९)
जगद्विख्यात शास्त्रज्ञ आईनस्टाईन यांच्याशीही अमेरिकेत माझी अनेक संभाषणें झाली. त्यात Infiniteबद्दल व दुसऱ्या अनेकानेक प्रमेयांबद्दल चर्चा झाली होती.
"Relativity is a practical application of your Infinity." असे उद्गार त्यांनी काढले होते.
Relativity म्हणजे सापेक्षतावाद. हा Infinity चे प्रत्यक्ष दर्शन आहे. प्रत्यक्ष अशा अर्थाने की Infinity ची कोठलीही कल्पना प्रत्यक्षतेत यावयाची असेल तर त्याला मर्यादा येणारच. म्हणजे ती Relative होणार. मर्यादा असणे हीच सापेक्षता.
Relativity वर अनेकानेक तत्त्वचिंतकांनी आपले विविध विचार प्रकट केले आहेत. बट्र्नंड रसेल, व्हाईटहेड यांनी शास्त्रीय पारिभाषेत केलेले विवेचन प्रसिद्धच आहे. गुर्जीफ, आऊस्पेन्स्की यांचेही विचार तात्त्विकदृष्टया उल्लेखनीय आहेत.
आऊस्पेन्स्कीने Relativity बद्दल महत्वाचे दृष्टिकोन प्रकटविले आहेत. शिवाय Symbols किंवा प्रतीके म्हणजे काय व ती कशा तऱ्हेने उपयोजिली जातत याबद्दलही आऊस्पेन्स्कीचे विवेचन प्रकाशक आहे.
अगदी अलीकडचे जर्मन तत्त्वज्ञ Heidegger व Karl Jaspers याच्या विवेचनांतही अनन्ततेबद्दल विचार आढळतात. Heidegger चा Being हा शब्द अनन्तता-वाचक आहे.
अनन्त-ता या कल्पनेत या प्रतीकात सापेक्षतावाद अन्तर्भूत होतो.
अनन्त-तेची शक्यता, अनन्त दृष्टिकोनाची संभाव्यता हे Relativity या उपपत्तीचे मूल गृहीत-कृत्य आहे. कोठल्याही एका दृष्टिकोनाबद्दल आत्यन्तिक आग्रह धरणे हे सत्य स्थितीला दृष्टीआड करण्यासारखे होईल. कोठलाच दृष्टिकोन ग्राह्य नव्हे असा याचा अर्थ नाही. जो दृष्टिकोन आपल्या भूमिकेशी सुसंगत असेल तो स्वीकारणे हे कर्तव्यच ठरते. सर्व दृष्टिकोनांचा त्याग हा Relativity ला अभिप्रेत नाही. किंबहुना एका दृष्टिकोनाचा स्वीकार करणे हे तर्कशास्त्रदृष्ट्या आवश्यक आहे.
अनन्त-ता स्वीकार करणे हे तर्कशास्त्रदृष्टया आवश्यक आहे. अनन्त-ता या तात्त्विक व आध्यात्मिक प्रतीकाचे प्राधान्य हे की अनन्त-ता म्हणजे सामान्य अर्थाची शून्यता नव्हे. हा सर्व-नास्ति वाद नव्हे. `निहिलिझम' नव्हे एका दृष्टीने अनन्त-ता हा पूर्णवाद आहे. `पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ।' येथे `पूर्ण' शब्दही सापेक्षतेने घ्यावयाचा आहे.
मला जे कळेल ते पूर्ण कसे असू शकेल? माझ्या ज्ञानशक्तीच्या मर्यादा मला कळत असलेल्या पूर्णतेलाही लागणारच. हाच कोटिक्रम अनन्त-तेला अनुलक्षून वापरता येईल. मला कळलेली अनन्त-ता ही काही अर्थाने सान्त होईल. पण ते तिचे प्रतीक, प्रतिबिम्ब किंवा मुद्रा होय. प्रतीक म्हणजे प्रत्यक्ष वस्तू नव्हे.
अशाचा अर्थाचा, परम अर्थाचा `नित्य' हा शब्द विचारणीय आहे.
कठउपनिषदांत नचिकेत्याला यमधर्म सांगतो,
``मला जे नित्य-पद प्राप्त झाले आहे ते `आपेक्षिक' - नित्य (Relative) आहे. निरपेक्ष नित्य नव्हे.''
(कठ उप० १.१०)
येथील `आपेक्षिक' हा शब्द शंकराचार्यांनी आपल्या भाष्यात वापरला आहे.
वेददेखील `अपरा-विद्या' म्हणून गणले जातात. स्वत: वेदांचाच हा उद्घोष व दृष्टिकोन आहे. वेद हे देखील अनित्यच आहेत. अनित्य याचा अर्थ प्रस्तुत कल्पाच्या अन्तापर्यंत टिकणारे. प्रत्येक कल्पाला किंवा महायुगाला स्वतंत्र वेद निर्माण होतात. हा सापेक्षतावाद नव्हे काय?
अर्थात् Relativity चा पदार्थ-विज्ञानात, उच्च गणितात फार सखोल व वैशिष्टपूर्ण असा अर्थ आहे. पण मर्यादितपणा - Limitedness हा द्रष्टसापेक्ष असतो. - त्याची सिद्धी द्रष्ट्यावर-दृष्टीवर- अवलंबून असते. स्थूलत: Relativity चे हेच स्वरूप आहे.
अनन्त-तेचा चिन्तनाने मानसिक मर्यादा शिथिल होतात `च' च्या ऐवजी `सुद्धा' हा प्रयोग संभवू लागतो, सुशक्य वाटू लागतो. एखादी व्यक्तीच किंवा वस्तूच असणे अवश्य वाटत नाही. दुसरीसुद्धा तितकीच मूल्यवान् असू शकते, वाटू लागते.
बुद्धे: फलं अनाग्रह: ।
अनाग्रह म्हणजे अनासक्ती, अलिप्तता.
....