४)
शूद्रता, शून्यता, कारक-ता या शब्दांप्रमाणेच अनन्त-ता हा शब्द निर्माण झाला. हा शब्द काहीसा कृत्रिम दिसतो. पण माझ्या तात्त्विक आकलनाला त्या वेळी दुसरे सुलभ प्रतीक आढळू शकले नाही. बहुतेक सर्व शब्द त्यांच्या निर्मितीक्षणी कृत्रिमच वाटतात आणि ते तसे वाटणे किती साहजिक आहे? ते ``करावयाचे'' असतात, अतएव कृत्रिम वाटरणारच. ते अगोदर प्रचारात नसतात.
तत्त्वचिंतामणिकार गांगेशोपाध्याय यांना `शक्ती' हा शब्ददेखील प्रासादिक वाटला नाही. उलट, `नेति' हा शब्द सायणाचार्यांसह अनेक भाष्यकारांना ब्रह्मत्त्वदर्शकच वाटला.
अनन्त-ता म्हणजे काय? असा प्रश्न विचारला तर त्याचे काहीही `सुलभ' उत्तर असू शकणार नाही. जी जी उत्तरे द्यावीत, ती ती जटिल व अपूर्णच ठरतील.
विशेष्याचे नुसते दिग्दर्शन झाले तरी विशेषणाचे कार्य संपले. तसे पाहिले तर आपली सर्व विशेषणे किंबहुना नामेसुद्धा फक्त दिग्दर्शनच करू शकतात. हे आपल्या ध्यानात नसते. आपल्य सर्व प्रतीती, इन्द्रिय-प्रतीती व मानसिक प्रत्यक्षे, या दोषाने शापित आहेत. या शापाचे आपल्याला भान नसते इतकेच.
आपली सर्व प्रत्यक्षे ही बहुतांशी अनुमानेच असतात! हेच खरोखर मानवी जीवनातल्या मतभेदांचे व महायुद्धांचेही कारण आहे! आपल्या प्रतीती जर यथावत् असतील तरच त्यांना प्रतीती म्हणावयाचे. तशा त्या क्वचितच असतात.
आपल्या प्रतीती बहुतांशाने प्रमाददुष्ट असतात. प्रतीती यथावत् असल्या तरीही त्या विशिष्ट दृष्टिकोनाने, संदर्भाने व हेतूने विशेषित झालेल्या असतात.
पाण्यात धरलेली व पाण्याबाहेर असलेली सरळ काठी दोन निरनिराळे प्रत्यय देते. पाण्यातील वाकडी दिसते व पाण्याबाहेरची सरळ दिसते. या एकाच सर्वसामान्य उदाहरणावरून आपल्या प्रतीती कितीतरी तऱ्हांनी मर्यादित असतात हे ध्यानात येईल.