प्रकल्प: २
शीर्षक : महर्षि विनोद यांनी त्यांच्या कॉलेजजीवनामध्ये व नंतर १९५८-६० मध्ये लिहिलेल्या अभंगांचा शोध घेणे.
अभंगसंहिता या १९६८ या वर्षी प्रकाशित झालेल्या पुस्तकामध्ये एकूण १८९ निवडक अभंग प्रसिद्ध झाले होते. याव्यतिरिक्त बरेच अभंग अप्रकाशित आहेत, असं माझ्या वाचनात आलं होतं.
शांतिमंदिरातल्या जुन्या पेटाऱ्यांमधील साहित्याचे वर्गीकरण केल्यानंतर महर्षि विनोदांच्या हस्ताक्षरातल्या बऱ्याच डायऱ्या सापडल्या. त्यातील ७ डायऱ्यांमध्ये अभंग सापडले. या डायऱ्यांमधील अभंगांची संख्या ४४१.
याव्यतिरिक्त मैत्रेयी विनोद, सुमन महादेवकर, अदिती वैद्य यांच्या हस्ताक्षरातल्या काही वह्या सापडल्या. त्यातील १३ वह्यांमध्ये महर्षि विनोदांच्या अभंगांचं पुनर्लेखन (कॉपी) केलेलं दिसलं. यामध्ये एकूण ४७३ असे अभंग सापडले; ज्याची महर्षि विनोदांच्या अक्षरांतील मूळ प्रत सापडली नाही, ते कदाचित स्वत: न लिहिता, सांगून लिहवून (वळलींरींळिि) घेतले असावेत. अशा एकूण ९०४ अभंगांपैकी ७१५ अभंग प्रकाशित झालेेले नाहीत.
हे सर्व अभंग जतन करणे, यादी करणे, तपासणे, फायलिंग करणे व संगणकावर घालण्यासाठी देणे इत्यादी कामे अंजली निवंडीकर या सहाय्यिकेने व कार्यकर्तीने केले. विभावरी घावरे व विजय भंडारे यांनी हे सर्व अभंग संगणकामध्ये घातले. हे सर्व काम जून २००० पासून सुरू झाले.
संशोधनाचा राहिलेला भाग
१) ऑक्टोबर १९२५ पासून ते फेबु्रवारी १९२९ पर्यंतचे दिनांक अभंगांवर घातलेले आम्हाला सापडले. तसेच सप्टेंबर १९५८ ते मार्च १९६० यामधले दिनांक काही अभंगांवर सापडले. उरलेल्या अभंगांवरचे दिनांक आम्हाला सापडले नाहीत, ते सापडवण्याचे प्रयत्न करणे.
२) संगणकावर घातले गेलेले अभंग मूळ प्रतीप्रमाणे तपासणे व दुरुस्त्या करणे.
३) अभंगसंहिता या पुस्तकामध्ये अहं ब्रह्मास्मि, अनंतता, शुद्रता, संकीर्ण अशाप्रकारे वर्गीकरण प्र.रा.दामले (माजी प्राचार्य, वाडिया कॉलेज) यांनी केले. प्र.रा.दामले हे महर्षि विनोदांच्या कॉलेज जीवनापासून मैत्रीचा संबंध असलेले एक तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक होते. अभंग ताजे लिहिलेले असताना त्याचे वाचन महर्षि विनोद ज्या काही जवळच्या सुहृदांपुढे करत असत, त्यामध्ये दामले पती-पत्नी होते. उरलेल्या अप्रकाशित अभंगांचं वर्गीकरण अजून व्हायचं आहे.
४) कदाचित याची ७ पुस्तकं किंवा एकच मोठा खंड प्रकाशित करावा लागेल.
या सर्व कामाला अजून २-३ वर्षे लागण्याची शक्यता आहे. त्यासाठी अर्थसहाय्य आणि नियमित काटेकोरपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची आवश्यकता आहे.
या वरकरणी किचकट परंतु करत असताना अतिशय आनंद देणाऱ्या कामामध्ये ज्यांनी सहाय्य केलं, त्या सर्व कार्यकर्त्यांचे आभार. याशिवाय या कामाला सलग अर्थसहाय्य पुरवल्याबद्दल कार्य. विश्वस्तांचे आभार.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक
जानेवारी २००४ ते डिसेंबर २००४
इतर प्रकल्पातलं़ काम शेवटच्या टप्प्यामध्ये आणण्याच्या कामाला प्राधान्य देण्याचं ठरवलेलं असल्यामुळे अभंगंावरचं उरलेलं काम २००४ या वर्षी पुढे गेलं नाही. आम्ही ते योग्य वेळी करायला घेणार आहोत.
डॉ. ऋजुता विनोद
प्रमुख संशोधक