देवि शूद्रते मी, तुला वाहियेले
जीविताचे असले, रानफूल
विराट पुरुषाच्या, पुण्य चरणांपाशी
तुझी जन्मराशी, सिध्द झाली
पुण्य चरणी त्याच्या, शीर्ष मी ठेविले
शिरोधार्य झाले, तुझे रूप
तुझ्या अर्चेसाठी, अर्पिले ब्रह्मत्व
नष्टले ममत्व, स्वजातीचे
शूद्रता देवीने, मला कुरवाळिले
अंग हे माखिले, मृत्तिकेने
शीर्ष अवघ्राणिले, हाच आशी दिला
’तुझ्या मायभूला नुरो दास्य’