्रकाकरवी श्रीशिवाजी महाराजांच्या चित्राच्या सव्वालक्ष प्रती काढल्या व त्या चित्राखाली माझा वरील श्लोक छापला.
एकेका क्षणाचे सामर्थ्यच विलक्षण असते. १९३० सालचे प्रचंड आंदोलन सुरू होते. स्वातंत्र्यप्राप्तीची स्फर्ती देण्यास श्रीशिवप्रभूंच्या चित्रापेक्षा अधिक सामर्थ्यवान प्रतीक कोठे आढळेल?
श्री. गोखले यांनी मधला गांधींचा आशिर्वाद त्या चित्राला मिळवला होता. मी त्यावेळी उपस्थित होतो. महात्माजींनी शिवप्रभूंच्या चित्राला भावपूर्ण वंदना केली. बृहन्महाराष्ट्रात व बाहेरही, ते चित्र झंझावाताच्या वेगाने संपले.
तीन सालच्या स्वातंत्र्याच्या आंदोलनाला नव-स्फर्ती देण्यासाठी श्रीशिवप्रभूंनी सव्वालक्ष महाराष्ट्रीयांच्या घरांत चित्ररूपाने प्रवेश केला! श्रीशिवसमर्थांनी, मला दास नवमीच्या मध्यान्ह काळी अगदी सामान्य संस्कृत कविता पाठविली. पण चार चरणांच्या, चार चाकांच्या त्या रथावर श्रीशिव-सामर्थ्याचा आशीर्वाद आरूढ होता. मध्यान्हीच्या सूर्यकिरणांवरून तो श्लोक रथ आला होता.
श्री गोखले यांनी काळाची खूण ओळखली. व महाराष्ट्र जागृतीसाठी श्रीशिवाजी राजांना सव्वालक्ष घरांत नेले.
तीस सालच्या त्या दास नवमीला मी व श्री. गोखले सज्जनगडावर नसतो, मी तोच श्लोक म्हटला नसता, तर कदाचित ते श्रीशिवप्रभूंचे स्फूर्तीदायक चित्र प्रकटलेही नसते. पण असे होईल कसे?
श्रीशिवबा प्रत्येक महाराष्ट्रीयाच्या घरांत सूक्ष्म रूपाने कायमचे आहेत. चित्रमूर्ती असो वा नसो, पण कधी कधी आपणच त्यांना येऊ देत नाही. ओळखीत नाही. व त्यांची दिव्य स्फर्ती ग्रहण करीत नाही.
श्रीशिवप्रभूंच्या कालाशी तूल्यबळ काल आज येऊ पहात आहे. तांबडे फुटत आहे. प्रत्येक मराठी मनांत श्रीशिवप्रभूंचा नवोनव अवतार होऊ लागला आहे.
श्रीशिवप्रभूंचा आठव हा एक तेजाळ वन्ही आहे. हा वन्ही आज आपण चेतविला पाहिजे, आणि तो `चेतविताची चेताविला' जाणार आहे. अगदी दोन दिवसांपूर्वी, त्या तीस सालच्या शिवप्रभूंच्या फोटोपुढे माझे एक तरूण स्नेही श्री. वामनराव फाटक, भक्तीभावाने ओणवताना मी पाहिले, मला फार आनंद झाला. अनेकानेक महाराष्ट्रीय गृहांत आजदेखील श्रीशिवप्रभू स्वत:च्या लाडक्या मराठ्यांना त्या तीस सालच्या चित्राद्वारे स्फर्ती देत आहेेत, ही केवढी भाग्याची गोष्ट आहे.
श्रीशिवप्रभूंच्या आणखी एका स्फर्तीदायक चित्राला `अंकावर' घेऊन `माऊली' नवमहाराष्ट्राला भेटण्यासाठी येत आहे. श्री. बाळशास्त्री हरदास दुसरे अनेक तेजस्वी वीर, वीरोत्तम शिवप्रभूंना वंदना करण्यास `माऊली' जवळ आले आहेत. `माऊली' च्या या दर्शनाने सर्व महाराष्ट्रीयांनी नवस्फर्ती घ्यावी.
