जन्मोजन्मींच्या त्या, नात्यांचा आठव
होताच हा जीव, आनंदतो।
तुझा माझा आहे, शेजार जो आज।
आणि हे निर्व्याज, तुझे प्रेम।
तयांची कारणें, अनंतेला ठावीं।
तू नि मीं रहाणें, सदा ऐसे।
नदीच्या काठाला, रांग ही पक्ष्यांची।
घडी पापणींची, तुझ्या नेत्रीं।
नदीचे आटेल, उन्हाळयात पात्र।
अश्रू न सरतील, तुझ्या नेत्रीं।
अखंड हा पूर, सये कां चालतो।
जरा जाता दूर, एक जन्मीं।