फांद्या या वृक्षाच्या, मला आलिंगाया
सिध्द का झाल्या या, सर्व आज
होऊनिया उंच, डोंगराचे कडे
माझ्या मूर्तीकडे, पाहती का?
कृतांताचे क्रूर, नेत्र ते पाहून
जीव हा हासून, पुढे जाई
फोल चाखी मृत्यू, अभंग तो आत्मा
घेत पुनर्जन्मा, पुन्हापुन्हा
मृत्यूचा कोंबडा, दाण्य़ासाठी हिंडे
तया न सापडे, कधीही तो
देवा तुम्ही वेडे, आला माझ्यासाठी
जीवाशिवा भेटी, आज झाली
भिडे ओठा ओठ, मिळे नेत्रा नेत्र
फुले गात्र गात्र, ब्रह्मानंदे