श्रीशिवप्रभूंच्या जीवनात ब्रम्हा, विष्णू, शिव या तीनही देवतांचा अधिवास होता. नवनिर्माण - शक्ती (ब्रह्मा), व्यापक व संरक्षक शक्ती (विष्णू) आणि मांगल्य-शक्ती (शिव), श्रीशिवरायांच्या प्रत्येक कार्यक्रमात ही शक्तीत्रयी सुप्रतिष्ठित होती.
विविध शक्तींची निदर्शके, प्रतीके म्हणजे देवता होत.
श्रीशिवबांनी `हिंदवी' स्वराज्य निर्माण केले. एक नवी `महाराष्ट्रीय' संस्कृती निर्माण केली. भारताच्या अलीकडच्या इतिहासात प्रथमच लोकशाहीची `पार्लमेंटरी डेमोक्रसी'ची संस्थापना केली. `राज्यव्यवहार कोशा' सारखी राजकीय मार्गदर्शिका उपलब्ध केली. खरोखर त्यांनी इतक्या विविध स्वरूपाची `नव-निर्मिती' केली आहे की, तिचे स्वरूप आकळणे सुतराम अशक्य आहे. `ब्रम्हा' ही शक्ती किंवा तो शब्द पौराणिक, बुरसट व गढूळ वाटत असेल, तर `नव-निर्माण-शक्ती' श्रीशिवरायांचे ठिकाणी किती भव्य प्रमाणांत उपलब्ध होती, याचेही एक स्वयंस्पष्ट सत्य आहे.
श्री शिवरायांच्या बुद्धीची व कृतीची `व्यापकता', त्यांनी केलेले महाराष्ट्राचे व मराठ्यांचे पितृवत पालन व सर्वतोपरी संरक्षण या गोष्टी त्यांच्या ठिकाणचे `विष्णू-त्व' प्रकट करतात. `व्याप्नोति इति विष्णू:।' व `ना विष्णु: पृथ्वीपती:।' ही दोन वचने या संदर्भात ध्यानांत घेतली पाहिजेत. ते अभिषिक्त सम्राट होते, म्हणून त्यांचे ंठिकाणी विष्णूत्त्व प्रसिद्ध होते. विशाल महाराष्ट्राला व भारताला त्यांनी आपल्या महनीय व्यक्तीत्वाने व कर्तृत्वाने व्यापून घेतले होते. या मुद्याचा अधिक विस्तार या लहान लेखांत करता येत नाही.
आता श्रीशिवरायांच्या `शिव-त्वा' चा अल्पविचार करू. पण त्याची आवश्यकता आहे काय? शिवाचे शिवत्व स्वयंस्पष्ट नव्हे का? `शिव' शब्दाचा अर्थ `मंगल' असा आहे आणि `मंगल शब्दाचा निरूक्तार्थ `हालचाल करणारे' `चैतन्यमय' हा आहे. सर्व मंगलांचे मंगल म्हणजे स्व-तंत्रता, स्वतंत्र आत्म-तत्त्वाशिवाय देह हा प्रेतवत् आहे, अमंगल आहे. व्यक्ती अथवा समाज स्वतंत्र नसेल, तर ते प्रेतच होय. म्हणून शिवत्व किंवा मंगलत्व म्हणजे स्वातंत्र्य. श्री शिवरायांनी, स्वत:चे व महाराष्ट्राचे स्वातंत्र्य अनुभवले, सिद्ध केले. सर्वांगिण स्वातंत्र्याची मंगलमूर्ती म्हणून श्रीशिवरायांचे शिवत्व स्वयंसिद्ध आहे. नव-निर्मातृत्व, व्यापकत्व व स्वतंत्रत्व किंवा जुन्या भाषेत, ब्रम्हा-त्व, विष्णू-त्व व शिवत्व ही शक्ती-त्रयी किंवा देवता-त्रयी श्रीशिवप्रभूंच्या स्वरूपात व्यक्त झाली होती व सतत होत आहे.
