वायाचें कर्ज जे, श्वासांनी घेतलें
सव्याज तें दिले, उसाशांनी
संख्येत वागलो, जीवनाचे कालीं
शून्यता वरियेली, मृत्यूलोभें
सजीवतेचेच ओझे, हे अवघड
होई डोईजड. देह देवा
मृत्यूची सुखशय्या, असो अंगाखाली
आता न राहिली, दुजी इच्छा
भाग्याची एकदा, मिळॊ मूठमाती
नको ही संगती, जीविताची
उरावी का स्मृती, सरताच अनुभव
भुले का हा जीव, भूतकाली
प्रेममीलनात, श्वास हा थांबावा
नेत्र अंध व्हावा, स्वप्न सरता