५
`दृष्टि-सृष्टिवाद' हा तत्त्वशास्त्रांत सुप्रसिद्ध असलेला एक दृष्टिकोण आहे. आपल्या दृष्टीवर सर्व सृष्टी अवलंबून आहे. किंबहूना आपल्या दृष्टीमुळेच ती जन्माला येते, असा हा दृष्टिकोनाचा अर्थ आहे. दृष्टीबरोबरच सृष्टीचे विशिष्ट दर्शन, विशिष्ट अनुभव, विशिष्ट प्रतीती प्रकट होते हे म्हणणे सामान्यत: ग्राह्य व उचितच आहे. पण सृष्टि किंवा वस्तू ही दृष्टीमूळेच जन्माला येतात, असे म्हणणे सदोष ठरेल.
येथे गुण व द्रव्य यांमधील भेदाचे स्पष्टीकरण आवश्यक आहे. दृष्टीमुळे द्रव्य नव्हे तर गुण जन्माला येतात; असे म्हणणे योग्य दिसते. पण द्रव्यही दृष्टीमुळेच जन्माला येतं हे म्हणणे अग्राह्य वाटते.
मृत्तिका हे द्रव्य म्हटले तर पांढरी, तांबडी, पिवळी हे रंग म्हणजे मृत्तिकेचे गुण होत.
गुणदेखील द्रव्याची भूमिका घेऊ शकतीलच. पांढरा हा गुण अनेक अंशांनी, छटांनी निरनिराळा होऊ शकतो. याचाच अर्थ ते ते अंश व छटा हे गुण व पांढरेपणा हे `द्रव्य' होऊ शकते. द्रव्य व गुण यांमधला भेद करणेही अशक्य आहे.
अनन्त-तेचे हे बौद्धिक दर्शनच नव्हे काय? जे आता द्रव्य वाटते ते नंतर गुण ठरते. जो आता गुण वाटतो तो नंतर द्रव्य ठरतो.
तत्त्वत: अनन्त-तेचा प्रत्यक्ष अनुभव आपणांस क्षणोक्षणी होतच असतो. त्याचे बौद्धिक ज्ञान व भान आपणांस स्पष्ट स्वरूपात नसते एवढेच. हीच `अनरोक्षानुभूती'.
......