`सत्यं, शिवं, सुंदरम्।' ही त्रिपुटी मानवतेचे चिरंतन ध्येय आहे. वैदिक-भारतीय संस्कृतीची ही त्रिपदा गायत्री आहे.
श्रेष्ठतम व आदर्श भारतीय सत्पुरूषांच्या प्रत्यक्ष जीवनात सदैव चमचमणारे `रत्नत्रय' म्हणजे सत्यं, शिवम्, सुंदरम्!
निरपवाद सत्य व प्रभातरल प्रमाणबद्ध किंवा सौंदर्य ही शिवत्वाची स्वरूप-लक्षणेच आहेत.
सत्य व सौदर्य नसेल, तेथे शिवत्व, मांगल्य व सौभाग्य केव्हाही असू शकत नाही. सौंदर्य म्हणजे नुसती प्रमाणबद्धता नव्हे. खऱ्या सौंदर्यात एक आगळी, एक अनिर्वचनीय `प्रभा' असते. सौदर्य हे शिवत्वाशी संलग्न असल्यामुळे ही `प्रभा' उदीत होत असते.
सत्य हे देखील नुसते शाब्दिक किंवा ऐतिहासीक असून भागत नाही. शिवत्वाशी संलग्न असल्यामुळे सत्य हे परम अर्थाने, पारमार्थिक अर्थाचे सत्य असणे आवश्यक आहे.
सत्य हा शब्द `कृत्य' या शब्दाप्रमाणे `योग्यता' वाचक आहे. जे करण्यास `योग्य' ते कृत्य, त्याचप्रमाणे जे असण्यास `योग्य' ते सत्य होय. नुसते असणे हे `सत्य' नव्हे. प्रमाद अनीती, अन्याय हे देखील `असतातच' नव्हे का? पण ती सत्याची स्वरूपे नव्हेत, कारण ती असण्यास `योग्य' नाहीत. शिवत्वाशी संलग्न नाहीत. `सत्य' शब्दाची ही अर्थ-छटा आपण लक्षात घेत नाही.
श्रीशिवराजांच्या धर्मकारणांत, राजकारणांत व एकंदर कार्यपद्धतीत या अर्थाचे सत्य, सौंदर्य व शिवत्व झगझगीतपणे प्रकट झाले होते. म्हणूनच ते वैदिक - भारतीय संस्कृतीचे आदर्श प्रतिनिधी आहेत.
श्रीशिवाजी हे एकांतिक मातृभक्त होते. मातृभक्तीतून ते जगन्मातृभक्ती शिकले. आत्यंतिक प्रेमाने त्यांना भवानी-माऊलीच्या प्रेमाचे वस्तूपाठ दिले.
या जगात कोणावरही अतीव, निरूपचार व सर्वस्व-समर्पण बुद्धीने प्रेम केले, तर त्या प्रेमाचे ईशभक्तीत व विश्वप्रेमांत स्वरूपांतर होते. अद्वैत हे अंतिम सत्य आहे. प्रेमभावना ही द्वैतातले अद्वैत व्यक्त करणारी शक्ती आहे.
उत्कट व उज्जवल प्रेम हे व्यष्टींतून प्रथमत: परमेष्ठीकडेच जाते आणि नंतर समष्टिकडे परत येते. समष्टिसेवा, समष्टि प्रेम, ही ईश्वरभक्ती नंतरची अवस्था असणे योग्य आहे.
बहिर्मुख समाजसेवा यशस्वी होत नाही समाज हे ईश्वराचे स्वरूप आहे. तो दृश्य झालेला परमात्मा आहे, अशी मनोभूमिका उत्पन्न होण्यास अगोदर परमात्म्याचे, ईश्वराचे तत्त्व व विभु-स्वरूप ओळखले पाहिजे.
खरी राष्ट्रसेवा ही ईशसेवेंतरची स्थिती आहे.
भगवंताचे अधिष्ठान प्रथम हवे. जो जो कार्य करील, त्याच्या चळवळीला सामर्थ्य आहे. पण ते नंतर येते, अगोदर ईशनिष्ठा असेल, तर ते येते, अगोदर ईशनिष्ठा असेल, तर ते येते. ईश्वरनिष्ठांच्या मांदियाळीने जेवढी मानवसेवा केली, राष्ट्रसेवा केली; तेवढी केवळ राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांकडून केव्हाही होऊ शकली नाही.
