८)
सॉक्रेटिस, प्लेटो यांच्यापासून किंबहुना त्यांच्या पूर्वीही अनन्त-त्व दर्शक विचार पाश्चात्य तत्त्वज्ञानातही आढळून येतात. हेगेलचे Absolute हे अनन्त-तेचे एक प्रतीक म्हणता येईल. ब्रॅडले, बोझॅन्क्वेट यांनी स्थूलत: हेगेलचाच अनुकार केला आहे.
लायब्नीज (१६४६ ते १७१६), कांट (१७२४ ते १८०४), आणि अलीकडील बर्गसाँ (१८५९ ते १९४१) यांच्या तात्त्विक विचारांचे हेगेलच्या (१७७० ते १८३१) कल्पनेशी साम्य आहे हे अभ्यासकाच्या लक्षात येईलच.
हेगेलचे Absolute हे सर्व `सान्त' वस्तून्चा व विशेषांचा `आश्रय' `अधिष्ठान' आहे. कोठलीही सान्त वस्तू Absolute ची निदर्शक आहे, सूचक आहे. ती वस्तू Absolute चे सूचन करून देते.
जॉन ड्युई (१८५९ ते १९५२) हे एक जगप्रसिद्ध तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ अगदी अलीकडे अमेरिकेत होऊन गेले.
१९५१ अखेर व ५२ मध्ये त्यांची व माझी अनेक वेळा भेट झाली होती. भारतीय तत्त्वज्ञान व भारतीय दर्शने, विशेषत: न्याय दर्शनाविषयी त्यांना विशेष जिज्ञासा होती.
``तुम्ही स्वत: ईश्वर मानता काय व तुमची ईश्वरविषयक कल्पना कोणती आहे?'' असा त्यांनी मला प्रश्न केला होता. तेव्हा
"God is infinite almost in all Religions, but to me Infinite itself is God. This infinite, of course, is not only mathematical and numerical but ontological and epistemological."
अनन्त-ता हे विशेषण बहुतेक सर्व धर्मात ईश्वराचे एक लक्षण मानले जाते. पण मला वाटते, अनन्त-ता हाच ईश्वर. ईश्वरता हे अनन्ततेचे विशेषण आहे.''
नंतर मी त्याबद्दल थोडे विवरण केले. शेवटी ते म्हणाले, "For modern scientific outlook, this Image of God would be pefectly Logical and acceptable."
हा आधुनिक ऋषी वृत्तीने व आचरणाने इतका थोर होता की, एखाद्या वेदकालीन ऋषीलाच भेटल्यासारखे मला वाटले.