अखेर भेट ही, तुझी माझी विश्वा
चेतल्या सर्वस्वा, दिले तुज ना
इंद्रियांचा संघ, पंचतत्वे सारी
परत ही माघारी, तुला दिधली
विश्वबाळा तुझ्या, निटिलाला चुंबुनी
मी शून्य निर्वाणी, जाई स्वतः
युगांची पावले, टाकूनिया संथ
कालराज जात, कुठे सांगा
निघाला ना तीही, माझ्या देशीतूनी
स्वशिर माझ्या चरणी, ठेवूनिया
तसा आशीर्वाद, त्याला दिला मीच
"चालू दे तो नाच, तुझा स्वैर
मानवांची कुळे, चिरड पायांखाली
सृष्टिला हि घाली, तुझे फास
माझ्याच आशीने, सारे चराचर
होऊनी हे अमर, सदा नांदे
तूहि नांद तैसा, सवे त्यांच्या काला
गूढ माझी लीला, अशी चाले