देव मस्तकी धरून नंतर हलकल्लोळ केला, तरच तो यशस्वी होतो, हा श्रीसमर्थ रामदासांचा सिद्धांत सर्वथैव निरपवाद असा आहे.
श्रीशिवराय हे माऊली-प्रेमांतून जगन्माउलीत विलीन झाले व नंतर राष्ट्र-माऊलीकडे परतले. जिजामाता ही भवानी-माता दिसू लागली. भवानीने जिजामाऊलीत स्वस्वरूपाचा आविष्कार केला.
स्वकीय व्यक्तीत्वाच्या पलीकडे गेल्याशिवाय अतींद्रीय शक्ती किंवा ईश-शक्ती प्राप्त् होत नाही. ईशभक्तीची विविध स्वरूपे आहेत. मातृ-पितृ-भक्ती किंवा गुरूभक्ती. आत्यंतिक कोटीची झाली की, तीच ईशभक्ती होते. श्रीशिवबांनी आत्यंतिक माऊली-प्रेमाच्या द्वाराने ईशभक्ती आत्मसात केली व कित्येक अतींद्रीय शक्ती स्वत:च्या ध्येयसिद्धीसाठी आकृष्ट केल्या.
भवानी माउलीच्या मूर्तीपुढे रात्रीचे तासन तास नमस्कृतीच्या आसनात `दण्डवत' राहून ते माऊलीचा आशीर्वाद घेत व नंतर दुसरे दिवशी, म्लेंच्छांच्या सहस्त्रकांशी, मराठ्यांच्या शतकांनी लढून सहजासहजी अभूतपूर्व विजय मिळवित .
श्रीशिवराय हे आत्मविश्वासाचा एक हिमालय होते. त्या हिमालयातून प्रत्येक मराठ्यासाठी आत्मविश्वासाचे व स्फूर्तीचे महानद पाझरत असेत. ते प्रत्येक सावळया-मावळया मराठी माणसांत आत्मविश्वास जागृत करीत व ठेवीत. मराठ्यांची त्यांच्यावर अढळ निष्ठा होती, पण ती निष्ठा, श्रीशिवराय आत्मविश्वास निर्माण करीत म्हणून असे. अंधश्रद्धेने अथवा भाबड्या निष्ठेने पुष्कळ वेळा आत्मविश्वास कमी होतो. व मनुष्य अधिक दुबळा व परावलंबी होतो तसे केव्हाही होता कामा नये. देव, आई, गुरू, नेता यांच्यावर स्वत:चा आत्मविश्वास वाढवील, अशा प्रकारची श्रद्धा ठेवावी.
खऱ्या नेतृत्वाचा अर्थ हाच आहे; प्रत्येक अनुयायाचा स्वत:विषयी विश्वास वाढविते, ते खरे नेतृत्व.
ईस्ट इंडिया कंपनीच्या एका इंग्रज अधिकाऱ्याने लिहीले होते की, - `सर्वच मराठे स्वत:ला शिवाजी समजतात व तसे ते आहेतही! शिवाजी एक नसून शेकडो आहेत, असे वाटू लागते.
श्रीशिवाजीच्या नेतृत्वाचे एका परकि निरीक्षकाने केलेले हे वर्णन किती मार्मिक व रहस्य-बोधक आहे!
स्वत:च्या ठिकाणी प्रकटलेली ईश-शक्ती, अतींद्रीय-शक्ती वाटीत, उधळीत जाते ते खरे नेतृतव होय. आई, वडील, गुरू यांच्या ठिकाणी ठेवलेल्या एकांतिक निष्ठेमुळे ईश्वरावरील निष्ठेचा वस्तूपाठ मिळतो व लवकरच ईश-शक्ती व अतींद्रीय शक्ती कोणालाही उपलब्ध होऊ शकतात.श्रीशिव माऊलीचे जीवन व `माउलीचा' शिव जयंती अंक हाच वस्तूपाठ देत आहे.